जातीअंत करायचा आहे? मग धाडस दाखवणार का?

राजस्थानमध्ये तिसरीतील दलित मुलाचा शिक्षकाच्या मारहाणीत मृत्यू झाला. त्यानंतर पुन्हा एकदा जातीअंत कधी, असा सवाल उपस्थित केला जातो आहे. पण यावर उपाय काय आहे, तो उपाय अमलात आणण्याचे धाडस आजच्या समाजात आहे का, असे सवाल उपस्थित करणारा कायद्याचे विद्यार्थी वैभव चौधरी यांचा लेख....

Update: 2022-08-18 06:25 GMT

राजस्थानमधील एका शाळेत इयत्ता 3 री मध्ये शिकणाऱ्या दलित मुलाने मुख्यध्यापकांच्या केबिनमध्ये असलेले पाणी प्यायले म्हणून त्याला मुख्यध्यापकांनी बेदम मारहाण केली, आणि त्या मारहाणीत त्या मुलाचा जीव गेला, म्हणून देशभरातून खूप हळहळ आणि संताप व्यक्त केला जातो आहे. यानंतर "त्या मुख्याध्यापकला फाशी दिली पाहिजे. एवढा शिकलेला तरी त्याला वागायची अक्कल नाही. शिकूनसवरून सुद्धा लोकं मूर्खासारखी वागतात. ही जात मुळापासून नष्ट केली पाहिजे. ही जात खूप वाईट आहे. उच्च शिक्षित असूनही माणसं जातीयवादी उच्चनीच दृष्टिकोन ठेवूनच वागतात, अशा लोकांना फाशी दिली पाहिजे. जात कायमस्वरूपी नष्ट केली पाहिजे" अशा सामान्य प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांना मला सांगायचं आहे की, जात म्हणजे काय पेन्सिलने काढलेली एखादी आकृती आहे का? की जी खोडरबर घेतली आणि पुसून टाकली. जातीजातींच्या मध्ये रोटीबेटीचा व्यवहार करावा लागेल. त्यासाठी आपल्याला आंतरजातीय विवाह करावा लागतील. सगळी माणसं एकमेकांशी नात्यांच्या बंधनाने बांधावी लागतील तेव्हाच जातीचं अस्तित्व नष्ट होऊ शकते. त्यासाठी उच्चशिक्षित तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे. आंतरजातीय विवाह केले पाहिजेत.

जातीचा अंत संघर्षाशिवाय होणार नाही. समाजात परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्याग करावा लागतो. तो त्याग करण्याची तयारी तरूणांनी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. तरच समाजात परिवर्तन घडू शकते. आंतरजातीय विवाह म्हटलं की घरच्यांच्या/भावकीच्या, स्वजातीच्या लोकांच्या विरोधाला सामोरं जाऊन विवाह करावा लागेल, याची जाणीव असली पाहिजे. एकाचवेळी तुम्ही सगळयांना न्याय नाही देऊ शकत. सगळ्यांना आनंदी ठेवू शकत नाही. तुम्हाला एका हाताने घ्यावं लागेल आणि दुसऱ्या हाताने द्यावं लागेल. आंतरजातीय विवाहामुळे काही दिवस कुटुंबाशी वैर होऊ शकतं. ते दुखावले जाऊ शकतात. पण जात घालवायची असेल तर आंतरजातीय विवाह हाच एकमेव मार्ग आहे.

नुसतं जात नष्ट झाली पाहिजे असं बोलून जात नष्ट होत नसते आणि ती होणारही नाही. त्यासाठी काही गोष्टींचा त्याग करावा लागणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून हजारो लोकांनी बलिदान दिलं. स्वतःच्या जीवाची बाजी लावली. पण समाज एक व्हावा म्हणून जातीयवाद सोडून आपण आंतरजातीय विवाह करू शकत नाही. त्याच्या सोबत आपण जगू सुद्धा शकत नाही. दुसऱ्या जातीच्या व्यक्तीला आपण आपला जोडीदार म्हणून सुध्दा निवडू शकत नाही. कुठे स्वातंत्र्याने जगता यावं म्हणून मरणारी माणसं आणि कुठं आपण जातीची भिंती मोठ्या करून त्या चौकटीत राहून जगणारी स्वार्थी, निर्बुद्ध, संकोचीत माणसं.

आई बहिणीवर हात उचलणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना सामोरा जाऊन आई-बहिणींवर काय हात उचलता हिम्मत असेल तर माझ्यावर हात उचला, असं म्हणून स्वतःच्या छातीवर गोळ्या झेलणारा शिरीषकुमार मला खूप मोठा योद्धा वाटतो. खप मोठा क्रांतिकारी वाटतो. पण इथे आपल्याला ना जीव गमवायचा आहे ना कुठलं युद्ध लढायचं आहे. इथे आपल्याला आपल्या मनामध्ये घर करून बसलेल्या शत्रूशी अंतर्गत युद्ध करायचं आहे. त्याच्याशी लढण्यासाठी आपल्याला ५६ इंचाची छातीची गरज नाही तर विशाल हृदयाची, करुणेची, प्रेमाची, बंधुभावाच्या विचारांची, भावनांची गरज आहे तेव्हाच आपण या जात नावाच्या शत्रूचा जो आपल्या सगळ्यांच्या अंतर्मनात घर करून बसला आहे, त्याचा पराभव करू शकतो.

