Frontier Gandhi : खुदाई खिदमतगार खान अब्दुल गफ्फार खान लोकभवनावर !

महात्मा गांधींच्या अहिंसक तत्त्वज्ञानाचे पालन करणारे खान अब्दुल गफ्फार खान...त्यांना 'सरहद्द गांधी' या नावाने का ओळखलं जातं? महाराष्ट्रातील लोकभवनातील त्यांच्या आठवणी सांगताहेत लोकभवनचे जनसंपर्क अधिकारी उमेश काशीकर

Update: 2026-01-20 10:23 GMT

Khan Abdul Ghaffar Khan स्वातंत्र्य लढ्यातील एक बुलंद नाव - 'सीमांत गांधी', 'सरहद्द गांधी', 'फ्रॉन्टियर गांधी' म्हणून ओळखले जाणारे  खान अब्दुल गफ्फार खान यांची दिनांक २० जानेवारी ही पुण्यतिथी ! सत्त्याण्णव वर्षांचे दीर्घ आयुष्य लाभलेले व खुदाई खिदमदगार संस्थेचे संस्थापक खान अब्दुल गफ्फार खान मृत्यूच्या एक वर्ष अगोदर आजारी होते. जून १९८७ साली त्यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.

धिप्पाड शरीरयष्टी लाभलेले गफ्फार खान तोवर वयोमानानुसार कितीतरी कृश झाले होते. राज्यपाल डॉ. शंकर दयाल शर्मा व मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी त्यांची बॉम्बे हॉस्पिटल येथे भेट घेतली होती. छायाचित्रामध्ये बॉम्बे हॉस्पिटलचे विश्वस्त भरत कुमार तापडिया व डॉ. बी के गोयल देखील दिसत आहेत. उपचारानंतर काही दिवस गफ्फार खान यांचा मुक्काम लोकभवन (तेव्हाचे राजभवन) येथे होता. त्यांचे चिरंजीव खान अब्दुल वली खान हे देखील त्यांच्यासोबत होते. सरकारने त्यांना भारतरत्न या सर्वोच्च पदवीने सन्मानित केले होते. 'बादशाह खान' म्हणून परिचित असलेल्या खान अब्दुल गफ्फार खान यांचे दिनांक २० जानेवारी १९८८ रोजी पेशावर येथे निधन झाले. वरळीतील एका रस्त्याला खान अब्दुल गफ्फार खान यांचे नाव देण्यात आले.


Similar News