भगतसिंह कोश्यारी यांचे राज्यपाल पद जाणार? नवे राज्यपाल कोण?

Update: 2022-09-20 03:27 GMT

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या तीन वर्षात झालेल्या घडामोडींमध्ये एक नाव सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे...पण आता महाराष्ट्राल नवीन राज्यपाल मिळणार असल्याची चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राने पाहिला. फडणवीस-अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी, १२ आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न, राज्यपालांचे कोरोना काळातील दौरे यावरुन बराच वाद देखील झाला. त्यातच भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले, मराठी माणूस आणि मुंबई याबद्दल केलेल्या वक्तव्यांनी वाद निर्माण झाले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर भगतसिंह कोश्यारी य़ांच्याऐवजी नवीन राज्यपाल नेमण्याचा विचार केंद्रीय स्तरावर सुरू असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल होण्याची शक्यता आहे. कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी सोमवारी त्यांचा पंजाब लोक कॉंग्रेस पक्ष भाजपमध्ये विलीन केला. भाजपमध्ये पक्ष विलीन करताना त्यांनी आपल्याला राज्यसभेवर घेऊन केंद्रात मंत्री पदाची मागणी केली होती. त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा भाजप प्रवेश लांबला होता. भाजपने त्यांच्या या मागण्या नाकारत त्यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची ऑफर दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्यावर घटनात्मक पदाची जबाबदारी देणार असल्याने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा आणि केंद्रीय मंत्री अमित शहा त्यांच्या पक्ष प्रवेशाच्या वेळी अनुपस्थित असल्याचे कळते आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक महापुरूषांबाबत केलेल्या वक्तव्यांमुळं भगतसिंह कोश्यारी यांना जनतेच्या मोठ्या रोशाला सामोरं जावं लागलं होतं. त्यामुळं भगतसिंह कोश्यारी यांना दुसरी जबाबदारी देऊन त्यांना कार्यमुक्त केले जाण्याची शक्यता आहे. कोश्यारी हे २०१९ पासून महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत.

Similar News