Mark Tully Death New एके काळी संपूर्ण भारताच्या कानावर दोन आवाज पोहोचणे अटळ होते. अमीन सयानी आणि मार्क टुली. अवघ्या जगाची आणि भारताची खबर पोहोचवणारे मार्क आज गेले. Aparna Velankarr यांच्यामुळे २०१४ च्या Lokmatदिवाळी अंकासाठी या अस्सल भारतीय पत्रकाराशी संवाद साधता आला होता.
निरंतर आशा, सर मार्क टुली !
(दिल्लीच्या निझामुद्दीन स्टेशनपासून दहा मिनिटाच्या अंतरावर सर मार्क टुली रहातात. दक्षिण आशियातील बी.बी.सी.चे मुख्य प्रतिनिधी ही जबाबदारी त्यांनी 30 वर्षं सांभाळली. पत्रकारितेमधील विश्र्वासार्हता म्हणजे मार्क टुली असं समीकरण कोट्यवधी आजही जनतेच्या मनात घर करून आहे.ब्रिटन सरकारनं नाइटहूड व भारत सरकारनं पद्मभूषण देऊन त्यांच्या कार्यचा गौरव केला आहे. त्यांची राहणी खूपच साधी आहे. घरामध्ये सुध्दा अजिबात बडेजाव नाही. उत्तमोत्तम चित्रं , आदिवासींनी केलेली हस्तकला आणि ग्रंथसंपदा यांनी त्यांचं अभिरूची संपन्न घर भरून गेलं आहे. )
जन्मानं मी बंगाली आहे. माझे वडील ब्रिटिश रेल्वेत नोकरीला होते. त्यांची नेमणूक कलकत्यात झाली होती. माझं लहानपण कलकत्यातच गेलं. पाचव्या वर्षी मला दार्जीलिंगच्या ब्रिटिशनिवासी शाळेत घातलं. लहानपणी आई-वडीलांपेक्षा माझ्या वाट्याला सांभाळ करणारी आयाच अधिक आली. त्या काळात आमच्यासाठी अतिशय कडक आचारसंहिता होती. कुठल्याही भारतीय मुलांशी अजिबात खेळायचं नाही. हिंदी वा बंगाली शब्दसुध्दा उच्चारायचा नाही. एकांतवासात मी गोट्या खोळायचो. झुकझुक करीत जाणारी रेल्वे पाहण्यात मी हरखून जात असे. माझं रेल्वेप्रेम लहानपणापासून आजतागायत तसंच राहिलं. उलट वाढत गेलं आहे. एका वेळी असंख्य प्रवाशांची ने-आण करण्याची सोय करणारी, देशाटनाचा आनंद व आत्मविश्र्वास निर्माण करणारी रेल्वे ही कोट्यवधी लोकांसाठी विलक्षण सोय व साधन आहे. रेल्वे प्रवासात तुम्हाला समूहात राहता येतं, एकांतवासही मिळू शकतो, समाजातील सर्व स्तर पाहता येतात. त्यामुळे मी आजही (वयाच्या 78 व्या वर्षी )प्रवासाकरिता उत्तम रेल्वेच पसंत करेन. नाईलाजानं मला विमान प्रवास करावा लागतो. त्यामुळे रेल्वेकडे दुर्लक्ष करणाऱया सरकारी वृत्तीविषयी मला अजूनही संताप येतो. आज विमानतळांना लखलखित करून मिरवत आहेत; परंतु विमानांपेक्षा कैक पटींनी अधिक प्रवांशांची जीवनरेषा असणाऱया रेल्वेस्थानकांची केवळ उपेक्षा केली जाते. रेल्वेच्या दारात उभं राहून पाहणं आनंदायी आहे. परंतु उघड्या दारांना बंद करणं आवश्यक आहे. मुंबईमधील लाखो लोकांच्या लोकलची अवस्था भीषण आहे. रेल्वेंमध्ये सुधारणा ही प्राथमिकताच दिसत नाही. रेल्वेमध्ये गुंतवणूक वाढवली पाहिजे. अधिक स्वायत्तता देऊन राजकीय हस्तक्षेप कमी केला पाहिजे. खाजगीकरणाला माझा विरोध नाही परंतु सार्वजनिक सेवा हा उद्देश महत्त्वाचा असल्यामुळे, रेल्वे ही सार्वजनिक क्षेत्रातच असावी. खाजगी उद्योगांकरिता केवळ नफा आणि नफा हीच प्राथमिकता असते.
