National Journalism : भारतीय प्रसारमाध्यमांची विश्वासार्हता नेहमीच वादग्रस्त का ?
पत्रकारितेची सुरुवात कशी झाली? आंतरराष्ट्रीय पातळीवरील पत्रकारितेची मूल्यं नेमकी काय? Reuters वृत्तसंस्थेची कार्यपद्धती कशी आहे ? खोट्या बातम्यांची सुरुवात कुठून झाली? भारतीय प्रसारमाध्यमं 'पत्रकारिता' करण्यात कुठे कमी पडतात ? सांगताहेत ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे
Journalism पत्रकारितेची सुरुवात माझ्या अंदाजाने French फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये सुरु झाली. राजाशिवाय राज्य असू शकतं हे सांगण्याचं कार्य ही पत्रकारिता करत होती. फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये व्यापारी, उद्योजक वर्ग विशेष सक्रिय होता. त्यावेळी जॉइंट स्टॉक कंपन्या स्थापन झाल्या होत्या. हा त्यावेळचा मध्यमवर्ग होता. त्यामध्ये संशोधक, खलाशी, इत्यादींचाही समावेश होता. या वर्गाची स्पर्धा होती फ्रान्समधील राजा, उमराव आणि चर्च यांच्याशी. हा संघर्ष होता. म्हणून मार्क्सने फ्रेंच राज्यक्रांतीच्या मूल्यांचं- स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचं विश्लेषण करताना सांगितलं, स्वातंत्र्य नव्या मध्यमवर्गाला हवं होतं. उमराव आणि नवा मध्यमवर्ग यांच्यामध्ये समता हवी होती, बंधुता म्हणजे उमराव आणि नव्या मध्यमवर्गात हवी.
मात्र या मंथनातून फ्रान्समध्ये व्यक्तीमूल्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, म्हणून मुक्त पत्रकारिता यांची मुहुर्तमेढ रोवली गेली.
फ्रान्समधील क्रांतीचा संबंध अमेरिकन क्रांतीशी होता. अमेरिकेन क्रांतीच्या काळातील एक मोठा विचारवंत बेंजामिन फ्रँकलिन. त्याने खोट्या बातम्या छापण्याचा सिलसिला सुरु केला होता. त्यामुळे पत्रकारिता ही नेहमीच सत्ताधारी वर्गाने वा सत्ताधारी वर्गाशी स्पर्धा करणार्या वर्गाने वापरली होती. अमेरिकेत तर या खोट्या पत्रकारितेने धुमाकूळ घातला होता. क्यूबा स्पेनच्या ताब्यात होता. त्यावर अमेरिकेला नियंत्रण हवं होतं. त्यावेळी अमेरिकन पत्रकारितेने खोट्या बातम्या छापून युद्ध पेटवलं होतं.
मात्र औद्योगिक क्रांती झाल्यानंतर पत्रकारितेत बदल झाले. कारण जॉइंट स्टॉक कंपन्याच्या शेअर्सची खरेदी-विक्री वेगवेगळ्या देशांत होऊ लागली. कंपनीचा फायदा कोणत्या घटकांवर अवलंबून आहे याची माहिती भागधारकांना मिळायला हवी. कारण त्यामध्ये लाखो पाऊंड्स, फ्रँक्स, डॉलर्सची गुंतवणूक होत असे. या काळात रॉयटर्स नावाची कंपनी स्थापन झाली. विविध शेअर मार्केटमधील शेअर्सची अचूक किंमत, त्यामध्ये होणारे चढ-उतार भागधारकांपर्यंत पोहोचवणं हे या कंपनीचं मुख्य काम होतं. त्यासाठी या कंपनीने कबुतरांचा ताफा पाळला होता. पुढे तारायंत्रं आली तेव्हा या कंपनीने हे नवं तंत्रज्ञान स्वीकारलं. ज्युलिअस रॉयटर्स हा जर्मन ज्यू होता. त्याने बस्तान ठोकलं इंग्लडमध्ये. तिथून तो ही कंपनी चालवू लागला. शेअर्सच्या किंमती अचूक असल्या पाहिजेत, त्या किंमतीत का चढ-उतार होतात याबाबतची माहितीही अचूक, ताजी आणि निष्पक्षःपाती असली पाहिजे अशी शिस्त या कंपनीने पाळली.
