ST कामगारांचा संप : काय करता येईल एस. टी. वाचवण्यासाठी?

एसटी कर्मचाऱ्यांचा संप चांगलाच चिघळला. या संपावर तोडगा कधी निघणार असा प्रश्न आहे. पण मुळात हा संप का झाला, या संपाला जबाबदार कोण आहे, या संपावर तोडगा कसा निघू शकतो आणि एसटीचे रुतलेले आर्थिक चाक वर कसे काढले पाहिजे, याचे विश्लेषण केले निवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक श्रद्धा बेलसरे खारकर यांनी....श्रद्धा बेलसरे खारकर यांनी एसटीच्या जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे आणि एसटी फायद्यात कशी चालू शकते याचे काही यशस्वी प्रयोग देखील केले आहेत.

Update: 2021-11-21 13:32 GMT

गेल्या अनेक दिवसांपासून एस टी चा संप सुरु आहे. हजारो प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत आणि आधीच तोट्यात असलेल्या महामंडळाचे कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न बुडत आहे. ज्यांच्याकडे पैसे आहेत ते खाजगी गाड्यांनी जातात. ज्यांची नड आहे तेही उधारीपाधारी करतात. या सगळ्या व्यवहारात फायदा कुणाचा होतो? तर तो खाजगी वाहतुकदारांचा ! ते त्यांचे दर सणावाराला अवाच्या सव्वा वाढवतात तर कधी भाव पाडून एस.टी.चे प्रवासी पळवतात. त्यांच्यावर कुणाचाही निर्बंध नाही.

आज कामगारांच्या अनेक समस्या आहेत, मागण्या आहेत. त्या काही प्रमाणात तरी तातडीने पूर्ण करायला हव्यात. त्यांना जबाबदारीची जाणीव देऊन किमान पगारवाढ देणे गरजेचे आहे. अनेक कर्मचा-यांनी आत्महत्या केल्या त्यामागची कारणे शोधून या प्रश्नाकडे राजकीय बेरीज-वजावाकी म्हणून न बघता हा एक सामाजिक प्रश्न मानून त्याचा सहानुभूतीने विचार करायला हवा.

मी १९९७साली काही वर्षे एसटी महामंडळात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम करत होते. त्यावेळी एसटीचा संचित तोटा ५५० कोटी रुपये होता. परिस्थिती डबघाईला आली होती. अनेकदा तर मी माझा उल्लेख गमतीने 'दिलगिरी अधिकारी' असाच करत असे. 'एका सीटवर दोघांचे आरक्षण झाले.' 'गाडी उशिरा आली', 'कर्मचारी उद्दामपणे वागले' 'गाडी गळत होती' अशा अनेक तक्रारी येत असत आणि मला त्याबद्दल दिलीगिरी व्यक्त करावी लागत असे. त्यावेळी श्री. उज्ज्वल उके एमडी म्हणून आले. त्यांनी एम.बी.ए. केलेले होते. महामंडळाची माहिती घेण्यासाठी त्यांनी विभागप्रमुखांची बैठक घेतली आणि कामागांराची मानसिकता बदलण्यासाठी प्रयोग सुरु झाले.

जनसंपर्क अधिकारी म्हणून मी माझ्या जनसंपर्क विभागाच्या टीमसह रोज डेपोमध्ये १०-२० गाड्यांमध्ये जाऊन प्रवाशांशी बोलू लागले. त्यांच्या अडचणी समजावून घेऊ लागले. महामंडळाचा अभ्यास करताना माझ्या असे लक्षात आले की त्यावेळी एसटीत एक लाख कर्मचारी काम करत होते आणि १००० अधिकारी होते. १८००० गाड्या होत्या आणि ३५ लाख प्रवासी दररोज प्रवास करायचे. मला ३५ लाख प्रवाशांपर्यंत पोहोचणे शक्य नव्हते. त्यासठी मी ठरवले की गाड्यांचे वाहक व चालक आणि गाड्या दुरुस्त करणारा मेकॅनिकल स्टाफ मला मदत करू शकतील, कारण हे लोक दररोज असंख्य प्रवाशांना भेटत असतात. आमच्या कामगारांची संख्या होती एक लाख ! मुंबईला येणाऱ्या बसमधील वाहक आणि चालकाला मी भेटू शकत होते. मग मी ठरवले की विविध डेपोमध्ये जाऊन कर्मचाऱ्यांना भेटायचे. त्यावेळी ५४० डेपो होते. मी १०० दिवसात १०० आगारांना भेटी दिल्या.

