संसदीय राजकारणातील शेवटचे भाषण

भारतीय संसदीय लोकशाहीच्या इतिहासात पंतप्रधानांनी, केंद्रीय मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पक्षांचे किंवा आघाडीचे सरकार अखेरच्या घटका मोजत असताना केलेली काही भाषणे विशिष्ट कारणांनी खूप गाजली. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर दिलेल्या राजीनाम्याने या आठवणी पुन्हा उजाळून निघाले आहेत त्यावर प्रकाश टाकला आहे ज्येष्ठ पत्रकार कमील पारखे यांनी..

Update: 2022-06-30 07:01 GMT

पंतप्रधानपदी असलेल्या पंडित नेहरु, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांच्याकडे बहुमत असल्याने त्यांना कधीही अविश्वास ठरावाला भिण्याचे कारण नव्हते. अविश्वास ठरावाची टांगती तलवार केंद्रातल्या सरकारांना भीती दाखवू लागली ती जनता पक्षाच्या राजवटीनंतरच. बहुमत असूनही बंडाळीमुळे पंतप्रधान मोरारजी देसाई यांना अविश्वास ठरावाला तोंड द्यावे लागले तेव्हा संसदेच्या झालेल्या चर्चेत पंतप्रधान मोरारजीभाईंऎवजी भाषण अधिक गाजले ते त्यांच्या मंत्रिमंडळात असलेल्या जॉर्ज फर्नांडिस यांचे.


अनेक तास चाललेल्या या घणाघाती भाषणात जॉर्ज यांनीं आपल्या सरकारचे जोरदार समर्थन केले. मोरारजी सरकार पडले आणि दुसऱ्या दिवशी चरण सिंग यांचे सरकार आले. या चरण सिंग सरकारमध्येही साथी जॉर्ज फर्नांडिस मंत्री होते आणि पूर्ण यु टर्न घेत जॉर्ज यांनी आपल्या भाषणात चरण सिंग सरकारचे तितक्यात आवेशात समर्थन केले.




 


भारतीय संसदेच्या इतिहासात जॉर्ज फर्नांडिस यांची ही दोन्ही परस्परविरोधी भाषणे उत्तम वक्तृत्त्वाचा एक नमुना म्हणून अनेकदा दाखवली जाते. वक्तृत्व स्पर्धेत एखाद्या विषयाची होकारात्मक किंवा नकारात्मक बाजू कसलेला वक्ता समर्थतेने मांडू शकतो किंवा कसलेले वकील न्यायालयात एकाच खटल्यातील फिर्यादी किंवा आरोपी यांची बाजू मांडून निकाल आपल्या बाजूने येईल याची खात्री देऊ शकतात, अगदी तसेच जॉर्ज यांचे भाषण होते.

याकाळात दूरदर्शनचा उगम झाला नव्हता आणि रेडिओवर लाईव्ह भाषणे देण्याची तेव्हा प्रथाच नव्हती. ऐंशींच्या दशकात टेलिव्हिजन घरोघरी आला आणि लोकसभेच्या सभापतींनी संसदेतील अविश्वास ठरावाची चर्चा दूरदर्शनवर लाईव्ह दाखवण्याची परवानगी दिली. संसद कशी आहे, आपले लोकप्रतिनिधी कसे दिसतात, वागतात हे देशातील लोकांनी यावेळी पहिल्यांदांच पाहिले.

तोपर्यंत देशात एकही खास बातमीसाठी वाहिलेले सरकारी किंवा खाजगी चॅनेल नव्हते. लोकसभा सभापतींनी संसदेचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यास परवानगी दिली हा त्याकाळी खूप मोठा निर्णय मानला गेला होता.

काँग्रेसचे पंतप्रधान नरसिंह राव यांच्या काळात निवडणुका होऊन जनता दलाच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार सत्तेवर आले तेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान एच डी देवेगौडा आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल यांच्या सरकारला अविश्वास ठरावांना सामोरे जावे लागले तेव्हा आघाडी पक्षांतील अनेक मंत्र्यांची, पंतप्रधान देवेगौडा आणि गुजराल यांची आणि विरोधी पक्षनेते अटल बिहारी वाजपेयी यांची भाषणे लोकांनी पहिल्यादांच पाहिली आणि ऐकली.

