"शरद पवार कशाने ‘इंस्पायर्ड’ आहेत, हे आता अधिक सुस्पष्ट झालं"
उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पहात होता; पण विरोधाभास फार काळ टिकून रहात नाहीत. दोन्ही डगरींवर किती काळ तोल सांभाळणार ! त्यामुळं पवारांनी नेहरु, यशवंतराव यांचा गजर करण्याऐवजी थेट त्यांच्या ‘विद्यार्थ्या’ला मिठी मारावी. तसंही त्यांच्या विद्यार्थ्याला अशा गळाभेटी आवडतातच. म्हणजे त्यांच्या कुटुंबाची सोय होईल आणि महाराष्ट्रही पवारांविषयीच्या संभ्रमातून बाहेर पडेल - श्रीरंजन आवटे
Sharad Pawar Inspire Fellowship शरद पवार इंस्पायर फेलोशिपशी संबंधित समन्वयक नितीन रिंढे यांच्यासह अनेकांनी Yashwantrao Chavan Center यशवंतराव चव्हाण केंद्राच्या कामापासून फारकत घेतल्याचे वृत्त आहे. ही महत्त्वाची कृती आहे. अदानी आणि पवार संबंध होतेच पूर्वीही; पण ज्या प्रकारे पवार कंपनी त्याला शरण गेली आहे ते दु:खद आहे. दुर्दैवी आहे. Sharad Pawar शरद पवार कशाने ‘इंस्पायर्ड’ आहेत, हे आता अधिक सुस्पष्ट झालं आहे.
या फेलोशिपच्या संवादक समितीमध्ये सामील होण्याचं निमंत्रण खा. सुप्रिया सुळे यांनी मलाही दिलेले होते. माझ्यासह काही तरुण लेखकांचा या समितीवर समावेश होता. हे निमंत्रण मी स्वीकारलं होतं. संवादकांनी फेलोज सोबत संवाद करत लेखन प्रक्रिया अधिक सर्जनशील करण्याचा हेतू होता, असे सांगण्यात आले होते; प्रत्यक्षात त्यानंतर या समितीची बैठक किंवा कार्यशाळा झाली नाही. त्यामुळं ही समिती केवळ कागदावरच राहिली.
हे सारं मी पूर्ण विसरुन गेलेलो होतो; मात्र या फेलोशिपच्या वेबसाईटवर संवादक समितीवर माझं नाव असल्याचं मला सांगण्यात आलं. मुळातच डिफंक्ट असलेल्या समितीतून बाहेर काय पडणार ! समितीवर असण्या नसण्यापेक्षाही माझी भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे.
मी २०१९ साली शरद पवारांवर लिहिलेल्या लेखात म्हटलं होतं की पुरोगामी/प्रतिगामी या संज्ञा पवारांसाठी गैरलागू आहेत. ते ऊर्ध्वगामी आहेत. सत्तेच्या दिशेने वर जाणारे. १ ऑगस्ट २०२३ ला मोदींना पवारांच्या हस्ते टिळकांच्या नावे पुरस्कार दिला गेला तेव्हा ‘राष्ट्रवादीचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असे मी लिहिले होते. त्यामुळं माझी भूमिका ही नेहमीच जमातवाद आणि कार्पोरेट भांडवलशाहीच्या मक्तेदारीच्या विरोधात आहे.
या फेलोशिपच्या निमित्ताने एक उदाहरण पहा:
शरद पवार फेलोशिप प्राप्त अविनाश पोईनकर यांनी सुरजागड प्रकल्प हा विकास आहे की लोकांचं विस्थापन करणारा प्रकल्प आहे, असा सवाल उपस्थित करत लेखन केलं आहे. या प्रकल्पाच्या विरोधात ते लढताहेत. या प्रकल्पात अदानी यांची मोठी गुंतवणूक आहे. अदानी यांच्यासोबत कौटुंबिक प्रेमाचे संबंध पवारांचे आहेत आणि त्यांच्याच संस्थेची फेलोशिप या विरोधात लढणाऱ्या व्यक्तीला दिली जाते.
हितसंबंध जोपासणारी यंत्रणा उभी करणं हेच पवारांचं मोठेपण असेल तर त्यांना ते लखलाभ ! उभा महाराष्ट्र त्यांच्याकडे मोठ्या अपेक्षेने पहात होता; पण विरोधाभास फार काळ टिकून रहात नाहीत. दोन्ही डगरींवर किती काळ तोल सांभाळणार ! त्यामुळं पवारांनी नेहरु, यशवंतराव यांचा गजर करण्याऐवजी थेट त्यांच्या ‘विद्यार्थ्या’ला मिठी मारावी. तसंही त्यांच्या विद्यार्थ्याला अशा गळाभेटी आवडतातच. म्हणजे त्यांच्या कुटुंबाची सोय होईल आणि महाराष्ट्रही पवारांविषयीच्या संभ्रमातून बाहेर पडेल.
असो.
-
श्रीरंजन आवटे