मोहित कंबोजवर बातमी लिहिली, नंतर डिलिट झाली ! हर्षवर्धन सपकाळ यांचा थेट फडणवीसांनाच सवाल

Update: 2025-10-13 09:11 GMT

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मोहित कंबोज (Mohit Kamboj) सध्या चर्चेत आहेत.

कंबोज हे एस्पेक्ट ग्लोबल समुहाचे (Aspect Global) मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्याचप्रमाणे ते भाजपचे कार्यकर्तेही आहेत.

कंबोज यांच्या पत्नी अक्षा यांच्याशी संबंधित एस्पेक्ट रिएलिटी (Aspect Reality )नावाच्या कंपनीला झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाअंतर्गत (SRA Mumbai) मुंबईतील

तब्बल ३० मोठे प्रकल्प मिळाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बिझनेस वर्ल्ड या इंग्रजी मॅगझीनमध्ये

सलग दोन दिवस सविस्तर बातम्या आल्या. त्यानंतर या दोन्ही बातम्या चक्क डिलिट झाल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सच्या माध्यमातून केलाय.

बिझनेस वर्ल्ड या प्रसिद्ध मॅगझीनच्या पलक शाह नावाच्या पत्रकाराने १० ऑक्टोबर रोजी "Bullion King Turned Real Estate Devloper Mohit Kamboj Hits Jackpot With Mumbai's Pricest Land Clusters - Juhu Gully" या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या बातमीमध्ये जुहू गल्ली क्लस्टरमध्ये कंबोज यांच्या कंपनीला कसा फायदा होतोय, हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

जुहू गल्ली क्लस्टर मध्ये कंबोज यांच्या कंपनीला ५ ते ६ लाख चौरस फूटांचं विक्रीयोग्य चटईक्षेत्र मिळणार आहे. त्याची सध्या बाजारात एकूण किंमत ही २५०० कोटी रुपये इतकी आहे. मात्र, ही जमीन कंबोज यांना फक्त १५५ कोटी रुपयांमध्ये मिळाल्याचं बातमीत म्हटलं आहे. त्यानंतर ११ ऑक्टोबरला पुन्हा पलक शाह यांनी "Newsmaker Mohit Kamboj Bhartiya : Amit Shah to Devendra Fadnavis" असं हेडिंग असलेल्या बातमीतून मोहित कंबोज यांचा आजवरचा प्रवास सांगितला होता.

या दोन्ही बातम्या बिझनेस वर्ल्ड या मॅगेझिनच्या www.businessworld.in या वेबसाईटवरुन डिलिट करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मोहित कंबोजवर कसे मेहरबान आहेत, हे जुहू क्लस्टरमध्ये सप्रमाण मांडल्याचा आरोप केला होता. मोहित कंबोज यांच्या जुहू गल्ली प्रकल्पा संदर्भात बिझनेस वर्ल्ड या मॅगेझिनच्या वेबसाईटवर दोन बातम्या प्रसिद्ध होताच मुख्यमंत्री कार्यालयातून सूत्रे फिरली आणि बिझनेस वर्ल्ड सारख्या मोठ्या माध्यम संस्थेनं हे दोन्ही रिपोर्ट डिलिट केल्याचं सपकाळ यांनी म्हटलंय. माध्यमांची मुस्कटदाबी आणि पत्रकारांवर दडपशाही ही मुख्यमंत्री फडणवीस कशासाठी करीत आहेत ? हा नवा शेट तुम्हांला एवढा का प्रिय आहे, हे महाराष्ट्राला कळू द्या, असा थेट सवालच सपकाळ यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केलाय.

Tags:    

Similar News