बिहारमध्ये भाजपला मोठा झटका, सरकार कोसळणार?

बिहारमध्ये भाजपसोबत युतीत असलेले नितीश कुमार नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र नितीश कुमार यांनी सोनिया गांधी यांना फोन केल्याने बिहारमध्ये भाजपला मोठा झटका बसणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Update: 2022-08-08 02:24 GMT

मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना फोन केल्याने बिहारमध्ये भाजप-जदयू आघाडीत बिघाडी निर्माण होण्याच्या शक्यतेने चर्चांना उधाण आले आहे.

बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडीला वेग आला आहे. एकीकडे महाराष्ट्रात भाजप ने शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांना गळाला लाऊन राज्यात पुन्हा सत्ता स्थापन केली. मात्र, बिहारमध्ये भाजपच्या हातात असलेली सत्ता जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बिहारमध्ये जेडीयू चे नेते माजी केंद्रीय मंत्री आर.सीपी. सिंह यांनी पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप आणि जेडीयूमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळं बिहारच्या राजकारणाला कमालीचा वेग आला आहे.

विशेष बाब म्हणजे राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी आणि नितीश कुमार यांनी गेल्या काही दिवसांपासून एकमेकांवर टीका करण्याचे टाळले आहे. त्यातच या सगळ्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांनी सोनिया गांधी यांना कॉल केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नितीश कुमार हे आगामी काळात बिहारमध्ये वेगळा विचार करत असल्याचं दिसून येत आहे.

विविध राजकीय पक्षांच्या बैठकीला वेग..

राजद आणि जदयूच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्यांनी बैठक बोलावली आहे. तर इकडे बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांनी तात्काळ बैठक बोलावल्याचं समजतंय.

नितीश कुमार गेल्या अनेक दिवसांपासून नाराज आहेत. ते गेल्या काही दिवसात केंद्रातील कोणत्याच कार्यक्रमाच्या उपस्थित नाहीत. आज दिल्ली येथे पार पडलेल्या निती आयोगाच्या बैठकीत देखील मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित नव्हते.

वरील सर्व पार्श्वभूमी लक्षात घेता आगामी काळात बिहारमध्ये पुन्हा एकदा राजद आणि जेडीयूचं सरकार सत्तेत आलं तर आश्चर्य वाटायला नको.

Tags:    

Similar News