रॉयटर्स रेटर्स वगळता अन्य कोणतीही कंपनी वा संस्था भागधारकांना म्हणजे गुंतवणूकधारकांना अशी माहिती देत नव्हती. त्यामुळे या कंपनीची वर्गणी हजारो भागधारकांनी भरली. त्यातून रॉयटर्सची वृत्तसेवा सुरू झाली. मी रॉयटर्समध्ये काम केलं आहे. रॉयटर्स मार्केट लाइट या माहिती सेवेचा संपादक होतो. त्यामुळे या कंपनीचा इतिहास, मूल्यं, कार्यपद्धती आत्मसात केली होती.
रॉयटर्सने प्रस्थापित केलेली मूल्यं- बातमी वा माहिती वा विदा ताजी असली पाहिजे, अचूक, संपूर्ण आणि निःपक्षपाती, असायला हवी, आधुनिक पाश्चात्य पत्रकारितेत रुजली. कारण त्यावर अब्जावधी डॉलर्सचे निर्णय अवलंबून असतात. मी २००६ साली रॉयटर्समध्ये रुजू झालो. त्यावेळी न्यूज वा बातम्यांमधून रॉयटर्स कंपनीचं उत्पन्न केवळ ९ टक्के होतं. बातमीदारीतून पैसे मिळत नाहीत मात्र विश्वासार्हता वा क्रेडिबिलीटी मिळते. आणि त्यामुळे फिनान्शिअल इन्फर्मेशन सर्विसचा धंदा वाढतो, त्यामुळे बातमीमूल्यांचं पालन कटाक्षाने करायला हवं अशी शिस्त होती.
बातमीचा ताजेपणा, निःपक्षपातीपणा आणि संपूर्णता याबाबतचे निकष पाळल्यानंतर, मला जाब विचारण्याची हिंमत रॉयटर्सचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर वा सीईओही करत नसे. रॉयटर्समध्ये काम करताना दोन-तीन वेळा माझ्यावर म्हणजे माझ्या टीमने दिलेल्या बातम्यांबाबत मला जाब विचारण्यात आला. मात्र वस्तुनिष्ठता, ताजेपणा आणि निःपक्षपातीपणा याबाबत समाधान झाल्यानंतर दक्षिण आशिया संपादकाने मला क्लीन चिट दिली. माझ्या निर्णयाचं समर्थन केलं. रिपोर्टर्सच्या भरतीबाबत एकाने तक्रार केली होती, त्यावेळीही दक्षिण आशियाच्या संपादकाने त्याला स्पष्टपणे कळवलं की हे अधिकार संपादकाला आहेत, त्याचा निर्णय अंतिम असेल.
भारतातील पत्रकारिता आजही फ्रेंच राज्यक्रांतीतल्या काळातली आहे. विशेषतः भारतीय भाषांमधील. त्यातही मराठीतील. मतं, भूमिका मांडणं याला भारतीय पत्रकारितेत कमालीचं महत्व आहे. टिळक, आगरकर, फुले, आंबेडकर, गांधी, नेहरू इत्यादिंची पत्रकारिता विचार मांडणारी होती. आजही त्यालाच कमालीचं महत्व आहे. बातमी, माहिती देणं. ती देताना ताजेपणा, वस्तुनिष्ठता, निःपक्षपातीपणा या मूल्यांची कास धरणं याला मराठी पत्रकारितेत फारसं स्थान नाही. भूमिका घ्या, असा धोशा असतो.