तेरा महिने टिकललेया वाजपेयी सरकारविरुद्ध अविश्वास ठराव आला, तेव्हासुद्धा असेच अनके तास संसदेत चाललेली चर्चा आणि भाषणे पहिली आणि ऐकली गेली. संसदेच्या कामकाजाच्या लाईव्ह प्रक्षेपणांमुळे राजकारणी नेत्यांना थेट मतदारांसमोर आपली आणि आपल्या पक्षांची भुमिका मांडणे शक्य झाले. त्याकाळची भाषणे मला आजही आठवतात.




 


काँग्रेस पक्षाने सरकारचा पाठिंबा काढल्यावर चिडलेले पंतप्रधान देवेगौडा हे बाकावर हात आपटून `मी पुन्हा येईन', `मी पुन्हा येईन' असे खासदारांना आणि देशातील लोकांना बजावत होते. अलीकडच्या काळात भाजपच्या देवेन्द्र फडणवीस यांनी हे वाक्य पुन्हा पुन्हा उच्चारले तेव्हा अनेकांना देवेगौडा यांची आठवण आली असेल.

त्याकाळात देशातील आम जनतेने संसदेतील अविश्वास ठरावांच्या या चर्चा या तीन वर्षांच्या कालावधीत जितके मन, कान आणि डोळे लावून ऐकल्या, पहिल्या तसे संसदीय कामकाज नंतर कधीही पाहिले नाही आणि भविष्यात कधी पाहिलं असे मला वाटत नाही. जशी `रामायण' किंवा `महाभारत' मालिकांना लाभलेला प्रतिसाद भविष्यात कुठल्याही मालिकेला लाभण्याची शक्यता अगदी कमी आहे.

कुठलाही मंत्री, राजकारणी नेता अशी संधी डावलणे शक्यच नव्हते, अनेकांनी या संधीचा पुरेपर फायदा घेतला. फर्डे एकटे असणाऱ्या वाजपेयी यांचे उर्दूमिश्रित ओघवते भाषण लोकांनी अनुभवले आणि त्यास कौतुकाची दादसुद्धा दिली. लाल कृष्ण अडवाणी यांची मुद्देसूद मांडणी मला आजही आठवते. व्यक्तिगत जहरी टीका आणि अति टोकाचा आक्रस्ताळेपणा असा कुणाच्या भाषणात नसायचा,

गेल्या काही वर्षांपासून कुठल्याही भाषांतील बातम्यांच्या वाहिनींचे कार्यक्रम पाहणे मी पूर्णतः बंद केले आहे, वृत्तपत्रेही फार वाचत नाही, त्यामुळे मानसिक स्वास्थ राखण्यास मदत होते, निष्कारण चिडचिड कमी होते असा व्यक्तिगत अनुभव आहे. मात्र इथे फेसबुकवर आणि मोबाईलवर कायम असतो, त्यामुळे अचानक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे थेट भाषण चाललेले दिसले आणि मग उरलेसुरलेले भाषण ऐकले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली मते मांडण्यासाठी `मन कि बात' ची मदत घेतात किंवा बातमीच्या एका विशिष्ट वाहिनीला मुलाखत देतात तसे उद्धव यांनी फेसबुक लाईव्ह हे माध्यम स्वीकारले आहे असे दिसते.




 


ठाकरे यांच्या भाषणाविषयी आणि त्यांचा व्यक्तिमत्वाविषयी मते व्यक्त झाली आहेत. मीसुद्धा इथे व्यक्त झालो आहे. मुख्यमंत्री म्हणून बळजबरीने खुर्चीवर बसवले गेलेले उद्धव ठाकरे आणि आता सत्तेतून पायउतार झालेले उद्धव ठाकरे यांच्यात अविश्वसनीय आणि सकारात्मक बदल झाला आहे या भाषणातून दिसले.

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे व्यक्तिशः उद्धव ठाकरे यांना किंवा त्यांच्या शिवसेना या पक्षाला कधीही समर्थन न दिलेल्या असंख्य लोकांना आपल्या बाजूने वळवण्यास त्यांना यश आले आहे हे त्यांचे भाषण संपल्यानंतर व्यक्त झालेल्या प्रतिक्रियांतून दिसते.

Camil Parkhe June 30, 2022

Tags:    

Similar News