आंधीचे (१९७५) लेखक होते कमलेश्वर. दिग्दर्शक आणि गीतकार होते गुलजार. सिनेमात संजीवकुमार आणि सुचित्रा सेनबरोबर ए.के. हंगल, ओम प्रकाश, ओम. शिवपुरी, रहमान, सी.एस.दुबे हे कलाकार होते. संगीत होते राहुलदेव बर्मन यांचे अर्थात सगळी गाणी लोकप्रिय झाली.
फेब्रुवारी १९७५ला रिलीज झालेला हा सिनेमा खरे तर एक कलासक्त आणि मनस्वी कथानक होता. तो समीक्षक सुभाष झा यांना स्व. इंदिराजींच्या जीवनाशी साधर्म्य असलेला वाटल्याने त्यावर बंदी आली! मात्र आणीबाणी उठताच नव्याने सत्तेत आलेल्या जनता पक्षाने ‘आंधी’ सरळ दूरदर्शन या सरकारी वाहिनीवरून पुन्हा रिलीज केला!
सिनेमाला २३व्या ‘फिल्मफेयर पारितोषिक’ समारंभात ७ नामांकने मिळाली होती. ‘सर्वोत्तम चित्रपटाचे’ गुलजार यांना, ‘सर्वोत्तम अभिनेत्याचे’ संजीवकुमारला, सर्वोत्तम अभिनेत्रीचे सुचित्रा सेनना, सर्वोत्तम गीतकार आणि दिग्दर्शनाचे पुन्हा गुलजारनाच (तेरे बिना जिंदगीसे शिकवा तो नही..) आणि सर्वोत्तम कथालेखनाचे नामांकन कमलेश्वर यांना मिळाले होते.
‘आंधी’ची बहुतेक गाणी रोमँटिक असली तरी त्यातली एक कव्वाली जबरदस्त राजकीय व्यंगावर लिहिलेली होती. ‘सलाम किजीये, अली जनाब आये हैं.’ या गाण्याची एकेक ओळ म्हणजे एकेका अग्रलेखाचा विषय आहे. गाणात दिसणा-या सामान्य अभिनेत्यांना फक्त या एका गाण्यासाठी एकेक पुरस्कार द्यायला हवा इतका सुंदर अभिनय त्यांनी केला होता!
निवडणुका आल्यामुळे आरती देवी (सुचित्रा सेन) कार्यकर्त्यांना घेऊन प्रचारासाठी निघाल्या आहेत असा तो प्रसंग गुलजार यांनी चित्रित केला होता. आरतीदेवी निळे काठ असलेली पांढरी साडी नेसून, मारे डोक्यावर पदरबिदर घेऊन, इंदिराजीसारख्या झपाझपा चालत जात असताना रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर गावातील काही तरुण बसलेले दिसतात. विरोधी पक्षाचे ते तरुण आरतीदेवींची खिल्ली उडवण्याकरता गाण्याच्या दोन ओळी नुसत्या तोंडी, पण ठेक्यात म्हणतात-
‘आरती, मनमानती,
कहना क्यो नही मानती?
पाठशालेमे छुट्टी हो गयी,
बस्ता क्यो नही बांधती!’
या ओळी म्हणजे चिडलेल्या जनतेने ढोंगी, राजकारण्यांना दिलेला एक संदेश. ‘निवडणूक आली म्हणजे आता तुमचा काळ संपला! पाच वर्षात तुम्ही जे रंग दाखवले ते पाहिले! आता तुम्हाला पुन्हा निवडून देणार नाही. ‘आपला बस्ता बांधून निघा’ असाच तो इशारा होता-
गुलजार यांनी या कव्वालीत एकंदरच राजकारणी या प्रजातीविषयी लोकमाणसात असलेला क्रोध व्यक्त केला होता. ते उपरोधानेच म्हणतात, ‘यांना सलाम करा, ही केवढी मोठी विभूती आज आपल्या दारी आली आहे. आपल्यासाठी ५ वर्षात केलेल्या कामांचा हिशोब द्यायला त्या आल्या आहेत, म्हणून त्यांना सलामच केला पाहिजे-
सलाम कीजिये, अली जनाब आये हैं!
ये पाँच सालोंका देने, हिसाब आये हैं!
सलाम कीजिये, अली जनाब आये हैं!
हे राज्यकर्ते म्हणजे जणू ‘खुदा’ आहेत! त्यांना गुढगे टेकून नमन करणे हे आपले कर्तव्यच ठरते. तसे केले नाही तर आपण काफिर, म्हणजे नास्तिक ठरू! शिक्षेस पात्र होऊ!
कारण खुदा एकच आहे. मात्र राजकारण्यांना इतका अहंकार असतो की ते स्वत:लाच खुदा समजतात. म्हणून गुलजार ‘खुदा’ हा शब्दाचेही अनेकवचन केले आहे-
जो इन ख़ुदाओंको सजदा करे ना, क़ाफ़िर है!