पुढे माध्यमिक शाळेसाठी मला ब्रिटनला पाठवलं. व्हिक्टेरियन धाटणीचे सभ्य गृहस्थ (जंटलमन)तयार करणं हाच ब्रिटिशशाळांचा मुख्य उद्देश होता. अतिशय निर्बंधाचं वातावरण असे. ग्रीक व लॅटिन दोन्ही भाषांमध्ये मला चांगली गती होती. मी चर्चला मनोभावे नित्यनियमाने जात होतो. त्यावेळी धर्मोपदेशक होण्याची आकांक्षा माझ्यात बळावत होती. परंतु काळाच्या ओघात धर्मशास्रापासून (थिऑलॉजी) मी पत्रकारितेकडे वळालो आणि बी.बी.सी (ब्रिटिशब्रॉडकास्टिंग कॉरपोरेशन)रेडिओमुळे पुन्हा एकदा 1965साली भारतात आलो. तो काळ भारतासाठी संथगतीचा होता. कुणाला, कसलीही घाई, गडबड नाही. घड्याळाशी फारसा संबंध नाही. सत्यजित राय यांच्या `शतरंज के खिलाडी 'मध्ये दाखवलंय त्याप्रमाणे काळ हा अनंत असल्याची जाणीव व्हायची. सरंजामदारीचे गुण ठायी ठायी जाणवत. नोकरशहांच्या `परवाना राज्य' पध्दतीमुळे खुलेपणा अजिबात नव्हता. औद्योगिक उत्पादन संख्येनी व गुणवत्तेमध्ये कमी दर्जाचं होतं. शेतीची स्थिती शोचनीय होती. मात्र नंतरच्या काळात भारतानं कात टाकल्यामुळे आज परिस्थिती पालटून गेली आहे. समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रचंड बदल घडून आला, गतीमानता आली. सार्वजनिक जीवनातील पूर्णविराम गायब होऊन स्वल्पविराम आला. गरीबांनासुध्दा त्यांची परिस्थिती बदलण्याची उर्मी आली. मध्यमवर्गीयांच्या संख्येमध्ये आणि सांपत्तिक स्थितीमध्ये कमालीची वाढ होत गेली. वीज, टेलिव्हिजन व मोबाईल छोट्या गावापर्यंत गेले. देशभर आत्मविश्र्वास जाणवू लागला(जो पूर्वी अभावानंच जाणवत होता).एकंदरित संपूर्ण भारताच्या जीवनशैलीमध्ये झपाट्यानं बदल हेत गेले.
अनेक खाचखळगे , बिकट प्रसंग यातून भारतीय लोकशाही तावून सुलाखून निघत आहे. 1948, 1977, 1984, 1991 व 2014 हे टप्पे, मला महत्त्वाचे वाटतात. गांधीजींची हत्या झाल्यावर भारताचं काय होईल ? असा संपूर्ण जगाला प्रश्र्न पडला होता. मध्ययुगातील वातावरण , दारिद्य्र व अज्ञानाचा अंधार दाटला होता. आणीबाणीच्या काळातील लोकशाहीचा संकोच दूर कसा होईल ? असं वाटत होतं. 1984 साली इंदिरा गांधींच्या हत्त्येनंतर शिखांची कत्तल झाली. या जखमा लवकर भरून निघत नसतात. परंतु अशा सर्व विपरित परिस्थितीतून देश सावरत गेला. भारतीय समाज हा बहुविधता मानणारा व सहिष्णू आहे. धर्मांधतेला तो थारा देत नाही. लोकशाही हळूहळू मुरत आहे.
