भिडे आता निर्भिड झालाय...
संभाजी भिडे संविधान विरोधी भूमिका घेत असतात, त्यांची नुकतीच एबीपी माझा या मराठी चॅनेलने, 'सर्वधर्मसमभाव म्हणजे नपुसंकपणा, लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा' दाखवलेली बातमी आणि फक्त नुसती बातमी नाहीये त्याचा कॅप्शन करून सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा केलेला आहे. संभाजी भिडे या मूर्ख माणसाचा फोटो टाकून चॅनेल वर बातमी येते, आपण प्रसारमाध्यम असल्यामुळे सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. पण आम्हाला प्रश्न पडतो, ही अशी बातमी येतेच कशी ? कि जी संविधान विरोधी भूमिका आहे, तुमच्या चॅनलला फार महत्त्व आहे, सार्वजनिक जीवनामध्ये आम्ही आदराने आणि ऑथेंटिक माहिती म्हणून आम्ही ती पाहत असतो. नेमके या बातम्या दाखवून तुम्हाला समाजाकडून काय अपेक्षित असते व तुम्हाला काय साध्य करायचं असतं ?
संभाजी भिडे यांनी जे वर नमूद केलेले जे वक्तव्य केलं आहे, त्यातून एकूणच सर्वधर्मसमभाव ही संविधानिक भूमिका आणि भारताला एकसंघ ठेवण्यासाठी जाती-धर्म या विविधतेने नटलेल्या आपल्या भारत देशामध्ये अशा पद्धतीची धर्मद्वेष पसरवणारी गोष्ट त्यांनी मांडलेली आहे, किंबहुना ते सातत्याने या अर्थाच्या गोष्टी बोलत असतात आणि त्याला नपुसंकपणा हा शब्द त्यांनी वापरलेला आहे.
कदाचित मीडियाने कौशल्याने बातमी करण्याच्या दृष्टीने हे शब्दांकन केलं असावे किंवा संभाजी भिडे यांना नेमकं काय म्हणायचं त्याचा अर्थ बोध होण्यासाठी ही भावणारी ओळ वापरली असावी. त्याचबरोबर भारतीय संविधानाबरोबर भारतीय तिरंगा ध्वज जो दिमाखाने आपला आत्मविश्वास, भारताचा सन्मान आणि त्या झेंड्याला एक वेगळा इतिहास आणि संविधानिक मान्यता आहे, तीच नाकारून लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी काम करा, अशा पद्धतीचं अतिशय दुर्दैवी वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलेलं आहॆ. सदर अनुषंगानं शासनानं याची दखल घेऊन संविधान विरोधी कृतीला आळा बसण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निश्चितपणानं कारवाई केली पाहिजे.
भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्ष असा शब्द वापरून सर्वधर्मसमभावाची भूमिका मांडली आहे, किंबहुना तो एक भारतीय संविधानाचा महत्त्वाचा सार व अंग आहे. त्याच पद्धतीनं येऊ घातलेल्या १५ ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तिरंगा लाल किल्ल्यावर फडकवणार आहे, या पार्श्वभूमीवर एक प्रकारे भगवा फडकवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहॆ. निश्चितपणानं भगव्या झेंड्याला एक आगळ वेगळं महत्व आपल्या देशामध्ये आहे. हिंदू समाज मोठ्या संख्येने जरी आपल्या देशात असला तरी जात-धर्म-पंथ याबाबतीतली सहिष्णुता या देशांमध्ये सर्वांच्या मनामध्ये खोलवर रुजलेली आहे आणि त्या अनुषंगाने इथलं हिंदू समाज मन सुद्धा सर्वधर्मसमभाव, भारतीय संविधान आणि तिरंगा झेंडा यांना मनापासून आदर आणि सन्मान देत असते. अशा वक्तव्यानं फक्त ठराविक धर्म जातीच्या समुदायाचाच अपमान होत नसून तमाम हिंदूंच्या सहिष्णतेला गालबोट लावल्यासारखे होते. त्यामुळे संभाजी भिडे या देशद्रोही वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. शासन या संभाजी भिडे यांनी मांडलेल्या मुद्द्याशी सहमत नाही, हे तेवढेच खरं आहे.
मात्र, जर या पद्धतीच्या कृतीचं खंडन किंवा त्यांच्यावर जर कार्यवाही केली नाही तर शासनाच्या हेतूबद्दल सामान्य नागरिकांमध्ये एक प्रकारची शंका निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. ही गांभीर्याची बाब म्हणून शासनाने दखल घ्यावी आणि अशा पद्धतीच्या कृतीचा निषेध करण्यासाठी तमाम सर्वधर्मसमभाव- धर्मनिरपेक्ष भूमिका मानणाऱ्या, भारतीय संविधानाचा सन्मान करणाऱ्या आणि आपल्या तिरंगा झेंड्याला आपल्या प्राणाहूनही जास्त प्रिय मानणाऱ्या समुदायाने याचा निषेध करावा आणि याबाबतीतली निषेधाची व अशा प्रवृत्तीविरोधात कार्यवाहीसाठी शासनाला निवेदन द्यावीत, ही विनंती.