Parth Pawar #PuneLandScam : सत्तेला आरसा दाखवणारी झी २४ तास वृत्तवाहिनीची शोधपत्रकारिता

झी २४ तासमुळे पुण्यातील ’पार्थ’ व्यवहार २४ तासात रद्द करण्याची सरकारवर नामुष्की… शोधपत्रकारितेचा कणा आजही कायम - ज्येष्ठ पत्रकार डॉ. योगेश खरे

Update: 2025-11-08 08:33 GMT

पुण्यातील महारवतनाच्या शासकीय जमिनीच्या १८०० कोटी रुपयांच्या प्रचंड घोटाळ्याचा पर्दाफाश करून झी २४ तास वृत्तवाहिनीने मराठी पत्रकारितेच्या चौथ्या स्तंभाची गरिमा उंचावली आहे. हा भांडाफोड केवळ एक बातमी नव्हती, तर सत्तेच्या गोटात लपलेल्या भ्रष्टाचाराच्या काळ्या सावल्या उजेडात आणणारी एक क्रांती होती.

पार्थ पवार यांच्या अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीने बाजारभावाने १८०० कोटींची ४० एकर जमीन अवघ्या ३०० कोटींना खरेदी केल्याचा खुलासा, स्टॅम्प ड्युटीमध्ये २१ कोटींची माफी आणि केवळ ५०० रुपयांत नोंदणी – हे सारे तपशील इतक्या बारकाईने समोर आणले गेले की जनमानसात संतापाची लाट उसळली.

झी २४ तासच्या चमूने आणि व्यवस्थापनाने हा घोटाळा उघडकीस आणताना निर्भीडता दाखवली. जेव्हा सत्ताधारी कुटुंबीयांचा थेट संबंध असतो, तेव्हा बहुतेक बातम्या मिळमिळीत होतात. संपादक कमलेश सुतार यांनी मात्र पुराव्यांसह डॉक्युमेंट्स, फाइल्स आणि अधिकाऱ्यांच्या निलंबनापर्यंतची माहिती जनतेसमोर ठेवली.

महारवतन जमीन सरकारच्या परवानगीशिवाय विकता येत नाही, हे कायद्याचे कलम ५(३) त्यांनी स्पष्ट करून दाखवले. परिणामी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमावी लागली, तहसीलदार आणि उपनिबंधकांना निलंबित करावे लागले आणि व्यवहार रद्द करण्याची नामुष्की आली.

हा पर्दाफाश म्हणजे पत्रकारितेचे सोनेरी पान आहे. संपादक कमलेश सुतार यांनी दाखवलेली धाडस आणि तथ्यनिष्ठा इतरांना प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या बातम्या पाहून जनतेला विश्वास वाटतो की, सत्य कधीही दडपले जाऊ शकत नाही. विरोधकांनीही याचे कौतुक केले – अंबादास दानवे, सुषमा अंधारे, अंजली दमानिया यांनी हा मुद्दा लावून धरला, तर राहुल गांधींनी थेट 'दलितांसाठी राखीव जमिनीची चोरी' म्हटले. झी २४ तासच्या या संपादकीयमुळे सरकारला माघार घ्यावी लागली, स्टॅम्प ड्युटी वसूल करण्याची नोटीस निघाली आणि एफआयआर दाखल झाला.

अखेर अजित पवारांना स्वतःहून 'माझा यात काही संबंध नाही' असे सांगावे लागले आणि पार्थ पवारांना 'मी घोटाळा केला नाही' अशी स्पष्टोक्ती द्यावी लागली. वाहिनीने स्टुडिओ डिस्कशन, ग्राउंड रिपोर्ट्स आणि एक्सक्लुझिव्ह इंटरव्ह्यूजद्वारे हा विषय सतत हॅंडल केला. यामुळे जनजागृती झाली, सोशल मीडियावर #PuneLandScam ट्रेंड झाला आणि लोकशाही मजबूत झाली.

कमलेश सुतार आणि झी २४ तास टीमला सलाम! तुम्ही दाखवले की, खरी पत्रकारिता ही सत्तेला आरसा दाखवते. अशा भांडाफोडांमुळे महाराष्ट्रातील जनता अधिक सजग होईल आणि भ्रष्टाचाराला लगाम बसेल. झी २४ तासने यापूर्वीही असे अनेक घोटाळे राज्यासमोर आणले आणि राजकीय हादरे दिले .

आता पत्रकारितेतील प्रत्येक घटकाने राज्यातील असे घोटाळे समोर आणून सर्वसामान्य जनतेसोबत आपण आजही आहोत हे दाखवून देणे गरजेचे आहे. अन्यथा पांढरपेशी लुटालुट कायम राहील.

डॉ. योगेश खरे

ज्येष्ठ पत्रकार

(साभार - सदर पोस्ट योगेश खरे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Similar News