इंदिरा गांधी, राजीव गांधी, अटलबिहारी बाजपेयी, मनमोहन सिंग या सर्वांशी माझे जवळचे संबंध होते. त्यांची तुलना करणं अयोग्य व अप्रस्तुत आहे. 1977 साली जनता पक्षाचे सरकार आले. भारतीय इतिहासातील तो वळणबिंदू होता. पंतप्रधान झाले मोराररजी देसाई यांनी प्रशासन पध्दतीमध्ये बदल करण्यावर भर दिला. ब्रिटीशांच्या कारभाराचे अवशेष नष्ट करण्यास आरंभ केला. त्यांची प्रशासनावर खूप चांगली पकड होती. परंतु त्यांना पुरेसा काळ मिळण्याआधीच सरकार कोसळले , याचं मला फार वाईट वाटलं. राजीव गांधीं हे प्रामाणिक व सज्जन होते. त्यांनी अनेक नव्या योजना आखल्या. परंतु त्याची त्यांना अंमलबजावणीच करता आली नाही. प्रशासनाचा ताबा नोकरशाहीचा उतरंडीकडे आहे. कुठल्याही उत्तम कल्पनेचा पुरता विचका करण्याचं कौशल्य त्यांच्याकडे आहे, याची जाणीव होईपर्यंत पाच वर्षं निघून जातात. गंगा स्वच्छ करण्याची मोहिम त्यांनी अगदी वेळेवर हाती घेतली, निधी ओतला. परंतु प्रत्यक्ष कृती काहीही झाली नाही.
पत्रकारितेमध्ये असल्यामुळे मला एकाच वेळी राजधानीतून खेडं पहाता येत होतं. वाडी-वस्तीमधून दिसणारी दिल्ली अनुभवण्यासाठी मी सर्वत्र भटकत होतो. दिल्लीतून आखल्या जाणाऱया योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणीत वाट लागते, हे समजून घेत होतो. त्यामुळे स्थूल व सूक्ष्म, वस्तुनिष्ठ व व्यक्तीनिष्ठ , शहरी व ग्रामीण , श्रीमंत व गरीब अशा अनेकांगांनी देश तपासता येतो. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या विषयपत्रिकेत दारिद्य्र निर्मूलनाला प्राथमिकता होती.त्यांची धोरणेदेखील चांगली होती. परंतु अंमलबजावणी वाईट होती. हे अगदी अलिकडचं उदाहरण झालं. मागील अनेक सरकारांच्याबाबतीत असाच अनुभव आला.
भारतामधील नोकरशाहीची मानसिकता अजूनही ब्रिटिशसरकार सारखीच वाटते. बाबूगिरी अंगातून जातच नाही. पोलिस यंत्रणा भयानक ाtढर आहे. सर्वसामान्याला न्याय्य वागणूक मिळण्याची शक्यता नाही, असं सगळं अप्रामाणिक वातावरण असतं. एखादा हुशार व होतकरू तरूण भारतीय प्रशासन सेवेत दाखल झाला तर काही दिवसात तोसुध्दा भ्रष्ट आचारात सामील होऊन जातो. मग निस्पृह अधिकारी कसे मिळणार? या वातावरणात करिअर करावं असं `विचारी'तरूणांना वाटेल का ? आपले कित्येक जटील कायदे ही ब्रिटीशांची देण आहे. कायदा गुंतागुंतीचा करून विलंब वाढवणं ही ब्रिटीशांची गरज होती. आपण त्यांना कधीच लाथाडायला हवं होतं. यापासून मुक्तता करण्याची राजकीय इच्छा दिसत नाही.
नोकरशाही व अभिजन वर्ग तीच सरंजामी मनोवृत्ती बाळगून आहे. गरीबांविषयी, खेड्यांविषयी आणि शेतीविषयी तीव्र तुच्छता देशासाठी घातक ठरत आहे. भारत कृषीप्रधान असूनही शेतीची परवड काही थांबत नाही. शेतमालाच्या उत्पादनात भरपूर वाढ झाली पण साठवणूक, प्रािढया व पीमध्ये सुधारणा करण्यास अग्रामच दिसत नाही. धान्य साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे लाखो टन धान्याची नासाडी होते. एकीकडे भुकेले, कुपोषित आणि दुसरीकडे धान्याचा विनाश अशा भयंकर वास्तवाला काय म्हणावं ? धान्याची नासाडी हा गुन्हा मानला पाहिजे. शेती व्यवहाराला सरंजामीतून बाहेर काढून आधुनिक करण्यात शेतकरी नेतेसुध्दा पुढाकार घेत नाहीत. शेतमालाच्या पी व्यवस्थेमध्ये दलालांचेच फावते. उत्पादक शेतकऱयांचा रयतु बाजार करता येणं सहज शक्य आहे. लाखो एकर पडीक जमीनीला लागवडीखाली आणण्यासाठी ठोस प्रयत्न दिसत नाहीत. खर्च वाढत आहे परंतु उत्पन्नामध्ये भर पडत नाही, कमी व्याजात कर्ज मिळत नाही. शेतकऱयासाठी आशादायक काहीच घडत नाही. या संपूर्ण यंत्रणेच्या अपयशामुळे शेतकरी आत्महत्येच्या कडेलोटाकडे जात आहेत. उत्पादकांची ही उपेक्षा लाजीरवाणी आहे. मोठमोठ्या उद्येागांना भरमसाठ सवलती देताना छोट्या व कुटीर उद्योगांकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे. सुंदर कलाकुसर करणारे विणकर व हातमाग हे आपलं भांडवल आहे. त्यांना जपलं पाहिजे.
