संयुक्त राष्ट्र संघाच्या ध्वजाबरोबर भारताचा राष्ट्रीय ध्वज लावण्याचे नियम काय आहेत?

Update: 2022-01-25 10:45 GMT

आपल्या देशाचे राष्ट्रपती, आपल्या देशाचे पंतप्रधान, परराष्ट्र मंत्री जेव्हा परराष्ट्र दौऱ्यावर जातात. तेव्हा आपला राष्ट्रध्वज त्यांच्या भाषणादरम्यान तुम्हाला व्हिडीओमध्ये, छायाचित्रामध्ये पाहायला मिळतो. आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगवेगळे करार होत असतात. अनेकदा झालेल्या करारासंदर्भात देशाचे पंतप्रधान माहिती देत असतात. परंतू जेव्हा देशाचे पंतप्रधान देशाला माहिती देत असताना त्यांच्या मागे राष्ट्रध्वज लावला जातो. किंवा अनेक देश एकत्र आल्यानंतर त्या–त्या देशाचे राष्ट्रीय ध्वज लावले जातात. मात्र, हे राष्ट्रीय ध्वज लावण्याचे नियम, कायदे तुम्हाला माहित आहे का? काय आहे नियम जाणून घेऊयात...



 


इतर देशांच्या व संयुक्त राष्ट्रांच्या ध्वजाबरोबर राष्ट्रीय ध्वज लावण्याचे नियम

ज्यावेळी इतर देशांच्या ध्वजांबरोबर एका ओळीत ध्वज लावले असतील. त्यावेळी राष्ट्रीय ध्वज सर्वांत उजव्या बाजूला असेल. म्हणजे जर एखादी व्यक्ती ओळीच्या मध्यभागी लोकांकडे तोंड करून राहिली तर राष्ट्रीय ध्वज व्यक्तीच्या सर्वांत उजव्या बाजूला असेल.

राष्ट्रीय ध्वजानंतर इतर देशांचे ध्वज त्यांच्या इंग्रजी नावांच्या वर्णानुक्रमे लावण्यात येतील. अशा वेळी राष्ट्रीय ध्वज ओळीच्या सुरुवातीला, ओळीच्या शेवटी व वर्णानुक्रमे येणाऱ्या क्रमाप्रमाणे लावण्यास अनुमती आहे. राष्ट्रीय ध्वजाचे सर्वात पहिल्यांदा आरोहण केले जाईल व सर्वात शेवटी अवरोहण केले जाईल.



 


ज्यावेळी ध्वज खुल्या गोलांमध्ये म्हणजे किमान किंवा अर्ध गोलात लावले जाणार असतील, त्यावेळी सुद्धा या विभागातील अगोदरच्या कलमानुसारच व्यवस्था केली जाईल. ज्यावेळी ध्वज बंदिस्त गोलांमध्ये (पूर्ण गोलात ) लावले जाणार असतील, त्यावेळी राष्ट्रीय ध्वज ही गोलाची सुरुवात असेल व इतर देशांचे ध्वज घड्याळाच्या काट्याच्या दिशेने लावले जातील. व शेवटचा ध्वज राष्ट्रीय ध्वजाच्या जवळ असेल. गोलाची सुरुवात व शेवट दर्शविण्यासाठी निराळ्या ध्वजांची आवश्यकता नाही. अशा बंदिस्त गोलामध्ये राष्ट्रीय ध्वज आकारविल्हे क्रमानुसार लावला जाईल.

ज्यावेळी राष्ट्रीय ध्वज भिंतीवर दुसऱ्या आडव्या ध्वजदंडाबरोबर लावला जाईल, त्यावेळी राष्ट्रीय ध्वज उजव्या बाजूला म्हणजेच ध्वजाच्या आपल्या उजव्या बाजूला असेल. त्याचा दंड दुसऱ्या देशाच्या ध्वजाच्या दंडाच्या पुढे असेल.



 


ज्यावेळी राष्ट्रीय ध्वजाबरोबर संयुक्त राष्ट्रांचा ध्वज लावण्यात येईल, त्यावेळी तो राष्ट्रीय ध्वजाच्या कोणत्याही बाजूला लावला तरी चालेल. सर्वसाधारणपणे राष्ट्रीय ध्वज सर्वात उजव्या बाजूला लावण्याची पद्धत आहे.

राष्ट्रीय ध्वजाबरोबर इतर देशांचे ध्वज लावले जातील, त्यावेळी सर्व ध्वजदंड सारख्या आकाराचे असतात. आंतरराष्ट्रीय संकेतानुसार शांततेच्या काळात एका देशाचा ध्वजदंड दुसऱ्या देशाच्या ध्वजदंडापेक्षा वर असण्यावर बंदी आहे.

एकाच ध्वजदंडावर इतर ध्वजाबरोबर किंवा ध्वजांबरोबर राष्ट्रीय ध्वज लावला जाणार नाही. प्रत्येक ध्वजाला वेगळा ध्वजदंड असेल.

Tags:    

Similar News