Municipal Elections : नगरसेवक म्हणून महात्मा फुले कसे होते?
गरिबांविषयी निष्ठा असेल तर एक नगरसेवक प्रामाणिकपणे किती प्रभावी काम करू शकतो याचे महात्मा फुले हे उदाहरण होते... आज निवडणुकीत सेवा करण्यासाठी होणार खर्च आणि नगरसेवक होण्याच्या प्रेरणा बघितल्यावर फुले नावाचा नगरसेवक ही दंतकथा वाटायला लागते- हेरंब कुलकर्णी
Municipal Elections महापालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि Councilor नगरसेवक होण्यासाठी धडपड कोणत्याही टोकाला जाते आहे. अशावेळी महाराष्ट्रातील एका विशेष नगरसेवकाची आठवण झाली. त्या नगरसेवकाचे नाव होते ज्योतिबा गोविंदराव फुले.. Jyotiba Phule होय, Pune पुणे नगरपालिका १८५८ साली सुरू झाल्यानंतर १८७६ ते १८८२ या कालावधीत ज्योतिबा फुले यांची पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती... त्या काळात नगरपालिकेमध्ये कनिष्ठ वर्गाचे प्रतिनिधी नसल्याने गरिबांच्या वस्तीकडे नगरपालिका लक्ष देत नसे (आजही तेच आहे ) त्या वस्तीला वीज, पाणी, आरोग्य या सुविधा देताना भेदभाव होत असे.
महात्मा फुलेंनी तिथपासून सुरुवात केली. अर्थसंकल्प तपासणीच्या समितीवर त्यांची निवड झाली होती. पन्नास रुपयाचा एक कारकून नेमण्याऐवजी ३० रुपये व २० रुपयांचे दोन कारकून नेमावेत असा बचतीचा सल्ला त्यांनी नगरपालिकेला दिला होता... बुधवार वाडा येथे ग्रंथालयाच्या खोल्या बांधण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.
इंग्रजांच्या बाबतीत महात्मा फुले सौम्य भूमिका घेत अशी टीका त्यांच्यावर काहीजण करतात. पण १८८० साली हिंदुस्तानचे महाराज्यपाल लिटन हे पुण्यामध्ये येणार असल्याने शहराची सजावट करण्यासाठी नगरपालिकेने त्या काळातील एक हजार रुपये (आजचे कित्येक लाखात) खर्च करायचे ठरवले व सदस्यांची परवानगी मागितली... 32 पैकी 31 सदस्यांनी परवानगी दिली पण ही सजावट न करता ती रक्कम गरिबांच्या शिक्षणाला वापरा हा विरोध नोंदवणारे एकमेव ज्योतिराव फुले होते, हे टीकाकारांनी लक्षात घेतले पाहिजे. ही फुलांची गरिबांविषयी कळकळ होती.
महात्मा फुलेंची गाजलेली भूमिका ही दारू दुकानांना केलेल्या विरोधाची होती. पुणे शहरात त्यावेळी चार दारूचे गुत्ते होते ते एकदम दहा गुत्ते करावेत यासाठी नगरपालिकेने परवानगी दिली. तेव्हा महात्मा फुलेंनी दुकाने वाढवू नका म्हणून त्याला प्रचंड विरोध केला व जर परवानगी द्यायची असेल तर दारू दुकानांवर कर बसवा अशी आग्रही मागणी करून खूप संघर्ष केला.
फुले म्हणतात " नगरपालिका बराच खर्च करून एकीकडे आरोग्य संभाळण्याची काम करते आणि दुसरीकडे दारू दुकानांना परवानगी देते हे योग्य नाही...
भर वस्तीत दारूचे गुत्ते उघडल्यामुळे लोकांच्या नैतिक अधोगतीची सर्व प्रकारची बीजे पेरली जात आहे. त्यामुळे शहराचे आरोग्य संभाळणे हा नगरपालिकेचा उद्देश आहे. त्याला बाधा येत आहे. तेव्हा नगरपालिकेने ही दारू दुकाने ते ज्या प्रमाणात हानी करतात, तितका कर बसवावा...."
दुर्दैवाने, लोक विषारी दारू पितात म्हणून त्यांना शुद्ध दारू दिली पाहिजे, हा आज दिला जाणारा युक्तिवाद तेव्हाही केला गेला आणि पुणे शहरात दहा दारूचे गुत्ते सुरू झाले..
१८७४ साली पुण्यात पंधरा हजार सहाशे गॅलन दारू विकली जात होती ही आकडेवारी धक्कादायक आहे.. आजही दुर्दैवाने महाराष्ट्र सरकार ३२८ नवी दारूची दुकाने वाटत आहे आणि फुले यांच्या जन्माला २०० वर्षे पूर्ण होताना हे निर्णय होतात आहे हे दुःखद आहे...
आजची महात्मा फुले मंडई बांधण्यासाठी मोठा खर्च करायला फुलेंनी विरोध केला होता. ती बांधणे ऐवजी गरिबांच्या शिक्षणासाठी खर्च करा अशी भूमिका त्यांनी मांडली. तिथे जे भाजी विक्री करतात त्यांच्यावर जादा कर लावू नये यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. फुलेंचे गरिबांचे प्रेम कोणी ऐकले नाही.
पुणे शहराला शुद्ध पाणी मिळावे म्हणून पाण्याचा साठा करून तलाव बांधावा व तलावाला फिल्टर लावून स्वच्छ पाणी द्यावे असे नगरपालिकेने मंजूर केले. झगड्याचे वाड्याजवळ सातारा रोडला तलाव बांधला जात होता. बांधकाम बघण्यासाठी ज्योतिराव फुले नियमितपणे तिथे जात होते पण बांधकाम दर्जेदार होत नव्हते, जसा चीन लावायला पाहिजे तसा लावला जात नव्हता. त्यामुळे पाण्याचा साठा नीट होणार नाही ते झिरपले जाईल व लोकांना फिल्टरचे पाणी मिळणार नाही असे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी त्या तक्रारी कमिटी पुढे मांडल्या पण कमिटीतले मेंबर ठेकेदाराच्या बाजूचे होते ते म्हणाले काम चांगले चालले आहे.
शेवटी काम पूर्ण झाल्यावर फुले म्हणाले तसेच झाले, पाणी साठले गेले नाही. शहरातल्या लोकांना शुद्ध पाणी पिण्यास मिळाले नाही सार्वजनिक काम किती गंभीरपणे फुले करत होते याची ही नोंद व ठेकेदारांना संरक्षण देणारे लोकप्रतिनिधी तेव्हाही होते...
फुलेंना गुणग्राहकता होती.
एक प्रामाणिक अधिकारी निवृत्त होताना त्याला नगरपालिकेने २०० रुपयांचे घड्याळ भेट द्यावे ,ही सूचना फुलेंनी केली.
प्रत्येक गोष्टीत संघर्ष केल्यानंतर त्यांच्याविषयी अधिकाऱ्यांनी डूख धरून नगरपालिकेने मैला टाकण्याची कुंडी फुले यांच्या घराजवळ बसवून त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला. गरिबांविषयी निष्ठा असेल तर एक नगरसेवक प्रामाणिकपणे किती प्रभावी काम करू शकतो याचे महात्मा फुले हे उदाहरण होते... आज निवडणुकीत सेवा करण्यासाठी होणार खर्च आणि नगरसेवक होण्याच्या प्रेरणा बघितल्यावर फुले नावाचा नगरसेवक ही दंतकथा वाटायला लागते.