उन्हाळ्यात कशी घ्याल आरोग्याची काळजी?

Update: 2024-05-02 11:22 GMT

मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाण्यात वाढलेल्या तापमानामुळे नागरिकांना कडक उन्हाचा सामना करावा लागत आहे. मुंबईत तापमान ३८ अंश सेल्सिअसच्यावर, तर ठाण्यात ४२ वर पोहचल्याने उन्हाच्या तडाख्याने अंगाची काहिली झाली. हे उच्चांकी नोंदवलेले तापमान बुधवारी चार अंशांनी खाली आल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.




मुंबईतील वाढत्या उकाड्यामुळे रस्त्यांवरील थंड पेये, बर्फाचे गोळे आणि आईस्क्रीम विकणाऱ्या गाड्यांकडे नागरिकांचे पाय आपसुकच वळत आहेत. सध्या सुरू असलेले सण आणि विविध कार्यक्रम या सगळ्यात जलजन्य आजारांची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दूषित पाणी, शिळे अन्न यामुळेही आजार संभवतात, पाणी बदलामुळे आणि दूषित पाण्यामुळे अनेक आजार संभवतात. अशुद्ध पाण्यामुळे होणारे आजार जीवघेणे ठरू शकतात. त्यावर घरगुती उपचारापेक्षा वैद्यकीय सल्ला घेणे हिताचे ठरते.




उन्हाळ्यामुळे उद्भवणार्‍या समस्यांमध्ये प्रामुख्याने अतिसार आणि उष्माघात पचनक्रियेशी संबंधित आजारांचा समावेश होतो. याशिवाय त्वचेशी संबंधित समस्याही उद्भवतात. जशी उष्णता वाढते तशी पचनक्रिया मंदावू शकते. उघडे किंवा अस्वच्छ अन्न आणि द्रवपदार्थ खाल्ल्याने पचनाचे आजार होऊ शकतात. अस्वच्छ किंवा दूषित अन्नावर विषाणू, जीवाणू हे जास्त वेळ टिकून राहतात. यामुळे सर्व वयोगटातील लोकांवर याचा प्रभाव पडू शकतो. या उन्हाळ्याच्या दिवसात नागरिकांनी आपल्या शरीराची विशेष काळजी घेतली पाहिजे. पहिले म्हणजे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन देऊ नका आणि दुसरे म्हणजे विनाकारण उन्हामध्ये बाहेर जाऊ नका. कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर छत्री, टोपी, रूमाल, स्कार्फ हे उन्हाळ्यातील सुरक्षा कवचांसारखे आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घराबाहेर पडताना स्वच्छ पाणी पिणे गरजेचे आहे. बाहेर जाताना स्वत:ची पाण्याची बाटली घेऊन निघावे, त्याचबरोबर सैलसर, सुती व फिकट रंगांचे कपडे उन्हाळ्यात शक्यतो घालावेत, थंडगार पदार्थांचे सेवन करावे, उन्हाळ्यात पाणी गाळून प्यावे. स्वच्छ पाणी आणि ताजे अन्न आरोग्यासाठी फायदेशीर आहे. उन्हाळ्यात उपाशी राहणे आणि अतिरिक्त खाणे या गोष्टी टाळव्यात. उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते म्हणून दिवसातून 7- 8 ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात योग्य आहार घेणे हे उन्हाच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे.

Tags:    

Similar News