Hindu धर्म सहिष्णू आहे तो संघी हिंदूंमुळे की मूळ हिंदूंमुळे?

भगवाच हवा, तिरंगा नको; वंदे मातरमच हवे, जन गण मन नको म्हणणारे संघी हिंदू 'सहिष्ण' कसे काय म्हणायचे? कोणत्या अर्थानं?

Update: 2025-12-02 10:15 GMT

Hindu हिंदू धर्म सहिष्णू आहे ! असं संघवाले म्हणतात तेव्हा विचारी माणसांना पुढचा प्रश्न पडला पाहिजे की, हिंदू धर्म सहिष्णू आहे तो संघी हिंदूंमुळे की मूळ हिंदूंमुळे?

संघाची स्थापना 1925 आणि हिंदू महासभेची 1915 ची. हिंदू महासभेची स्थापना हेच संघी हिंदूंचं मूळ धरलं तरी 110 वर्षांचा संघी हिंदूंचा राजकीय इतिहास आहे. हिंदू त्याआधीही अस्तित्वात होता. Congress काँग्रेसची स्थापना 1885 ची आहे. काँग्रेस हीच मूळ, लिबरल हिंदूचा पक्ष होती. संघ, जनसंघ, हिंदू महासभा यांना हिंदूंमध्येच जनाधार नव्हता कारण मूळ हिंदूंना संघी हिंदुत्व (ब्राह्मण्य) पसंत नव्हतं, आजही नाही.

संघ नव्हता तरी संघी हिंदू होते, अल्प प्रमाणात का असेनात, एकाच जातीत का असेनात होते हे मात्र खरं आहे. नाव संघ नव्हतं पण द्वेष, तिरस्कार, असमानता, सुधारणेला विरोध करणारे हिंदू होतेच. संघाची विचारधारा त्याच हिंदूंची विचार वारस आहे.

हिंदू धर्म सहिष्णू होता पण तो ज्या ज्ञानोबा-तुकोबांमुळे अधिक सहिष्णू होता त्यांना संघ आज ज्याचा वाहक आहे त्या सनातनी विचाराच्या हिंदूंनी त्रासच दिला आहे. चार्वाकाला त्रास दिला आहे. कबीराला त्रास दिला आहे. सती प्रथेला विरोध करणाऱ्या राजा राममोहन रॉय Raja Ram Mohan Roy यांना विरोध केला. महाराष्ट्रात महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. आंबेडकर, महर्षि कर्वे यांना विरोध केला, आगरकरांना विरोध केला, लोकहितवादींना विरोध केला. काल परवा पर्यंत गांधी, दाभोलकर पानसरेंना मारणारे हिंदुत्ववादी हे 'सहिष्णू हिंदू' कसे? कोणत्या अर्थानं?

RSS's ideology संघाच्या स्थापनेनंतर तर संघी हिंदूंच्या तथाकथित सहिष्णूपणाचा कळस झाला. 'आम्ही संविधान मानणार नाही' असं गोळवलकर म्हणाले, संविधान निर्मात्या बाबासाहेबांची संभावना 'आधुनिक मनू' अशी केली. हिंदू मुलीला समानता देणारे बाबासाहेबांचे हिंदू कोड बील यांनीच जाळले. जमीन सुधारणांना विरोध यांनीच केला. विधवा विवाहाला विरोध, आंतरजातीय विवाहांना विरोध, मुलींच्या शिक्षणाला विरोध, धर्मनिरपेक्षतेला विरोध, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध, घटनेच्या प्रत्येक मूलभूत तत्वाला उघड किंवा छुपा विरोध करणारे संघी 'सहिष्णू हिंदू' कधी झाले? भगवाच हवा, तिरंगा नको; वंदे मातरमच हवे, जन गण मन नको हे म्हणणारे संघी हिंदू 'सहिष्ण' कसे काय म्हणायचे? कोणत्या अर्थानं?

अस्पृश्यतेचा पुरस्कार करणारा, सती प्रथेचं समर्थन करणारा कट्टरतावादी हिंदू कोणत्या अर्थानं सहिष्णू असतो?

तेव्हा आमचा धर्म पहिल्यापासूनच सहिष्णू आहे वगैरे सांगून कोणी संघी या बाजूला येऊन इकडचेही फायदे उपटायला सिद्ध होतो, तेव्हा आपण त्याला सांगितलं पाहिजे की हिंदू धर्म सहिष्णू आहे पण त्याच्या सहिष्णूतेला मारणारी तुझीच परंपरा आहे. असलाच हिंदू धर्म सहिष्णू तर तो मूळ हिंदूंमुळे आहे, सनातनी संघी हिंदूंमुळे नाही. सनातनी हिंदूंमुळे तो सहिष्णू नव्हता, नाही, असणारही नाही. असं कधीच होणार नाही पण चुकून झालंच तर ज्या दिवशी मूळ हिंदू नामशेष होऊन फक्त संघी हिंदू उरेल तेव्हाचा हिंदू धर्म भयानक असेल. त्या हिंदू धर्माला संविधान नको तर मनुस्मृती हवी असेल. तेव्हा तुमच्यासमोर जेव्हा जेव्हा हिंदू धर्म सहिष्णू आहे म्हणेल तेव्हा तेव्हा त्याला आपण मूळ हिंदूंचा धर्म सहिष्णू आहे, तुझा नाही असं सांगून वस्तुस्थितीची समज दिली पाहिजे.


विश्वंभर चौधरी

सामाजिक कार्यकर्ते

Similar News