चीनने केली हाइपरसोनिक मिसाइलची चाचणी, चीनच्या चाचणीने जगाची शांतता धोक्यात?

चीनने हाइपरसोनिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी केली आहे. काय आहे हे हाइपरसोनिक क्षेपनास्त्र? चीनने केलेल्या चाचणीचा जागतिक शांततेवर काय परिणाम होणार? याविषयी आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख दिपक कदम यांनी केलेले विश्लेषण नक्की वाचा

Update: 2021-10-26 06:53 GMT

फायनान्शियल टाइम्स या वृत्तपत्राने पहिल्यांदा चीन ने अण्वस्त्र क्षमता असलेल्या हाइपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीपणे केल्याची बातमी दिली आहे. चीन च्या या कृतीमुळे जागतिक शस्त्र स्पर्धेत पुन्हा नव्याने एक ठिणगी पडली आहे.

ज्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नांना एक नवीन आव्हान तयार झाले आहे. चिन ने या वृत्ताचे खंडन केले आहे. व ही चाचणी परंपरागत स्पेसक्राफ्ट ची चाचणी होती. असे स्पष्ट केले असले तरी पुढे आलेल्या माहितीनुसार चीनने हाइपरसोनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचे स्पष्ट होते. त्यांची ही चाचणी पृथ्वी कक्षेला दोन वेळ परिक्रमा करून आपल्या निर्धारित टारगेट च्या जवळ 24 मैल दूर म्हणजेच 40 किलोमीटर दूर या क्षेपणास्त्राने निर्धारित टार्गेटवर निशाना साधला.

काय आहे हाइपरसोनिक क्षेपणास्त्र?

हाइपरसोनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञान 30 ते 35 वर्षांपूर्वीचे आहे. शीतयुद्धाच्या काळात रशियाने हे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला आहे. ध्वनीच्या वेगापेक्षा पाचपट अधिक किंवा त्यापेक्षाही अधिक वेगाने या क्षेपणास्त्राचा वेग आहे.

पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर एका वाहनाद्वारे त्यास अंतरिक्षात पाठवले जाते. तेथून ते पृथ्वीभोवती परिक्रमा करून चारही दिशेला ध्वनीपेक्षा पाचपट किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने निर्धारित केलेल्या ठिकाणावर हल्ला करू शकते.

बॅलेस्टिक क्षेपणास्त्र सुद्धा ध्वनी पेक्षा अधिक वेगाने हल्ला करू शकतात. पण बॅलेस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्याबरोबर ते नेमके कोणत्या दिशेने व कोणत्या ठिकाणी हल्ला करेल. याचा पूर्व अंदाज बांधता येतो. मिसाईल डिफेन्स सिस्टिमद्वारे बॅलेस्टिक मिसाईल रोखले जाऊ शकते.

बॅलेस्टिक मिसाईल एक वेळेस प्रक्षेपित केल्यानंतर त्यांची दिशा बदलता येत नाही. हाइपरसोनिक क्षेपणास्त्र मात्र, प्रक्षेपित केल्यानंतर त्याची दिशा बदलता येते. पृथ्वीच्या भोवती फिरताना चारही दिशेला ते वळवता येते. हाइपरसोनिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित केल्यानंतर ते पहिल्यांदा पृथ्वीच्या वातावरणाच्या बाहेर नेऊन सोडले जाते व तिथून ते पुन्हा परत आपल्या निर्धारित लक्ष्याला टारगेट करते. असे करताना ते ध्वनीच्या पाचपट किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने प्रवास करते.

त्यामुळे मिसाईल डिफेन्स सिस्टिम टप्प्यात ते येत नाही. म्हणून ही सर्वात मोठी चिंतेची बाब होय. हाइपरसोनिक क्षेपणास्त्रावर जर परंपरागत बॉम्बऐवजी आण्विक बॉम्ब लादले तर ते अधिक विध्वंसक होऊ शकतात. त्यामुळेच आण्विक युद्धाचा धोका भविष्यात वाढला आहे. जागतिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी हे एक नवीन आव्हान समोर आले आहे.

हाइपरसोनिक क्षेपणास्त्र निर्मितीचे स्पर्धा

रशियाने सर्वप्रथम हाइपरसोनिक क्षेपणास्त्र शीतयुद्धाच्या काळात विकसित करण्याचा प्रयत्न केला असला तरी सध्या अमेरिकेकडे उच्च दर्जाची हाइपरसोनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आली आहेत. ती आण्विक क्षमतेची आहेत. अमेरिका व रशिया कडे हे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. अलीकडे चीन ने केलेल्या परीक्षणामुळे त्यांच्याकडे सुद्धा हे तंत्रज्ञान विकसित झाल्याचे स्पष्ट होते.

भारत, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान, उत्तर कोरिया ही राष्ट्र सुद्धा हाइपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहेत.

ऑस्ट्रेलिया व अमेरिका संयुक्त रीत्या हाइपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहेत यासाठी त्यांनी हाइपरसोनिक इंटरनॅशनल फ्लाईट रिसर्च एक्सपरिमेंटेशन (Hifire) स्थापना केली आहे. ध्वनीचा आठपट वेगाने मारक क्षमता असलेल्या क्षेपणास्त्राची त्यांनी यशस्वी चाचणी केली आहे. पुढील काळामध्ये ध्वनीच्या 30 पट वेगाने हल्ला करू शकतील. अशी क्षेपणास्त्रे ते विकसित करण्याचा प्रयत्न करत आहेत.

जपान हे हायपर क्रूज मिसाइल (HCM), हायपर वेलोसिटी ग्लाइटिंग प्रोजेक्टईल (HVGP) या माध्यमातून हे क्षेपणास्त्र विकसित करत आहे.

फ्रान्स, रशियाच्या साहाय्याने हाइपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करत आहे.

उत्तर कोरियाने अलीकडे हवासोंग 8 हे हाइपरसोनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतल्याचे घोषित केले.

भारताकडील हाइपरसोनिक क्षेपणास्त्र...

भारत रशियाच्या मदतीने हाइपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रह्मोस 2 हे ध्वनीच्या 7 पट वेगाने मारक क्षमता असलेले क्षेपणास्त्र या अंतर्गत विकसित करण्यात येत आहे.

2017 मध्ये हे क्षेपणास्त्र विकसित करण्याचे उद्दिष्ट होते. पण आता 2025 ते 28 च्या दरम्यान भारताकडे ही क्षमता विकसित केली जाईल. या क्षेपणास्त्र मॅच 13 म्हणजेच ध्वनीच्या तेरा पट अधिक वेगाने याची मारक क्षमता असेल. प्रारंभी बारा हाइपरसोनिक क्षेपणास्त्र याअंतर्गत तयार केले जातील.

स्टार्ट वन, स्टार्ट टू या कराराद्वारे अमेरिका आणि रशिया या दोघांनी अण्वस्त्र कपात संदर्भामध्ये पावले उचलून जागतिक शांतता प्रस्थापित करण्याच्या दिशेने वाटचाल केली होती.

पण हाइपरसोनिक क्षेपणास्त्राच्या विकासाच्या यांच्या स्पर्धेमुळे पुन्हा एकदा आण्विक युद्धाची शक्यता वाढली आहे. अविवेकी व अपरिपक्व देश व नेतृत्व जगावर या क्षेपणास्त्राच्या सहाय्याने आण्विक युद्ध लादू शकते. त्यामुळे अशा शस्त्रस्पर्धेला नियंत्रित ठेवणे हेच मानवी अस्तित्वासाठी गरजेचे आहे

Tags:    

Similar News