मोदीजी, हा व्हिडिओ पाहिला का? मी तुम्हाला आग्रह करते लखीमपूरला या – प्रियंका गांधी

Update: 2021-10-05 08:15 GMT

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरीमध्ये रविवारी झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनातील हिंसाचारा बाबतचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक जीप काही शेतकऱ्यांना मागून येऊन उडवते आणि निघून जाते असे दृश्य दिसत आहे. या व्हिडिओ वर प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधत लखीमपूरला येण्याचा आग्रह करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये प्रियंका गांधी म्हणतात,

मोदीजी, तुम्ही लखनऊमध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी येत आहात. हा व्हिडिओ आधी बघा कसं तुमच्या सरकारमधील मंत्र्याच्या मुलाने आपल्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून टाकलं आहे. या व्हिडिओला पाहा आणि देशाला सांगा की या मंत्र्यांचा राजीनामा अद्यापपर्यंत का घेतला नाही? आणि या मंत्र्यांच्या मुलाला अजूनही अटक का करण्यात आली नाही? माझ्या सारख्या विरोधी पक्षातील नेत्यांना कुठलीही वॉरंट, एफआयआर नसताना विनाकारण नजरकैदीत ठेवलं आहे.

मला माहिती करून घ्यायच आहे की, हा माणूस मोकाट का फिरतोय, का स्वतंत्र आहे. जेव्हा तुम्ही स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मंचावर बसलेले असाल तेव्हा लक्षात घ्या आपल्याला स्वातंत्र्य शेतकऱ्यांनी मिळवून दिलं आहे. आजही या देशाची सुरक्षा शेतकऱ्यांची मुलं सीमेवर करत आहेत. शेतकरी गेल्यावर्षभरापासून त्रासात आहेत. आपला आवाज उठवत आहे आणि त्याला तुम्ही नाकारत आहे.

मी तुम्हाला आग्रह करते लखीमपूरला या. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, जे देशाचा आत्मा आहे त्यांच्या व्यथा जाणून घ्या. या शेतकऱ्यांची सुरक्षा करणं तुमचा धर्म आहे. ज्या संविधानावर तुम्ही शपथ घेतली त्याचा धर्म आहे. आणि त्याच्या प्रति तुमचं कर्तव्य आहे जय हिंद, जय किसान.. असं म्हणतं प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना लखीमपूरला येण्याचं आवाहन केलं आहे.

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा बळी गेलाय. याचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. शेतकऱ्यांसह विरोधकांच्या आक्रमकतेमुळे उत्तर प्रदेश सरकारने केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे, तसेच निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशीची घोषणा केली. मात्र, मृतांच्या कुटुंबियांना भेटण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी भाजपा सरकारला लक्ष्य केले. कांँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, सपाचे नेते अखिलेश यादव यांना देखील लक्ष्मण पोटा जाण्यापासून रोखण्यात आल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Tags:    

Similar News