म्हणजे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात मी जाऊन आले. कामगारांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांना त्यांच्या कामाबद्दल आणि संस्थेबद्दल आपुलकी, आत्मियता वाटायला हवी. जसा टाटा, गोदरेज या कंपन्यांच्या कर्मचा-यांना वाटतो तसा स्वत:च्या संस्थेबाद्ल अभिमान वाटायला हवा.

या मोहिमेत मी 'आपण लोकांशी चांगले वागले पाहिजे, बोलले पाहिजे' असे सातत्याने सांगत असे. एकदा एका वाहन चालकाने विचारले, 'बाई तुम्ही बोलता खूप छान ऐकत रहावेसे वाटते. पण आम्ही नक्की काय करायचे ते समजत नाही.' त्यांची समस्या खरी होती. मग मी ठरवले की त्यांना संवादाचा एक नेटका मसुदा हातातच दिला पहिजे. मी मोठ्या ठळक अक्षरात टाईप केलेला पेपर सर्वांच्या हाती दिला. ड्रायव्हरने प्रवाशी चढतात त्या दाराने समोर येऊन प्रवाशांना नमस्कार करायचा आणि म्हणायचे 'मी सदाशिव, या बसचा चालक आहे. हे श्री रमाकांत आपले वाहक आहेत. आपली बस मुंबई वरून नाशिकला जात आहे.. आपल्याला पाच तास लागतील. मध्ये शहापुरला गाडी १० मिनिटे थांबेल त्यावेळी तुम्ही चहापाण्यासाठी खाली उतरू शकाल. आता तुम्ही जागेवर बसून घ्या. तुमच्या आसनाजवळ येऊन तुम्हाला तिकीट दिले जाईल.'

ह्या छोट्या मंत्राने काम केले. वाहक चालक बोलू लागले. लोकांनी या बदलाचे चांगले स्वागत केले आणि माध्यमांनी आता एसटीत विमान प्रवासाचे सौजन्य अशा बातम्या झळकवल्या. त्यामुळे आम्हा सर्वाचा खूप हुरूप वाढला.

आमचे सर्व कर्मचारी उत्साहात काम करू लागले. सर्व वातावरण बदलले. लोकांनी स्वत:च्या खर्चाने बस सजवल्या. टेप रेकॉर्डर लावले, कुणी व्हिडीओ बसवले. कुणी लहान मुलांसाठी गोळ्या बिस्किटे आणू लागले. तर म्हाताऱ्या आजीला चालक वाहक वर चढण्यासाठी हात देऊ लागले. यावेळी सर्व कर्मचारी संघटना आमच्या बरोबर होत्या. कुणीही विरोध केला नाही. एका भाषणात मी म्हटले की मी एक महिन्याचा पगार महामंडळाला देईल. तर सर्व कामगार म्हणाले आम्हीही देऊ. त्यांचा दर महिन्यात एक दिवसाचा असे सहा महिने म्हणजे सहा दिवसाचा पगार त्यांनी दान केला. त्यावेळी एका दिवसाचा पगार अडीच कोटी होता असे १५ कोटी महामंडळाला मिळाले. अशा कितीतरी गोष्टी झाल्या. हे लिहिण्याचे कारण असे की ही सगळी कार्यक्षमता आणि गुणवत्ता त्यांच्याकडे होती. आम्ही फक्त ती जागवण्याचा प्रयत्न केला इतकेच. मला सगळेजण ताई म्हणू लागले आणि मी एकलाख भावांची बहिण झाले.

महामंडळाचे खरे शक्तीस्थळ ( युएसपी ) होते "सुरक्षित प्रवास!" माझ्याकडचे ४५० वाहनचालक असे होते की त्यांनी ३०-३० वर्षे विना अपघात सेवा केली होती. या सगळ्याचं आणि उज्ज्वल उके यांनी घेतलेल्या अनेक उपायांचा असा परिणाम झाला की १०० दिवसांच्या "प्रवासी शतक" योजनेत आमचे उत्पन्न १०० कोटी रुपयांनी वाढले. या ऐतिहासिक घटनेची मी साक्षीदार होते.