उदयाला आलेला थोर मध्यम वर्ग (पवन वर्मा यांची संज्ञा)अभिजन वर्गाच्या दिशेने निघाला आहे. तो केवळ चंगळ करण्यात मग्न झाला आहे. आर्थिक स्तर उंचावण्यामुळे येणाऱया जबाबदारीचं त्यांना भान नाही. उदारीकरणानंतर मध्यमवर्ग ज्या वेगानं श्रीमंत होत गेला त्या मानानं गरीबांची अवस्था सुधारली नाही. कुपोषितांची संख्या व बालमृत्यूमधील वाढ हे त्याचं निदर्शक आहे. खेड्यात राहून भागत नसल्यामुळे दररोज हजारो लोक नाईलाजानं स्थलांतरित होत आहेत. लोक दारिद्र्याचा अंत घडवण्याचं गांधीजीचं स्वप्न खूप दूर आहे हे मान्य ! निदान त्या दिशेचे प्रामाणिक वाटचाल तरी दिसावी. धोरणकर्ते व अभिजन वर्ग यांनी स्वत:चं भलं करण्यातच रमू नये. `चलता है ' वृत्तीला सोडचिठ्ठी देऊन प्रशासन यंत्रणा सुधारणं त्यांच्याच हातात आहे.
मी महाकाय देशातील राजकारणातील निर्णयप्रािढया जवळून पाहत होतो. तसंच मी देशभर हिंडत लोकांशी बोलत होतो. मुंशी प्रेमचंद, आर.के.नारायण, मुल्क राज आनंद , सदाअत हसन मंटो यासारख्या महान लेखकांमुळे भारतीय समाजाचं आकलन होत होतं.तसंच वैश्र्विक भान येत होतं. (कधीकधी माझ्या लिखाणाची तुलना चुकून प्रेमचंदांशी केली जाते परंतु तात्कालिक आणि अभिजात यातील भेद समजून घेतला तर असा प्रमाद घडणार नाही. मी माझी पातळी ओळखून आहे.) प्रगल्भ होण्याच्या प्रवासात या लेखकांना वाचणं आवश्यकच आहे. पं.रविशंकर, उस्ताद बिस्मिल्ला खान, पं.हरीप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा यांच्या संगीतात माझं देहभान हरपून जातं. भारतामधील प्राचीन वास्तुकला आणि चित्रकला यांचं सौदर्य अमीट आहे. दिल्लीमधील प्राचीन किल्ला, हुमायूनची कबर , मुंबईचं व्ही.टी. स्टेशन यांचं वास्तुवैभव थक्क करणारं आहे. ही परंपरा जपून ठेवणं दूरच आपण कमालीच्या वेगानं `आधुनिक' म्हणत अतिशय कुरूप इमारती बांधू लागलो. भारतामधील कलेची विविधता पुसून टाकत सरसकट सर्वत्र एका ाtढर सरळ रेषेत घरं दिसू लागली. सुंदर व लयबध्द कमान, देखणे आकार गायब झाले. आता एका साच्यातून महोत्पादन केल्यासारखी सगळी घरं वाटतात. असं नकली अमेरिकी होण्यापेक्षा अस्सल भारतीय असणं महत्वाचं का वाटत नाही, हे मला समजत नाही. आधुनिकतेमधील नकारात्मक बाबी घेण्यापेक्षा काही सर्जनशील परंपरा जतन करणं, हे केव्हाही श्रेयस्कर ठरणार आहे.
