मुंबईकरांच्या घरात वीजेचे प्रीपेड मीटर्स बसणार, काँग्रेसचा विरोध

Update: 2023-07-28 13:02 GMT

मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. मुंबईकरांच्या घरांमध्ये आता वीजेचं प्रीपेड मीटर्स बसविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. विशेष म्हणजे प्रीपेड मीटर्स सेवा ही सर्वांना अनिवार्य केली जाणार असल्याची माहिती समोर येतेय. या प्रीपेड मीटर्सला काँग्रेसचा विरोध असल्याचं ट्विट मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलंय.

येत्या सप्टेंबर महिन्यापासून मुंबई शहरांत अदानी इलेक्ट्रिकल कंपनीची मीटर्स बसवली जातील, ज्याचं टेंडर पास झालं आहे. ही ऑटोमॅटिक प्रीपेड मीटर्स असतील, हे मीटर्स सगळ्यांना अनिवार्य केले जाणार आहे. मीटर्सची किंमत ९ हजार ५०० रुपये प्रतिमीटर आहे. हा खर्च सर्वसामान्य मुंबईकरांच्या खिशावरच डल्ला मारण्याचा प्रकार असल्याचा आरोप रवी राजा यांनी केलाय. यामध्ये १३०० रूपये केंद्र सरकार देईल तर उरलेले पैसे हे बेस्टकडून दिले जातील. या प्रीपेड मीटर्सचं कंत्राटच सुमारे १३०० कोटी रूपयांचं आहे. मुळात तोट्यात सुरू असलेल्या बेस्टला इतका मोठा आर्थिक भार सोसणार आहे का ? असा थेट प्रश्नच रवी राजा यांनी उपस्थित केलाय.

अदानी इलेक्ट्रिक कंपनीचे मीटर्स प्रीपेड असाणार आहेत त्यामुळे सर्वात मोठा धोका सामान्य मुंबईकरांसाठी बसणार आहे. मुंबई शहरात बेस्टचे १०.५० ग्राहक आहेत. त्यातील ४०% मीटर्स ही झोपडपट्टीत राहणाऱ्या घरातील आहेत. ३०% मध्यमवर्गीय नोकरदारांच्या घराची आहेत. प्रीपेड मीटर ची कल्पना या वर्गाला भविष्यात धोक्याची ठरणारी आणि खिसे रिकामी करणारी असेल अशी भीती रवी राजा यांनी व्यक्त केली. प्रीपेड मीटरचा बॅलेंस संपल्यावर रिचार्ज करणं कसं शक्य होईल ? ही ग्राहकांची लूट ठरेल आणि हे सगळं कंपनीच्या फायद्यासाठी केलं जात आहे, असा आरोप रवी राजा यांनी केला आहे. अदानी इलेक्ट्रिक कंपनी वीजबिलांची प्रीपेड मीटर्सच्या माध्यमातून वसूली करून ती बेस्ट प्रशासनाला देणार. हे बेस्टच्या खाजगीकरणाच्या दिशेने हे पाऊल असल्याचा गंभीर आरोपही रवी राजा यांनी केलाय.

Tags:    

Similar News