का होतो एसटीला तोटा?

मला असे वाटते की एसटी ही व्यावसायिक कंपनी म्हणून चालवल्या जात नाही.

गाड्यांचे टाईम टेबल प्रवाशांच्या सोयीचे नसते.

गाड्यांची निगा, दुरुस्ती वेळेवर केल्या जात नाही.

दूरवरून १२-१३ तास प्रवास करून आलेल्या कामगारासाठी रात्रीची साधी विश्रांतीची धड सुविधा नसते.

अनेकदा ऐनवेळी कंत्राटी कर्मचारी नेमल्या जातात. त्यांना फार तुटपुंजे वेतन देले जाते.

गाड्या भाड्याने कंत्राटावर घेतल्या जातात.

वाहक चालकाच्या अनेक जागा रिक्त आहेत.

इतरांच्या तुलनेत पगार अतिशय कमी आहेत.

पेन्शन व इतर लाभ अनेक वर्षे प्रलंबित आहेत.

अशी अनेक कारणे आहेत.

एसटीच्या आवारात खाजगी गाड्या बिनदिक्क्त येतात आणि प्रवासी घेऊन जातात. नियमाप्रमाणे खाजगी वाहतूकदारांना त्यांची कार्यालये एसटीच्या आवाराच्या जवळ लावता येत नाहीत, पण कुठल्याही एसटी स्थानकाच्या आजूबाजूला खाजगी वाहतूक कंपनीची कार्यालये थाटलेली दिसतात. एसटीचे भाडे हे ठरलेले असते. ते कमी किंवा जास्त करण्याचा अधिकार कुणाला नसतो पण खाजगी वाहने मनाला येईल तसे दर लावतात.

जर एसटीला वाचवायचे असेल तर काही ठोस उपाययोजना कराव्या लागतील. वरवरच्या मलमपट्टीचा उपयोग होणार नाही. हे महामंडळ सरकारने एखाद्या कंपनीसारखे चालवायला हवे. राजकीय हितसंबंध बाजूला ठेऊन व्यावसायिक पद्धतीने चालवायला हवे. यासाठी अनेक कठोर निर्णय घ्यावे लागतील.

सेवानिवृत्त तज्ञ अधिकाऱ्यांचे एक सल्लगार मंडळ नेमावे लागेल.

गाड्यांचे टाईम टेबल प्रवाशांच्या सोयीचे हवे.

जिथे कमी प्रवासी असतील त्या ठिकाणी मिनी बसचे नियोजन करावे.

शासन विविध स्तरातील लोकांना एसटी भाड्यात सवलत जाहीर करते त्याची प्रतिपूर्ती दरवषी नियमित करावी.

"एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास" असे घोषवाक्य घेऊन जनजागृती करावी.

नवख्या अननुभवी वाहनचालकांना नेमणूक देऊ नये, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

अनावश्यक खर्च टाळले पाहिजे.

जनसंपर्क मोहिमेद्वारे प्रवाशांना सुरक्षित वाहतुकीचा विश्वास दिला पाहिजे. एस. टी.च्या प्रत्येक शहरात गावात, मोक्याच्या ठिकाणी जागा आहेत. त्या जागांचा "बांधा वापरा आणि हस्तांतर करा" या तत्वावर विकास केला पाहिजे. या योजनेत बांधलेल्या इमारती राजकीय हितसंबंध बाजूला ठेऊन भाड्याने देवून दरवर्षी विशिष्ट भाडे ठेऊन कायमस्वरूपी उत्पन्नाची सोय केली पाहिजे. एस.टी. ने टपाल सेवा आणि पार्सल सेवा मोठ्या प्रमाणात सुरु केली तर उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. आता एसटीने फक्त प्रवासी भाड्यावर अवलंबून न राहता उत्पन्नाचे विविध स्त्रोत शोधले पाहिजे तरच गोरगरिबांचे प्रवासाचे साधन असलेली लालपरी वाचेल.

श्रद्धा बेलसरे खारकर

लेखिका निवृत्त माहिती व जनसंपर्क संचालक आहेत

Tags:    

Similar News