बंधूभाव, करुणा, प्रेम, मैत्री हिच आपली माणूस म्हणून सर्वात मोठी बलस्थानं आहेत. हिच आपली शक्तीस्थाने आहेत. यांच्याच आधारे आपण या शत्रूचा पराभव करू शकतो. त्यासाठी फक्त मनोबलाची गरज आहे. "जातीव्यवस्था पाळून त्याद्वारे गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला आपल्याला फाशी द्यायची नाहीये तर आपल्याला फाशी द्यायची आहे त्या जात मानसिकतेला जी प्रत्येक माणसाला जातीयवादी बनवत आहे. त्यासाठी आपल्याला प्रेमाचा, बंधुभावचा, ज्ञानाचा दिप प्रत्येक व्यक्तीच्या मनात प्रजवलीत करायचा आहे. ज्याच्या प्रकाशात जात नावाचा शत्रू जळून राख होईल."

दलित विद्यार्थ्यांला पाणी प्यायले म्हणून बेशुद्ध होईपर्यंत मारणारी मानसिकता असो किंवा आंतरजातीय विवाह केला म्हणून ऑनर किलिंग करणारी मानसिकता असो. या दोन्ही प्रकारच्या मानसिकतेमध्ये एक कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे जात. भारतीय जनतेच्या विकासाच्या आडे येणारा, त्यांच्या जगण्याच्या मूलभूत अधिकारांच्या आडे येणारा, या एकतेच्या, समानतेच्या विचारांचा एक कॉमन शत्रू आहे ती म्हणजे जात! (जात मानसिकता) या जातीविरोधात जोपर्यंत आपण त्याच्याशी दोन हात करण्यासाठी पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरत नाही, तोपर्यंत आपण या जात नावाच्या शत्रूचा पराभव करू शकत नाही. जातीचा प्रभाव कमी करायचा असेल तर आपल्याला या मानसिकतेवर विजय मिळवावा लागेल. त्या मानसिकतेला आपल्या कृतीतून हरवावं लागेल. पण त्यासाठी अगोदर आपल्याला पूर्ण तयारीनिशी जातीच्या विरोधात शिरीषकुमारसारखं छातीठोकून मैदानात उतरावं लागेल.

माझा कविमित्र सागर काकडे म्हणतो त्याप्रमाणे जातीयवादी लोकांच्या, सनातनी लोकांच्या, धार्मिक-जातीयवादी दंगली घडवणाऱ्या लोकांच्या विरोधात मैदान उतरून त्यांना छातीठोकून सांगावं लागेल की मी या व्यवस्थेविरुद्ध विद्रोह पुकारला आहे, आता तुमच्या एका गोळीवर माझं सुद्धा नाव लिहा. अशी त्यागाची, लढण्याची भूमिका घेऊन जात मानसिकतेच्या विरोधात विद्रोह केल्याशिवाय यातून भारतीय जनतेची मुक्ती होणार नाही. आपल्याला जातीच्या पताका, जातींची ओळख दर्शवणारी नावं,आडनावं, ठिकाणं बदलावी लागणार आहेत.

सगळ्यांना एका धागेत ओवणारी समाजरचना तयार करावी लागणार आहे. जातीधर्माच्या, रंगांच्या, नावांच्या उभ्या केलेल्या मोठ्या भिंती पाडून आपल्याला मानवी चेतनेला आकाश मोकळं करून द्यावं लागणार आहे. तेव्हाच जातीअंताच्या लढाईत आपण जिंकू शकू. माझा कविमित्र सुमित गुणवंत म्हणतो की "काहींनी जात पुसावी, काहींनी आडनाव खोडावं, माणसाला माणसाशी जोडावं. माणुसकीच्या शाळेत प्रवेश करताना असावं दाखल्यावर शिवाजी शेख, महंमद भोसले, भीमराव देशपांडे, विनायक कांबळे आणि असावा एखादा जात नसलेला माणूस!"

मित्रांनो जोपर्यंत आपण या उभ्या केलेल्या जातीयवादाच्या भिंती पाडत नाही तोपर्यंत स्वच्छ निळं शुभ्र आभाळ आपल्याला दिसणार नाही. आज देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झाली. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आपण साजरा केला. पण या अमृतमहोत्सवी दिनी मला एक खंत वाटते ती ही की आपण येणाऱ्या २५ वर्षाच्या काळात देशाला जातीयवादाच्या विकृत मानसिकतेतून बाहेर काढू याची प्रतिज्ञा आजरोजी केली नाही. येणाऱ्या २५ वर्षाच्या काळात देश जेव्हा स्वातंत्र्याचे १०० वर्ष साजरा करेल तोपर्यंत आपण या देशाला जातीयवादी मानसिकतेतून मुक्त करू असा संकल्प आपल्या कोणत्या नेत्याने केला नाही किंवा तो आपणही केला नाही. जातीला धरून जगण्याची सवय येणाऱ्या २५ वर्षाच्या काळात आपल्याला मोडायची आहे. आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याची शताब्दी ही जातीयवादाचा समूळ नायनाट करूनच साजरी करायची आहे, अशी प्रतिज्ञा भारतीय तरुणांनी आज अमृतमहोत्सवा दिनी केली पाहिजे.

©वैभव चौधरी (विधी विद्यार्थी, पुणे.)

Similar News