Religious Polarization : सेहर शेखच्या विधानाचे परिणाम गाव खेड्यातील मुस्लीमांना भोगावे लागणार आहेत !

AIMIMच्या मुंब्र्यातील नगरसेविका सेहर शेखच्या विधानामुळे गावखेड्यातील मुस्लीमांना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागेल? विजयाचा उन्माद कोणती परिस्थिती निर्माण करते? सांगताहेत मोहसिन शेख

Update: 2026-01-21 09:33 GMT

कैसा हराया..?

Sahar Sheikh's Statement Sparks Controversy सहर शेखच्या या वाक्यानंतर AIMIM, मुस्लीम आणि धार्मिक ध्रुवीकरण वगैरे अनेक बाबींवर चर्चा सुरू आहे. नेहमी प्रमाणे इथल्या Media मीडियाने या दोन शब्दांना धरून Hindu Muslim हिंदू मुस्लीम सुरू केले आहे. विलास बडे सारख्या कारकुनी लोकांनां यात बडे मुद्दे सारखे विषय दिसत आहेत. भाजपा IT सेल ला अत्यंत आवडीचा आणि त्यांच्या कामाचा विषय मिळाला आहे. एकंदरीत MIM कडून निवडून आलेल्या सहर मुळे हिंदू-मुस्लीम या मुद्द्यांवर आपलं पोट भरणाऱ्या, आपली वोट बँक सेक्युअर करणाऱ्या दोन्हीकडील कट्टरवाद्यांना ते सर्व काही मिळालं आहे त्याची गरज त्यांना त्यांचे अजेंडे आणि त्यांचे केडर चालवण्यासाठी गरजेचे आहे.

पण यातून एक अत्यंत गंभीर आणि घातक गोष्ट मात्र घडते आहे. गाव खेड्यातील मुस्लीम समाजातील सर्वसामान्य लोकांकडे आता इतर समाजातील लोक वेगळ्या नजरेने बघणार आहेत, बघत आहेत. आणि याच त्रास या सर्व राजकारणाशी काहीही घेनदेणं नसणाऱ्या मुस्लीम समाजातील लोकांना भोगावा लागणार आहे. सहर च्या एका वाक्याने, इथल्या मुस्लीम समाजाला कोणत्या परिस्थितीत आणून ठेवले आहे याची जाणीव त्या पोरीला नसणार हे मी खात्रीने सांगू शकतो. पण त्याचवेळी हे देखील नमूद करू इच्छितो की, 'कैसा हाराया..?" हे तीच वाक्य फक्त आव्हाड साहेबांच्यासाठी होत. बाकी इतर कोणताही हेतू त्यामागे नव्हता. पण इथली माध्यमं या सगळ्याचा कसा वापर करू शकतात, याची जाणीव, समज आणि अक्कल त्या पोरीत नाही, तिच्या बापात नाही हे आम्हाला पक्के माहिती आहे. हे दोघे फक्त आपल्या विजयाचा आनंद साजरा करताना उन्मादात मस्ती करून गेले आहेत. आणि त्याचे परिणाम मात्र आता गाव खेड्यातील मुस्लिमांना भोगावे लागणार आहेत.

तुम्हाला हा विषय पूर्ण समजून घ्यायचा असेल तर आपल्याला मुळात प्रकरण काय घडलं आणि त्याची पार्श्वभूमी काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे.

सहर शेख आणि तिचे वडील युनूस शेख हे आव्हाड साहेबांचे कार्यकर्ते. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी साहेबांच्या सोबत काम केलेले आहे. या विधानसभा निवडणुकीत देखील ते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सोबत होते. माझ्या माहितीनुसार सहर हिची आई कोकणी आणि वडील हे युपी चे आहेत. घरात अत्यंत धार्मिक वातावरण. अर्थात हा त्यांचा चॉईस आहे आणि त्याबद्दल कोणाला आक्षेप असायचं कारण नाही. तर या महापालिका निवडणुकीत सहर ला राष्ट्रवादी पक्षाकडून तिकीट हवे होते. त्यासाठी ती उमेदवारी अर्ज दाखल करायच्या एक दिवस आधी पर्यंत तिच्या वडिलांच्या सोबत प्रयत्न करत होती. परंतु तिला उमेदवारी मिळाली नाही. परिणामी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या अंतिम दिवशी ती MIM पक्षात दाखल झाली. इथपर्यंत सगळे ठीक होते.

नंतर तिच्या वडिलांनी आव्हाड यांच्यावर चिखलफेक करायला सुरुवात केली आणि संविधानिक भाषा बाजूला ठेवून त्यांनी प्रचंड प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषा वापरत आव्हाड यांच्याविरोधात दंड थोपटले. आणि पुढचं महत्त्वाच..

