Trump's Greenland Gambit : ट्रम्प ग्रीनलँड विकत घेणार की लष्करी कारवाई करणार ?

डोनाल्ड ट्रम्प एकामागून एक देश आणि भूभाग राक्षसी लष्करी ताकद वापरून आपल्या बुडाखाली आणत सुटला आहे. आता त्याची नजर ग्रीनलँडवर. का एवढी चर्चा होतेय ग्रीनलँडची? काय आहे ग्रीनलॅंडचं महत्त्व? जगातील शक्तिशाली राष्ट्रे का आहेत ग्रीनलॅंडच्यामागे? जाणून घ्या अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर

Update: 2026-01-15 04:50 GMT

Trump Greenland ट्रम्प आणि ग्रीनलँड ! 

आपदा मे धंदे का अवसर ! हीच कुनीती राहिली आहे जागतिक कॉर्पोरेट भांडवलाची. क्लायमेट चेंज, त्यामुळे पृथ्वीवर वाढलेले उष्णतामान, बर्फाच्छादित पर्वतांवरील आणि उत्तर आणि दक्षिण ध्रुवावरील हजारो वर्षे टिकून राहिलेला बर्फ वितळू लागला ही बातमी जुनी झाली. पृथ्वीवरील समुद्राची पातळी वाढून समुद्रकिनारी वसलेली, अनेक देशातील कोट्यावधी माणसांची वस्ती धोक्यात आली आहे. भविष्यात येणार आहे. पर्यावरणावर काम करणारे संशोधक आणि कार्यकर्ते ऊर फुटेस्तोवर असे इशारे देत आहेत. मंद बुद्धी, बधिर, आंधळी, नफा केंद्री कॉर्पोरेट भांडवलशाही काही बघत नाही, ऐकत नाही. उलटे ती प्रणाली याच क्षणाची वाट बघत आहे, या अरिष्टात ती प्रणाली महाकाय भांडवल गुंतवणूकीची, धंदा करण्याची, नफा कमावण्याची संधी बघत आहे. ही पार्श्वभूमी आहे ट्रम्प ग्रीनलँड प्रकरणाला.

ट्रम्प एकामागून एक देश आणि भूभाग राक्षसी लष्करी ताकद वापरून आपल्या बुडाखाली आणत सुटला आहे. तो काही माथेफिरू नक्कीच नाही. तो अमेरिकन महाकाय कॉर्पोरेट क्षेत्राचा मुखंड/ प्रवक्ता आहे. तो म्हणजेच ती प्रणाली आहे. त्याच्या दृष्टीने आता नंबर आला आहे ग्रीनलँडचा. का एवढी चर्चा होतेय ग्रीनलँडची? उत्तर ध्रुवाखालील भल्या मोठ्या प्रदेशात विविध प्रकारची खनिजे तांबे, झिंक, कोबाल्ट, त्लिथियम आणि इतर बरीच दुर्मिळ खनिजे आहेत याची अटकळ अनेक वर्षे होती. पण तेथे साचलेल्या हजारो फूट बर्फामुळे, गेली अनेक दशके तेथे कोणतेही उत्खनन, कितीही भांडवल ओतले असते तरी, अशक्य होते. पण क्लायमेट चेंज मुळे, वाढलेल्या तापमानामुळे, उत्तर ध्रुवावरील बर्फ वितळत आहे. हे बर्फ वितळू लागल्यामुळे आता उत्खनन शक्य होणार आहे. त्याशिवाय बर्फ वितळल्यानंतर व्यापारी जहाजांसाठी भविष्यात नवीन समुद्र मार्ग तयार होण्याची शक्यता वाढली आहे.

ग्रीनलँड, डेन्मार्क, युरोपियन युनियन, नाटो, अमेरिका यांचे परस्पर संबंध, ट्रम्प ग्रीनलँड विकत घेणार की लष्करी कारवाई करणार… कोण कोणाशी सहकार्य करार करणार… या सर्व तांत्रिक बाबी झाल्या. त्या भविष्यात उलगडत जातील. हा सुरू झालेला राडा… नैसर्गिक साधनसामुग्री, येत्या दशकात विविध खनिजांची विशिष्ट दुर्मिळ खनिजांची वाढत जाणारी टंचाई, उत्तर ध्रुवाजवळील स्ट्रॅटेजिक लोकेशन…. यासाठी सुरू झाला आहे.

ग्रीनलँडचे क्षेत्रफळ ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि स्पेन यांच्या एकत्रित क्षेत्रफळापेक्षा देखील जास्त आहे या एकाच गोष्टीवरून ग्रीनलँड चे महत्व अधोरेखित होईल. जगातील इतर शक्तिशाली राष्ट्रे… विशेषतः चीन, रशिया मागे नाहीत. त्यांच्या देखील हालचाली सुरू झालेल्या आहेत. उद्या नाटो संघटनेचे तुकडे झाले तर युरोपातील राष्ट्रीय देखील शर्यतीत उतरणार हे नक्की.

पळा पळा कोण पुढे पुढे तो…. अशा स्पिरीटने जगातील इतर देश देखील तेथे पोचत आहेत. ट्रम्प आणि अमेरिकेला अर्थात इतरांच्या आधी जाऊन कब्जा करायचा आहे.

तरुणांनो…. तुम्हाला जे सांगितले जाते, तुम्हाला जे दाखवले जाते… तुमच्या देशात आणि देशाच्या बाहेर… तो एक भ्रामक पडदा असतो. नेहमीच. खरा गेम अब्जावधी डॉलर्स, रुपये माल कमावण्याचा असतो. त्याचे लाभार्थी तो गेम खेळत असतात. तुम्हाला भलत्याच खेळात गुंतवून ठेवून.

संजीव चांदोरकर


Trump Greenland, Greenland Acquisition, Rare Earth Minerals, Arctic Region, Climate Change, Natural Resources, US Foreign Policy, NATO Alliance, China Greenland, Russia Greenland

Similar News