जगातील श्रीमंत लोकं शेतीची जमीन खरेदी करतायेत आणि कोकण अजूनही झोपेत?

आपलं कोकण, आपलं सोनं… दुसऱ्यांच्या ताटात कसं वाढलं? कोकणातील लोक जमिनी का विकत आहे ? कोकणच्या नैसर्गिक संपत्तीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी काम करणाऱ्या दिलीप परब यांचा लेख वाचा

Update: 2025-12-03 01:51 GMT

आज जगभर एक मोठा आणि अटळ बदल घडतोय सर्वात श्रीमंत आणि दूरदृष्टी असलेल्या लोकांची नजर आता शेतीकडे वळत आहे. Bill Gates आज अमेरिकेतील सर्वात मोठे शेतीजमिनीचे मालक आहेत. Jeff Bezos regenerative farming मध्ये गुंतवणूक करत आहेत. Mark Zuckerberg यांनी Hawaii मध्ये हजारो एकर घेतलेत. Ambani अन्न आणि जैवविविधतेवर आधारित ‘Vantara’ सारखी परिसंस्था उभी करत आहेत. Adani संपूर्ण agri-logistics आणि food processing साखळी काबीज करत आहेत. Tata superfoods आणि वनीकरणात मोठी गुंतवणूक करतेय. हे सर्व IT, रिअल इस्टेट किंवा स्टॉक मार्केटवर पैज लावत नाहीत ते अन्न, पाणी, औषध आणि सुगंध यावर भविष्याचा पाया रचत आहेत. कारण जगातील सत्ता आता जमिनीवर निर्माण होते आहे.

कोकणाच्या जमिनीवर आज मोठे सत्य लिहिले जात आहे, पण आपण ते वाचायलाच तयार नाही. कोकणातील बहुसंख्य शेतकऱ्यांकडे सरासरी एकरभरही जमीन नाही, आणि एवढ्या छोट्या तुकड्यांतून उदरनिर्वाह होत नसल्याने जमीन विकण्याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. गेल्या १५–२० वर्षांत सिंधुदुर्ग–रत्नागिरीतील बरीच जमीन बाहेरच्या लोकांच्या मालकीत गेली आहे. आज आंबा हंगामात १,००,००० पेक्षा जास्त बाहेरील कामगार कोकणात येतात, आणि हंगामातून तयार होणाऱ्या ₹६००–₹१००० कोटी अर्थव्यवस्थेतील मोठा हिस्सा कोकणाबाहेर जातो.

कोकणात मुबलक वार्षिक पावसाचं वरदान असूनही उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष; पर्यटनात स्थानिक मालकी २०–३०% च्या खाली; आणि ८५% कोकणी युवक रोजगारासाठी बाहेर हीच कोकणाची विडंबना. जगातील मोठी नावं बिल गेट्स, अंबानी, मोठे कॉर्पोरेट समूह कृषी जमीन खरेदी करत आहेत. कारण अन्न, औषधी पिकं, पाणी आणि निसर्ग यांमध्येच भविष्याची अर्थव्यवस्था आहे. त्यांना इथे भविष्य दिसतंय आणि कोकणी मात्र आपलं भविष्य एक सही करून विकण्याच्या तयारीत आहे.

कोकणात एक विचित्र विरोधाभास सुरू आहे जग जमिनीवर पैसा टाकत आहे, आणि कोकणातील लोक जमीनच विकत आहेत. जगाला हवी आहेत औषधी वनस्पती, सुगंधी पिकं, मसाले, फळं, निसर्ग पर्यटन, हवामानाचा फायदा आणि हा सर्वात मोठा खजिना आपल्या कोकणात आहे. पण आपण “काम नाही, अडचणी आहेत, शहरातच भविष्य आहे.”

परिणाम?

जी जमीन आपल्या पिढ्यांना कमाई, मालकी आणि ओळख देणार होती, तीच उद्या बाहेरच्यांच्या साम्राज्याचा पाया बनणार आहे; आणि त्या जमिनीभोवती आपणच मजूर म्हणून फिरणार आहोत. इतिहास सांगतो जिथे जमीन गेली, तिथे स्थानिकांचं अस्तित्व मिटलं. शेती कंटाळवाणी किंवा मागे पडलेली गोष्ट नाही ती जगातील पुढची सर्वात मोठी शक्ती आहे. गवती चहा, वाळा , हळद , कोकम, फणस, करवंद, चाराबोरा, जांभूळ, आंबा ज्यांना आपण साधं समजतो, त्याच पिकांचा आज जागतिक बाजार $5 Trillion पर्यंत पोहचलाय. जग म्हणतं “Give us more.” आणि आपण मात्र जमीन विकून exit घेतोय. आजचा चुकीचा निर्णय म्हणजे पुढच्या पिढ्यांचं कायमचं नुकसान. म्हणूनच जागतिक अर्थतज्ज्ञ स्पष्ट सांगतात — “Don’t Sell Land. Scale Land.”

कोकणाकडे अभाव नाही, संसाधने नाहीत असं नाही दृष्टीची कमतरता आहे. जेव्हा आपण partneship, clusters, branding, processing, Village-to-Global उत्पादन यावर भर देऊ तेव्हा जमीन केवळ मालमत्ता नाही, तर भविष्याची फॅक्टरी बनेल. आणि जर आपण आज जागे झालो नाही, तर... उद्या आपल्या मुलांना विचारावं लागेल. आपलं कोकण, आपलं सोनं… दुसऱ्यांच्या ताटात कसं वाढलं?..... आणि उत्तर काहीच नसेल”

दिलीप परब

(लेखक - सॉफ्टवेअर इंजिनीअर IT क्षेत्रातून multi national कंपनी मध्ये काम करून कोकणात परत आलेत. येथे सुगंधी पिकांवर Essential Oil आधारित “Sugandha Essentials” हा उद्योग उभारून, स्थानिकांना रोजगार आणि कोकणाच्या नैसर्गिक संपत्तीला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी काम करत आहोत.)

The Konkan Farmer

Sugandha Essentials

Bhatwadi atpost Tithavali taluka Vaibhavwadi

Dist Sindhudurgh 416703 - Contact Number: 8369882036

Similar News