बस एक वोट नहीं है, ये जान हाज़िर है!
तुमच्याकडे जरी एकच मत असेल तरीही निवडणुकीच्या काळात हे तुमच्यापुढे हात जोडून उभे राहतील. ‘जान हाजीर हैं’ म्हणतील!
पण आता गरीब सामान्य तरुण म्हणतात- ‘आम्ही यांना ओळखतो, यांची खूप कामेही केली आहेत. पोस्टर्स लावलेत, सभेसाठी खुर्च्या-टेबले लावली आहेत. पण आता बस्स! आता नाही!
आम्हाला ५ वर्षांचा हिशोबच हवाय. त्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रचंड संख्येने आलो आहोत. द्या आम्हाला हिशोब-
हाँ..बहुत लगाये-उतारे हैं नामके लेबल,
चलाई कुर्सियाँ हमने, जमाये हैं टेबल..
हिसाब दीजिये, हिसाब दीजिये,
हम बेहिसाब आये हैं..!
राजकारणी मते चक्क पैसे देवून खरेदी करतात हे वास्तवसुद्धा तसे जुनेच आहे! आता तर त्यांना शिव्या देणारे सुशिक्षितही सोसायटीला रंग देऊन घेणे, आवारात बेंच टाकून घेणे अशी ‘वस्तूरूपातील लाच’ संघटीतपणे स्वीकारत असतात! गरीब वस्तीत मात्र हा व्यवहार थेट असतो आणि तो रोख पैशातच होतो! त्याशिवाय कुठे धान्य वाटले जाते, कुठे साड्या-
हमारे वोट खरीदेंगे,
हमको अन्न देकर.
ये नंगे जिस्म छुपा देते हैं,
क़फ़न देकर.
गुलजार यांच्यातला संवेदनशील कवी लपून रहातच नाही. त्या कपड्यांना गुलजार ‘कफन’ म्हणतात. कारण नेत्यांना लोकांच्या जगण्या-मरण्याशी कधी प्रामाणिक देणेघेणे नसतेच! त्यांना निवडणुकीपुरती फक्त हवी असतात लोकांची मते! मग तेवढ्या काळापुरती कामे फटाफट करून दिली जातात. मोठमोठ्या समस्या सोडवण्याची आश्वासने देताना चक्क थापाही मारल्या जातात-
ये जादूगर हैं, ये चुटकीमें काम करते हैं.
ये भूख-प्यासको, बातोंसे राम करते हैं.
कधी लोकांच्या प्रश्नांवर सर्व्हे करून अहवाल मागवतात. तो छापून प्रसिद्धही करतात. पण त्यावर खरी उपाययोजना कधीच होत नाही!-
हमारे हालपे...लिखने किताब आये हैं,
अरे भइ, इसलिये, सलाम कीजिये!
शेवटी जनता थेट आव्हान देते. ‘आमचे जीवन आमचे आहे. त्यावर तुमचा काही अधिकार नाही. जसे आहे तसे असो, पण आमचे जीवन आम्ही कष्टाने उभे केले आहे. तुमच्यासारखी ती पापाची कमाई नाही.’ असे निक्षून सांगताना गुलजार यांचे मतदार राज्यकर्त्यांना इशारा देतात, ‘आता आम्ही फसणार नाही. निवडणुकीच्या वेळी तुम्हाला चांगला धडा शिकवू! तुम्ही मोठमोठ्या घोषणा केल्या होत्या. अगदी ‘क्रांती करू’ असेही म्हणाला होतात ना? आम्ही ते वास्तवाशी ताडूनच पाहू...!
हमारी ज़िन्दगी अपनी है, आपकी तो नहीं!
ये ज़िन्दगी है ग़रीबीकी, पापकी तो नहीं.
ये वोट देंगे मगर, अबके यूँ नहीं देंगे.
चुनाव आने दो, हम आपसे निपट लेंगे.
के पहले देख लें, क्या इन्क़लाब लाये हैं.
यातील ‘ये हमारे लिये इन्कलाब लाये हैं, हां!’ ही ओळ रफिसाहेबानी अशी उपरोधाने उच्चारली होती आणि त्या अभिनेत्याने असा अभिनय केला होता की जनतेच्या मनातील सगळा रोष फक्त एका ओळीत गुलजार यांनी व्यक्त करून टाकला होता. जसे अटलजींनी संसदेत एखादे भाषण करून सरकारचा खोटेपणा अगदी सौम्य, सभ्य शब्दात व्यक्त करावा तशी गुलजारजींची ही रचना! शेवटी म्हणतातच ना 'जहां न पहुंचे रवी, वहा पहुंचे कवी!'
***
©️श्रीनिवास बेलसरे
9969921283