मंत्रालयात दारु: विरोधकांची ठाकरे सरकारवर सडकून टीका....

मंत्रालयात दारु: विरोधकांची ठाकरे सरकारवर सडकून टीका, कोणी म्हटलंय मदिरालय, तर कोणी साधला पेग्विन गॅंग म्हणत ठाकरे सरकारवर निशाणा काय आहे संपुर्ण प्रकरण....

Update: 2021-08-11 07:32 GMT

महाराष्ट्राच्या मंत्रालयात दारू... ठाकरे सरकारने चंद्रपूरची दारूबंदी उठवली आणि इकडे मंत्रालयात दारू पोहोचली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अत्यंत संवेदनशील असलेल्या मंत्रालयात दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. आता मंत्रालयात दारू आली कशी? याच्या चौकशीचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत.

भाजपने या रिकाम्या दारूच्या बाटल्यावरून ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपने ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक आहे आणि सामान्य लोकांना त्यांची चांगली पडताळणी केल्यानंतरच आत पाठवलं जातं. अशा स्थितीत सुमारे दोन डझन दारूच्या बाटल्या आत कशा पोहोचल्या? याबद्दल प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

खरं तर, मंगळवारी मंत्रालय उघडताच, स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सर्वात अगोदर दारूच्या रिकाम्या बाटल्या पाहिल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी तत्काळ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

मंत्रालयाच्या परिसरात बाटल्या सापडल्याने मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मात्र, तात्काळ ही माहिती मुख्यमंत्री कार्यालयाला देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माध्यमांना दारूच्या बाटल्या मंत्रालयात काम करणाऱ्या मजुरांनी वापरल्या असतील, मात्र संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. त्याप्रमाणे दोषींवर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाईल. अशी माहिती दिली आहे.

दरम्यान, जप्त केलेल्या रिकाम्या दारूच्या बाटल्या मंत्रालयाच्या खालच्या मजल्यावरील कॅन्टीनकडे जाणाऱ्या पायऱ्यांखाली सापडल्या आहेत. कँटीनच्या आसपासच दारू वापरली गेली असावी. अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. ज्या ठिकाणी दारूच्या बाटल्या सापडल्या, त्याठिकाणी मुख्यमंत्री, अनेक मंत्री आणि मुख्य सचिवांची कार्यालयेही आहेत.

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना मंत्रालयाच्या सुरक्षेतील त्रुटीबाबत प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी सांगितले की, अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या वैध पासशिवाय कोणीही मंत्रालयात प्रवेश करू शकत नाही. भरणे यांच्यानुसार, ज्या ठिकाणाहून या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. त्या ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने आरोपींपर्यंत लवकरच पोहोचले जाईल.

तर दुसरीकडे विरोधी पक्षाला ठाकरे सरकारविरोधात चांगलाच मुद्दा मिळाला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र भाजपचे उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी महाविकासआघाडी सरकारने मंत्रालयाला "मदिरालय" मध्ये बदलले आहे. पांडे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या राजवटीत मंदिरांना कुलूप आहे आणि दारूच्या दुकान सुरु आहेत. तसेच मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळाल्याच्या घटनेने राज्याची प्रतिष्ठा डागाळणार आहे.

सोबतच शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेले भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलं – 'मंत्रालयात दारूच्या बाटल्या सापडल्यानं मला आश्चर्य वाटलं नाही कारण नाईट लाईफ टोळीचे मंत्री तिथे राहतात, त्यामुळे तेथे दारू, पार्ट्या आणि बरेच काही असावे.मंत्रालयात प्रवेश करण्यापूर्वी लोकांची कोरोना चाचणी सोबतच, अल्कोहोलची देखील चाचणी केली पाहिजे, विशेषतः पेंग्विन टोळी'. असं म्हणत आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

भाजपचे प्रवक्ते राम कदम यांनी, राज्य सरकारला दारू व्यापाऱ्यांबद्दल खूप चिंता आहे, परिणामी आता मंत्रालयात दारूच्या बाटल्या मिळू लागल्या आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि सरकारने दोषींवर कठोर कारवाई केली पाहिजे.

एकंदरीतच दारू प्रकरणावरुन ठाकरे सरकारवर विरोधकांनी चांगलंच तोंड सुख घेतलं आहे.

Tags:    

Similar News