फडणवीस, ठाकरेंनी आता देवाला रिटायर करायला हवं !

उद्धव ठाकरे म्हणतात मुंबईचे “महापौरपद आपल्याला मिळावे, देवाच्या मनात असेल तर तेही होईल.” ही भाषा संघर्षाची नाही. ही पराभूत मानसिकतेची शरणागती आहे. जबाबदारीपासून पळ काढण्याचा हा सोपा मार्ग आहे. - डॉ. सुभाष देसाई

Update: 2026-01-19 03:26 GMT

Somnath temple सोरटी सोमनाथ मंदिराचा इतिहास हा केवळ एका वास्तूचा इतिहास नाही; तो भारतीय मनोवृत्तीतील एका खोल भ्रमाचा इतिहास आहे. मंदिरावर मूर्तीभंजन झाले, पुजारी मारले गेले, संपत्ती लुटली गेली. आणि प्रत्येक वेळी एकच भ्रम जोपासला गेला : “देव आपले रक्षण करेल.” पण देव काही आला नाही. जे त्या भ्रमात राहिले, ते संपले. जे उरले, त्यांनी पुन्हा मंदिर उभारले देवाच्या नव्हे, तर मानवी इच्छाशक्तीच्या बळावर. मी नास्तिक नाही. पण देवाकडून भलत्याच अपेक्षा करणे स्वतःचा विवेक, विज्ञान, तयारी आणि जबाबदारी बाजूला ठेवून हे केवळ चूक नाही, तर आत्मघातकी महापाप आहे. देवावर विश्वास ठेवण्यालाही काही मर्यादा असतात; त्या ओलांडल्या की विश्वास अंधश्रद्धेत, आणि अंधश्रद्धा विनाशात रूपांतरित होते.

Narendra Modi या देशाचा पंतप्रधान तीन तास एका न पाहिलेल्या देवाची आरती करतो. त्याच वेळी जगातील एका विकसित राष्ट्राचा प्रमुख उपहासाने म्हणतो “ज्यांच्याकडे अशा कर्मकांडासाठी इतका रिकामा वेळ आहे, त्यांना बुलेट ट्रेनसारख्या प्रगत तंत्रज्ञानाची गरजच काय?” हा उपहास केवळ व्यक्तीचा नाही; तो देशाच्या बौद्धिक प्राधान्यक्रमांवरचा प्रश्न आहे. देवावर किती विश्वास ठेवायचा? त्याला काही मर्यादा आहेत की नाहीत? हा प्रश्न आज भारताला गंभीरपणे विचारावाच लागेल.

भारतीय न्यायव्यवस्थेची जगभर फजिती झाली ती एका विद्वान मुख्य न्यायाधीशाच्या निकालामुळे. त्या मराठी न्यायाधीशाने निवृत्तीनंतर दिलेल्या मुलाखतीत कबूल केले “दोन धर्मांतील वादग्रस्त प्रश्न समोर होता, मला काही सुचत नव्हते, म्हणून मी देवाला कौल लावला.” आणि देवाने जसे सांगितले, तसा निकाल दिला! भारतीय इतिहासात इतका हास्यास्पद, अवैज्ञानिक आणि अंधश्रद्धेवर आधारित निकाल आजवर झाला नाही आणि यापुढे होऊ नये, हीच अपेक्षा. एका महाकाव्यातील काल्पनिक देवाच्या जन्मस्थानाचा निर्णय न्यायालय देवाला विचारून ठरवते अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याच्या इतक्या ठळक विरोधात गेलेली घटना दाखवणे कठीण आहे.

या साऱ्यावर कहर म्हणजे मराठा इतिहासातील अण्णाजी पंतांसारखा प्रशासकीय कारभार करणाऱ्या एका नेत्याने, स्वतःची ही प्रतिमा पुसण्यासाठी, “आम्ही देवासारखे भाऊ आहोत” अशा कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती दिल्या. हा देव नव्हता हा जनतेला हसवण्याचा, फसवण्याचा आणि भूलथाप देण्याचा प्रयत्न होता. देवाचा आधार फक्त सत्ताधाऱ्यांचाच नसतो, हेही तितकेच धोकादायक आहे.

प्रबोधनकार ठाकरे यांचा नातू, Uddhav Thackeray महापालिकेत ६५ नगरसेवक निवडून आल्यावर म्हणतो मुंबई “महापौरपद आपल्याला मिळावे, हे स्वप्न आहे. देवाच्या मनात असेल तर तेही होईल. ही भाषा संघर्षाची नाही; ही पराभूत मानसिकतेची शरणागती आहे. जबाबदारीपासून पळ काढण्याचा हा सोपा मार्ग आहे. हे सारे पाहिल्यावर, श्रीराम लागूंनी एकेकाळी केलेले विधान आज अधिकच अर्थपूर्ण वाटते “देवाला आता रिटायर करायला हवे.” इकडे चीन भारताच्या उत्तरेकडील भूभाग गिळत आहे. आणि आपण काशी-अयोध्येत घंटानाद, पूजा, आरत्या करण्यात गर्क आहोत. जो काल्पनिक देव स्वतःचे मंदिर, मूर्ती, भक्त आणि इतिहासही वाचवू शकला नाही तो देव आपले राष्ट्र, आपली सीमा आणि आपले भवितव्य वाचवेल, अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे स्वतःची फसवणूक करून घेणे आहे.

जर संघ आणि भाजपा अशी विचारसरणी बाळगत असतील की देव राष्ट्र वाचवेल, युद्धे जिंकेल, संकटे दूर करेल तर ती केवळ राजकीय भ्रमनिर्मिती नाही; ती राष्ट्रासाठी आत्मघातकी दिशाच आहे. देव श्रद्धेचा विषय असू शकतो. पण राज्यकारभार, न्याय, विज्ञान, संरक्षण आणि भविष्य यांचा आधार देव असू शकत नाही. तो आधार माणसाचा विवेक, विज्ञान, श्रम आणि जबाबदारी असायलाच हवा.

डॉ. सुभाष के देसाई

Similar News