पोलिसांकडून ज्या दिवशी सुटेल त्यादिवशी 'तो' आमचा मार खाईल- राज ठाकरे

Update: 2021-09-01 06:42 GMT

मुंबई :  ठाणे महापालिकेच्या महिला अधिकारी कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "परप्रांतिय फेरीवाल्याने अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी तो सुटेल त्यादिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. निषेधाने हे सुधारणारे नाहीत." असं राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

दरम्यान राज ठाकरे आज ठाण्यामध्ये जाणार असून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची ते विचारपूस करणार आहेत. फेरीवाल्याने केलेल्या हल्ल्यात कल्पिता पिंपळे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांची दोन बोटं फेरीवाल्याने तोडली आहे. त्यानंतर संबधित फेरीवाल्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कल्पिता पिंपळे या फेरीवाल्यांवर कारवाई करत असतांना एका फेरीवाल्याने त्यांच्यावर हल्ला केला होता. सध्या कल्पिता पिंपळे यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे.

ठाणे महापालिकेतील माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीत येत असलेल्या कासारवडवली नाक्यावरील कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे गेल्या होत्या. कारवाई दरम्यान अमरजित यादव या फेरीवाल्याकडून त्यांच्यावर कोयत्याने हल्ला केला होता. यावेळी बचावासाठी त्यांनी हात वर केला असता त्यांची दोन बोटेच या हल्ल्यात तुटून पडली आहे, तर बचावासाठी गेलेल्या अंगरक्षकाचेही एक बोट तुटले आहे.

कल्पिता पिंपळे यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहे, तर आरोपी अमरजित यादव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान याबाबत संबधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांन दिले आहे. ही घटना अतिशय निंदनीय असल्याचे म्हणत कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Tags:    

Similar News