कोरोनाविरोधातल्या लढाईचा वापर निवडणुकांसाठी, भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे स्पष्ट संकेत....

Update: 2020-07-28 02:20 GMT

महाराष्ट्रात स्वबळावर भाजपचे सरकार आणण्यासाठी कामाला लागा, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी नेते आणि कार्यकर्त्यांना दिले आहेत. राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कान्फररन्सिंद्वारे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत नड्डा यांनी महाराष्ट्रात स्वबळावर सरकार आणायचे आहे, असा निर्धार व्यक्त केला. या बैठकीला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

कोरोनाविरोधात मोदी सरकारने केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवा

कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली परिस्थिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळली. पंतप्रधानांनी योग्यवेळी लॉकडाऊन जाहीर केल्याने हजारो लोकांचे प्राण वाचले. इतर प्रगत देशांमध्ये जेवढी प्राणहानी झाली तेवढी भारतात झाली नाही. तसेच केंद्र सरकारने लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासासाठी जाहीर केलेल्या 20 लाख कोटींच्या पॅकेजमुळे अनेक समाजघटकांना त्याचा लाभ झाला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता या पॅकेजचे लाभ सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच मोदी सरकारने केलेल्या चांगल्या कामगिरीची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावी असे नड्डा यांनी सांगितले.

महाराष्ट्र सरकार कोरोनाविरोधातल्या लढाईत अपयशी

तर महाराष्ट्रातील सरकार मात्र कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात सपशेल अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली. तसंच राज्य सरकारचे हे अपयश लोकांपुढे मांडा असे आदेशही नड्डा यांनी दिले आहेत.

एकूणच येत्या काळातील निवडणुकांमध्ये कोरोनाविरोधात केंद्र सरकारने केलेल्या कामगिरीचा आणि राज्य सरकारांच्या अपयशाचा पाढा भाजपकडून वाचला जाणार आहे. पण यामध्ये गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासारख्या भाजपशासित राज्यांमधील सरकारच्या कामगिरीबद्दल भाजपचे नेतृत्व बोलणार का, हा प्रश्न उपस्थित होतो.

Similar News