पं.रवीशंकर यांची सतार आपल्याला वेगळ्याच अमूर्त विश्र्वात घेऊन जाते. तो अनुभव शब्दातीत आहे. 2002 साली मला व पंडितजींना एकाच वेळी ब्रिटनचा नाइटहूड हा सर्वोच्च बहुमान लाभला. पंडितजी मला लंडनमध्ये म्हणाले, ``इथून पुढे तुमच्या नवापुढे `सर' हे बिरूद लागणार. परंतु मी परदेशी असल्यामुळे मला लावता येणार नाही.'' मी फार संकोचून गेलो.
अधूनमधून मी हिंदी चित्रपट पहातो. मला `शोले' आवडला होता. `पीपली लाइव्ह ', `इक्बाल ', `वेन्सडे ', `तेरे बीन लादेन ', हे अलिकडचे चित्रपट छान होते. संजीवकुमार, अमजद खान, ए.के.हंगल, अमरीश पुरी, नसीरूद्दद्दिन शहा, अलीकडचा सैफ अली खान यांचा अभिनय पहाणं आनंददायी आहे. श्याम बेनेगल यांच्या `जुनून ' (1978)मध्ये दोन मिनिटं लष्करी अधिकारी म्हणून दिसलो होतो. मला अमरिश पुरी यांच्यासोबत काम करायला संधी मिळावी अशी इच्छा असल्याचं मी कुठल्या तरी मुलाखतीत सांगितलं. दुसऱया दिवशी सकाळी फोन खणखणला. `आपकी इच्छा पुरी हो जोएगी.' खर्जातील धीरगंभीर आवाज आला. मी पटकन ओळखू शकलो नाही. `अरे भाई, आपका मित्र , अमरिश पुरी बोल रहा हूं ' त्यांनी सांगितलं. आम्ही हसलो, गप्पा मारल्या आणि आठ दिवसातच त्याचं निधन झालं.
भारत हा सतत बदलत जाणारा देश आहे. लोक जागरूक होत आहेत. तरूण रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त करतात, ठोस मागणी करतात. काही स्वयंसेवी संस्था खूपच मूलभूत कार्यात गुंतली आहेत. लोकशाही सशक्त होण्याच्या दृष्टीने ही सुचिन्हे आहेत. `आम आदमी पार्टी 'च्या वाटचालीमध्ये चुका झाल्या तरी लोकशाहीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रयोग वाटतो.
भारतीय शीघ्र संतापी आहेत. तसंच त्यांच्या संतापाचा पारा लवकर खाली उतरतो. पण तोपर्यंत ते स्वत:च्याच मालमत्तेचा विध्वंस करून टाकतात. ब्रिटिशराजवटीत सरकारी मालमत्तेची नासधूस समजून घेता येते. परंतु आता आपण निवडून देललं सरकार, आपलीच रेल्वे व आपल्याच सरकारी इमारती नष्ट करायला सरसावतात, हा केवळ मूर्खपणा आहे. क्षुल्लक कारणांसाठी दंगे भडकतात. नाहक बळी जातात.
2002 साली गुजरातमध्ये भयंकर दंगली झाल्या. शेकडो लोकांची निर्घृण हत्त्या करण्यात आली. त्यावेळी नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री होते. दंगे आटोक्यात आणण्यात त्यांचं सरकार अपयशी ठरलं,हे साफ दिसून आलं. हा प्रमाद क्षमा करण्यासारखा नाही. परंतु आता 2014 साली प्रचंड बहुमतानी भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेवर आला आहे. आर्थिक पा मंदावले होते. सर्वत्र निराशा दाटली होती. `देश दुबळ्या हातात नको, कणखर व्यक्तीकडे द्या' या आवाहनाला नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.ती पोकळी भरून काढण्याकरिता लोकशाही पध्दतीनं मोदी स्थानापन्न झाले आहेत. त्याचं मूल्यमापन करण्याआधी त्यांना अवधी दिला पाहिजे.
