Pune Challenges-4 : अफाट वेगाने वाढणाऱ्या पुण्यात भविष्यकालीन पाण्याचे नियोजन काय ?
अफाट वेगाने वाढणाऱ्या पुण्यात भविष्यकालीन पाण्याचे नियोजन काय ? तहान लागल्यावर विहीर खोदणार का ? पुणे महापालिका निवडणूक लढविणारा एकतरी उमेदवार यावर उत्तर देईल का? वाचा राजेंद्र कोंढरे यांचा लेख
पुणे शहराची लोकसंख्या 70 लाख आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी 35 लाख मतदार संख्या झाली आहे. पुणे शहराचा आकार बशीसारखा आहे मात्र उपनगरात तशी स्थिती नाही. शहरात पूर्वी वाडे, मोकळ्या जागा, डांबरी रस्ते असल्याने बशीसारख्या पुण्यात पावसाचे पाणी मुरत असायचे. ते भूजल खोल विहिरी, हातपंप, ट्यूब वेल आणि बोअरवेल याने उपसून वापरले जायचे. पूर्वीच्या वस्ती वाड्यामध्ये विहिरी असायच्या. पाणी जमिनीखाली भूगर्भात 30 ते 35 मीटर पावसाचे पाणी झिरपून साठत असते. हे पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आहे.
मात्र पुणे शहरात कोणतीही इमारत बांधताना प्रथम बोअर घेतला जातो. त्यातून त्या इमारतीत त्या बोअरचे पाणी वापरले जाते. शहराच्या उपनगरात कात्रज नऱ्हे आंबेगाव वडगाव धायरी पासून ते वाघोली वडगाव शेरी पर्यंत दाटीवाटीने बांधकामे झाली असून या दाट वस्तीत प्रत्येक इमारतीत बोअर मधून पाणी उपसा सुरु आहे. पण पाणी मुरवण्याची व्यवस्था नाही. शहरात असलेल्या 41 लाख वाहनांपैकी 15 ते 20 लाख वाहने दररोज धुतली जात असतील.
तज्ज्ञांच्या मते भूजल संचय वहन क्षमता :- बेसाल्ट खडकात पाणी साठवण्याचे आणि वाहून नेण्याचे प्राथमिक गुणधर्म नाहीतच. परंतु या खडकाचे विघटन होऊन तयार होणारा मुरूम आणि निर्माण झालेल्या भेगा अशा कारणांमुळे त्यात जलदर प्रस्तर तयार होतो या जलदराची पाणी साठवण्याची क्षमताही साधारणता 4% एवढीच आहे. पुणे शहरात मोठमोठे 25 मजली टॉवर्सचे इमारतींच्या बेसमेंट पार्किंगसाठी जमिनीखाली 2 ते 3 मजली खोदकाम होत असल्याने पुणे शहरातील भूगर्भातील पाण्याची साखळी तुटत आहे. टिळक रस्त्यावरील आमच्या शेजारील एका मोठ्या टॉवरच्या बांधकामाने कात्रज वरून येणारी पेशवेकालीन पाण्याच्या पाईपलाईनवर भरणारी विहीर एकदम आटली.
शहरात झालेल्या बांधकामात अस्तरी करण व काँक्रीटच्या रस्त्यांमुळे पाणी मुरण्याची व्यवस्था संपुष्टात येत आहे. काँक्रीटचे रस्ते करताना Rain Water Harwesting ची व्यवस्था महापालिकेने केलेलीच नाही. इमारतीमध्येही बंधनकारक केली नाही. पुणे शहरात एकूण विहिरी किती आहेत ? किती बुजवल्या गेल्या आहेत ? पुणे शहर व उपनगरात किती बोअरवेल आहेत? याची अद्ययावत माहिती महापालिकेकडे नाही. भविष्यात धरण क्षेत्रात पाऊस कमी पडला तर जी मदतीला येईल अशी पर्यायी व्यवस्था कोलमडलेली आहे.
अपेक्षा आणि गरज :- ग्राउंड वॉटर हार्वेस्टिंग सेल महापालिकेत असावा GSDA विभागाचे सहकार्य घ्यावे. शहरात व उपनगरात असलेल्या खाणींचे रूपांतर तळ्यात करण्याची आवश्यकता शहरातून जाणारा मुठा कालवा आता जमिनीखालून जाणार असून वर तयार होणाऱ्या जमिनीवर झाडे लावून ग्रीन कव्हर होण्याची आवश्यकता आहे. पावसाळ्यानंतर मुळा मुठा या नद्या भूगर्भातील पाण्याने प्रवाहित राहिल्या पाहिजेत अन्यथा पुणे शहराचे मैला सांडपाणी वाहून नेणारे ते उघडे गटार असेल, पावसाचे पाणी भूगर्भात साठवून ते जपून वापरण्याची आवश्यकता अन्यथा पाणी हजार वर्षाचे भूगर्भातील पाणी पण पुणेकर उपसून संपवतील. पाण्यासाठी लाडावलेल्या पुण्यात टंचाईच्या संकटकाळात पुणेकर नेत्यांना लोक सळो कि पळो करून सोडतील.
राजेंद्र कोंढरे
धरणांच्या पाण्याचा अतिरिक्त वापर पुढील भागात घेऊ