"यामुळे इथल्या मुस्लीम समाजातील लोकांना, जे कट्टर मानसिकतेचे आहेत, त्यांना एक नेता जन्माला आल्याचा साक्षात्कार झाला. आता हा साक्षात्कार ज्या लोकांना झाला ती लोक कोण होती..?

तर ती लोक आहेत, युपी, बिहार वाले "भैय्ये मुसलमान...!"

ज्यांना या राज्यातील मुस्लिमांच राजकीय गणित माहिती नाहीत.

ज्यांना इथली सांस्कृतिक गणित माहिती नाहीत.

ज्यांना एकोपा नावाचा प्रकार माहिती नाही.

ही सगळी लोक मुंब्रा सारख्या मुस्लीम बहुल भागात एकत्रितपने राहतात. हा मुस्लीम ghetto आहे. इथं आपण काहीही बोललो तर आपलं काही वाकड होणार नाही हा विश्वास या लोकांना आहे. त्यांना मराठी मुसलमानांना या संकल्पने बद्दल माहिती नाही. माहिती असली तरी या लोकांकडे हा वर्ग "तुच्छ" या नजरेने बघतो. शिव, शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या कडे झुकलेला इथला मराठी मुसलमान त्यांना कधीच पटलेला नाही. इथला मराठी मुसलमान अफझलखानाला या मातीचा शत्रू मानतो, ही बाब या भैय्या मुस्लिमांना प्रचंड खुपते.

तर अश्या भैय्या मुसलमानांना युनूस शेख सारखे लोकात एक नेता दिसला. आपल्या मुस्लीम बहुल भागाचा नेता एक हिंदू कसा असू शकतो..? ही चीड असणाऱ्या वर्गात आपोआप एक आशेचा किरण निर्माण झाला आणि त्यांनी भरभरून मतांच दान युनूस शेख आणि त्यांच्या पक्षाच्या पारड्यात टाकलं आणि सहर शेख तिच्या इतर सहकाऱ्यांच्या समवेत अख्ख पॅनल घेऊन निवडून आली. यानंतर त्यांच्यात एक उन्माद घुसला. आत्मविश्वास शिगेला पोहचला. आणि त्यातून युनूस शेखने विजयी सभेत देखील आव्हाड यांना ललकारलं.. आव्हान दिलं. पोरीने त्यावर कडी करत "कैसा हाराया..?"हा डायलॉग मारला.

महाराष्ट्राच्या मातीच सांस्कृतिक गणित न समजणाऱ्या लोकांनी असच वागणं अपेक्षित आहे. याची समज आपल्या इथल्या मुस्लिमांना मोठ्या प्रमाणात आहे. पण बाहेरून येऊन( विशेषतः उत्तर प्रदेश,युपी मधून) इथं प्रस्थापित झालेल्या मुस्लिमांना या बद्दल काहीच माहिती नाही. आणि माहिती असली तरी त्याशी काही घेणं देणं त्यांना नाही. कारण त्यांना फक्त मुंब्रा सारख्या बहुसंख्य मुस्लीम असणाऱ्या लोकवस्तीच्या ठिकाणीच राहायचं आहे. इथंच आपलं आयुष्य व्यतीत करायचं आहे. आपण काय बोलतो, काय वागतो..? त्याचे काय परिणाम होतात याचा ते विचार करत नाहीत. किंबहुना त्यांची तितकी कुवत नाही. मुस्लीम बहुल भागात राहून आपला कार्यभाग साधायचा.. इतकंच या लोकांना माहिती आहे.

या मातीतला मराठी मुस्लीम हा कायम "महाराष्ट्र धर्म"पाळत आलाय. एकोपा जपत आलाय. पण आता याला सुरुंग लावण्याच काम युपी बिहारचे मुस्लीम समाजातील काही लोक करत आहेत. आणि त्याचा फटका गाव खेड्यातील मुस्लिमांना मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.

माध्यमं काय...TRP च्या नावाखाली हा कलगीतुरा नाचवत राहतील. दोन्हीकडील कट्टरवादी याचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेतील. पण या सगळ्यात या मातीच्या मूळ गुणधर्मांना धक्का लागू नये याची काळजी आता सर्वधर्म समभाव जपणाऱ्या सर्वच समाजातील लोकांनी घेणे गरजेचे आहे...खासकरून मुस्लीम बांधवांनी...!

कारण...इथं आपला "महाराष्ट्र धर्म " धोक्यात आहे..!

Similar News