मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले अखेर पोलिसांसमोर शरण

Update: 2026-01-23 06:29 GMT

महाड - नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणातील आरोपी विकास गोगावले अखेर महाड पोलिसांसमोर शरण आला आहे. मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले गेल्या जवळपास दीड महिन्यांपासून फरार होता.

काल या प्रकरणाची सुनावणी घेताना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार, मुख्यमंत्री,पोलीस यंत्रणा आणि संबंधित मंत्र्यांवर कडाडून ताशेरे ओढले होते.कोर्टात सरकारच्या वतीने विकास गोगावले शरण येईल,असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानंतर आज विकास गोगावलेने महाड पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर होत पोलिसांना शरणागती पत्करली आहे.

महाडमध्ये 2 डिसेंबर रोजी नगरपरिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात विकास गोगावलेसह दोन्ही पक्षांच्या काही कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.मात्र,गुन्हा दाखल होऊनही दीर्घकाळ आरोपी सापडत नसल्याने न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

Full View

सध्या महाड पोलीस विकास गोगावलेची चौकशी करत असून, थोड्याच वेळात त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.आज या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार असून,विकास गोगावलेला जामीन मिळतो की त्याच्यावर पुढील कठोर कारवाई होते,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिवसेनेच्या वतीने यापूर्वी हे प्रकरण राजकीय षडयंत्र असल्याचा दावा करण्यात आला होता.मात्र,उच्च न्यायालयाच्या ताशेर्‍यांनंतर अखेर विकास गोगावले पोलिसांसमोर हजर झाल्याने या प्रकरणाला निर्णायक वळण मिळाले असले आज न्यायालयात त्यांना जामीन मिळणार का हे पहावे लागणार आहे.

Tags:    

Similar News