त्यामुळे आपल्याकडे गोदी मिडियाचा बाऊ केला जातो. दक्षिणेत द हिंदू, डेक्कन हेराल्ड, मल्याळा मनोरमा या सारखी वर्तमानपत्रं आहेत. ही सर्व वर्तमानपत्रं अँग्लोसॅक्सन जर्नालिझमच्या मूल्यांची कमी-अधिक प्रमाणात पाठराखण करतात. त्याशिवाय सन टिव्ही, ईटिव्ही, जया टिव्ही, कैराली अशा अनेक उपग्रह वाहिन्या आहेत. त्यांची मालकी त्या त्या राज्यातील सत्ताधारी वर्गाकडे किंवा राजकीय पक्षांकडे आहे. उदा. कैराली या वाहिनीचं नियंत्रण मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पक्षाकडे आहे. त्यामुळे गोदी मिडिया हा केवळ हिंदी भाषिक प्रदेशांत आणि महाराष्ट्रात आहे.
रॉयटर्सचे संबंध वित्त भांडवलाशी आहेत. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणाशीही आहेत. बिजिंग ऑलिंपिक्सच्या सुमारास रॉयटर्सने धर्मशालामध्ये एक स्ट्रिंजर नेमला. तो रोज दलाई लामा आणि तिबेटी यांच्यासंबंधात बातम्या द्यायच्या. या बातम्या जगभर जायचा. या बातम्या ताज्या, वस्तुनिष्ठ आणि संपूर्ण असायच्या मात्र त्यामधून अमेरिकेच्या हितसंबंधांची पाठराखण केली जायची. धर्मशालामध्ये स्ट्रिंजर नेमण्याचा निर्णय रॉयटर्सच्या केंद्रीय कार्यालयाने घेतलेला होता.
साऊथ एशिया एडिटरचं काम योग्य माणसाची निवड करणं एवढंच होतं. श्रीलंकेमधील यादवी युद्ध संपल्यानंतर म्हणजे एलटीटीईचा निःपात झाल्यानंतर तिथला ब्यूरो रॉयटर्सने बंद केला. हा निर्णयही रॉयटर्सच्या मुख्य कार्यालयाचा होता. २००७ साली रॉयटर्स ही कंपनी जॉन्सन अँण्ड जॉन्सन या कंपनीने विकत घेतली. मात्र रॉयटर्स फौंण्डेशनची मालकी त्या कंपनीकडे गेली नाही. रॉयटर्स न्यूज या ब्रँडची बांधिलकी असलेली मूल्यं कायम राह्यली. आज रॉयटर्सची मालकी लंडन स्टॉकएक्सेंज ग्रुपकडे गेली आहे. मात्र रॉयटर्स न्यूजची मूल्यं बदललेली नाहीत. याला म्हणतात मूल्य रचनेबाबत म्हणजे आपल्या ब्रँण्डबाबत जागरूक असणं.
भारतात असा प्रकार नाही. कारण भारतातील वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या, डिजिटल वृत्त वाहिन्या इत्यादी यांची बाजारपेठ जागतिक नाही. या प्रसारमाध्यमांतून भारताची नाही तर एका विशिष्ट पक्षाची, भांडवलदारांची, समूहाची पाठराखण केली जाते. त्यामुळे त्यांची विश्वासार्हता नेहमीच वादग्रस्त असते. अशी परिस्थिती बीबीसीची नसते. ज्या माध्यमसंस्थेची बाजारपेठ ग्लोबल वा वैश्विक आहे त्याच माध्यमसंस्थांची बातमी वा वृत्तांत वाचले तर आपल्याला ताजी, अचूक, वस्तुनिष्ठ, निःपक्षपाती माहिती मिळते. त्यातील आर्थिक-राजकीय हितसंबंधही ओळखता येतात.
भारतीय प्रसार माध्यमांचे हितसंबंध कमालीचे संकुचित असतात. हिंदू, त्यातही जाती--ब्राह्मण, मराठा इत्यादी. त्याशिवाय राजकीय पक्ष, प्रादेशिक इत्यादी. असो.
पत्रकार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा.
सुनील तांबे
(ज्येष्ठ पत्रकार, लेखक)
(साभार - सदर पोस्ट सुनील तांबे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)