भारतामधील विविध कालख्ंाडाचे वर्णन करणाऱया पुस्तकांच्या शीर्षकात, मी अनेक संज्ञा वापरल्या. 1995 साली भारताचे ह्रदय, 2002- संथगतीतील भारत, 2007- भारत- अथक यात्रा, 2011- भारत -पुढील वाट, 2013 -पूर्णविराम नसलेला भारत, 2014 साली पाहताना मी म्हणेन- अनिश्र्चित भारत !
टीव्हीच्या आगमनानंतर मुद्रित पत्रकारिता अधिक सािढय व सर्जनशील होईल, असं वाटलं होतं. खोलवर जाऊन बातमी शोधणं, त्यापुढील हालचाली टिपणं, त्यांचा अन्वय लावणं ही प्रािढया थांबल्यासारखी वाटतीय. कमीतकमी मतप्रदर्शन आणि अधिकाधिक वृत्त देणारी पत्रकारिता लुप्त होत आहे. सविस्तर व बहुआयामी वृत्त व विश्लेषण ही मुद्रित पत्रकारितेची शक्तीस्थानं आहेत. ते सोडून उथळ व सवंग पत्रकारीतेच्या मागे लागणं हे बौध्दिक दिवाळखोरीचं लक्षण आहे. त्यात आता `पाकिट पत्रकारिता (पेड न्यूज)' ची सुगी आली आहे. या विकाऊ पत्रकरितेचं समूळ उच्चाटन करणं आवश्यक आहे. ते काम फार अवघड नाही. देशातील पत्रकारिता ही महानगरांवर केंद्रित होत आहे. दिल्लीमधील दुर्घटनेला ठळक प्रसिध्दी मिळेल, बिहारमध्ये रूळ ओलंडताना फाटक नसल्यामुळे झालेल्या रेल्वे व बस अपघाताला तसे भाग्य लाभणार नाही. भोपाळ वायू कांड समजून घेण्यासाठी धावलं पाहिजे, अशी निकड पत्रकाराला आतून वाटली पाहिजे. मला दक्षिण आशियामधील अनेक आपत्ती जवळून पाहता आल्या. अशा प्रसंगी केवळ करूण कहाण्यात न अडकता, आपत्तीची व्याप्ती व कारणे समजून सांगण्याची गरज असते. माणंस सावरतात, एकमेकांना धीर देतात. नेतृत्वाचे व प्रशासनाचे गुण-दोष लक्षात येतात. तसेच समाजमनाची विचार प्रािढया समजते. हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. भोपाळ ही मानवनिर्मित आपत्ती होती. कारखान्याच्या बेपर्वाईमुळे तो अपघात झाला आणि हजारो निष्पाप बळी गेले. अपघाताची कारणं विस्तारानं उलगडून दाखवली तर पुढे दक्षता घेता येईल. हाडाच्या पत्रकाराचं ते कर्तव्यच आहे.
मी परमेश्र्वर व धर्म मानतो, परंतु इतरांच्या स्वातंत्र्याचा मन:पूर्वक आदर करतो. सर्वांनी माझंच ऐकलं पाहिजे, मी म्हणतो तेच मानलं पाहिजे हा आग्रह चुकीचा आहे. आस्तिक असो वा नास्तिक दोघांचाही टोकाचा म़ूलतत्त्ववाद वाईटच आहे. परमेश्र्वर व धर्म या संकल्पनेतून अंध होऊन अतिरेक करणं हे अमानवी व असंस्कृत आहे.
खोलवर रूजलेली व्यक्तीकेंद्रितता आणि जातव्यवस्था भारताला कमकुवत करीत आहे. त्यामुळे संघटन व संस्था मजबूत होऊ शकत नाहीत. क्षमता असूनही अविष्कार दिसत नाही. भारतीय लोक जगण्यासाठी आटोकाट संघर्ष करतात. कुठल्याही परिस्थितीशी लवकर जुळवून घेतात. परदेशातील संस्मकृतीमध्ये सहजपणे रुळतात. परदेशात कित्येक भारतीयांनी स्वत:चे कर्तृत्त्व सिध्द केले आहे, हे फार कठीण काम आहे. एकंदरित लवचिकता व सहिष्णुता ही भारताची शक्ती स्थाने आहेत. त्यामुळेच भारतामधील आशावाद हा निरंतर आहे.
(मुलाखत/शब्दांकन- अतुल देऊळगावकर)