एकनाथ शिंदे गटात फूट?

Update: 2022-06-28 12:58 GMT

एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दुपारी हॉटेलमधून बाहेर पडून आपल्यासोबत ५० आमदार आहेत, असा दावा केला आहे. त्याचबरोबर कोणत्याही आमदाराला बळजबरीने आणलेले नाही, तर ते स्वेच्छेने आले आहेत, असा दावा केला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व बंडखोर आमदारांना आवाहन करत परत बोलावले आहे. तसेच आपण कुटुंब प्रमुख असून सगळ्यांशी चर्चा करुन तोडगा काढू असे म्हटले आहे.

या पार्श्वभूमीवर आता बंडखोर आमदारांमध्येच फूट पडली असल्याची चर्चा आहे. ज्येष्ठ पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांनी एक ट्विट केले आहे, "गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये असलेल्या बंडखोर आमदारांच्या गटातील २५ आमदारांनी स्वतंत्र गट बनवला आहे आणि शिवसेना आमदार अशीच आपली ओळख राहावी अशी त्यांची भूमिका आहे. भाजपमध्ये विलिनीकरणाला त्यांनी विरोध केला आहे. एवढेच नाहीतर या २५ आमदारांच्या गटाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तोडगा काढण्याची भूमिका मांडली आहे," असे वृत्त येत असल्याचे सूर्यवंशी यांनी यामध्ये म्हटले आहे.

या बंडखोर आमदारांमधील एका गटाने आपला वॉट्सअप ग्रुप बनवला असल्याचीही चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जातो आहे. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी माध्यमांसमोर येऊन सर्व आमदार सोबत असून कुणीही नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.


Tags:    

Similar News