Attribution bias : 'निरोगी मानसिकता' नष्ट होण्याकडे देशाची वाटचाल
Attribution bias म्हणजे काय ? आरोप करणाऱ्यांचा IQ कसा असतो? बिहार निवडणुकांच्या विश्लेषणात सत्ताधारी आणि सत्ताधारी समर्थकांची मानसिकता यावर डॉ. प्रदीप पाटील यांचे सविस्तर विश्लेषणात्मक लेख… राजकीय क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांनी तर जरूर वाचाच…
Bihar बिहारच्या निवडणूक निकालाचे विश्लेषण करताना, "विरोधी पक्ष कसे संपले आहेत", "त्यांचे नेते हे कसे कुचकामी ठरले आहेत", आणि भाजपाला पर्याय नाही असे सांगणाऱ्या अनेक पोस्ट फेसबुकवर आणि सोशल मीडियामध्ये पसरवल्या गेल्या आहेत. भारतातील निवडणुका या सध्याचा सत्ताधारी भाजप सत्तेवर आल्यावर वादात राहिलेल्या आहेत. राहुल गांधी यांनी वोट चोरीचा मुद्दा हा प्रकर्षाने समोर आणलेला आहे. आणि त्यामुळे निवडणुका पारदर्शक राहिलेल्या नाहीत याच्यावर शिक्कामोर्तब होत चालले आहे.
मतचोरी याविषयी बोलण्याऐवजी, निवडणूक आयोग हा स्वच्छ चारित्र्याचा आहे, असा निष्कर्ष काढून, बिहार निवडणुकीतील हार ही विरोधकांची अत्यंत वाईट कामगिरी असल्याने झालेली आहे असाही निष्कर्ष काढला गेला आहे. हा निष्कर्ष भाजपा समर्थक सर्व तथाकथित विश्लेषक तज्ञांनी काढला आहे. जेव्हा अशा पद्धतीने मीडियामध्ये विशिष्ट खोटा प्रचार चालवला जातो तेव्हा त्याला Attribution bias एट्रीब्युशन बायस असे म्हणतात. याला मराठीत एक चांगली म्हण चपखल बसते. ती म्हणजे, "आपला तो बाळ्या, दुसऱ्याचं ते कार्ट!" याला आरोपांचा पक्षपातीपणा असे म्हणतात.
लोकशाहीमध्ये सत्ताधारी पक्षाला प्रश्न विचारायचे असतात व त्यांच्या दोषांवर आणि वाईट कृत्यांवर सातत्याने बोलायचे असते. त्याच्या विरोधात कृती करायची असते. पण सध्या भाजपा समर्थक हे विरोधकांची विरोध करण्याची शैली व पद्धत हीच बिनडोक आहे असे खोटे न्यारेटीव्ह पसरवत आहेत. यालाच एट्रीब्युशन बायस म्हणतात. थोडक्यात आपण जिंकलो कारण आपल्याकडे जिंकण्याचे गुण आहेत आणि विरोधक हरले कारण ते ढ आहेत किंवा मूर्ख आहेत अशी मांडणी केली जाते.
अशा पद्धतीने चुकीचा निष्कर्ष काढण्याच्या मागे अनेक कारणे असतात. कोणतीही परिस्थिती समजून घेण्याविषयीचा विचार दोष, अर्धवट विश्लेषण किंवा एखाद्या घटनेचे अर्थ काढताना चुकीच्या पद्धतीने वा इल्लॉजिकल पद्धतीने काढणे हे महत्त्वाचे घटक असतात. हा एक प्रकारचा मेंटल शॉर्टकट असतो.
लोक स्वतःचे मूल्यमापन करताना आपल्याला पोषक असे करतात पण त्याच विषयावर इतरांचे मूल्यमापन करताना मात्र विकृतपणे करतात. थोडक्यात स्वतःच्या वागण्याचे व दुसऱ्याच्या वागण्यांचे विश्लेषण करताना आपण विवेक वापरत नाही.
फ्रिटझ हेडर Fritz Heider याने या विचार दोषाची पहिल्यांदा मांडणी केली. 'द सायकॉलॉजी ऑफ इंटर पर्सनल रिलेशन्स' 'The Psychology of Interpersonal Relations' या पुस्तकात याविषयी त्याने सखोल चर्चा केलेली आहे. स्वतःमध्ये असलेल्या गुणांमुळे यश मिळते आणि अपयश जर आले तर ते परिस्थिती व इतर व्यक्तींमुळे आले असे जेव्हा विश्लेषण केले जाते तेव्हा एट्रीब्यूशन बायस किंवा आरोपाचा पक्षपात याचा उदय होतो.
प्रत्येक व्यक्तीच्या गरजा, इच्छा व अपेक्षा या त्यांच्या वागण्यावर खूप मोठा प्रभाव करत असतात. जेव्हा व्यक्तींच्या गरजा, इच्छा व अपेक्षा या व्यक्तींवर इतरांकडून लादल्या जातात व त्याच बरोबर आहेत असे इतरांकडून खोटे सांगून त्यांना बनवले जाते, तेव्हा या व्यक्ती किंवा व्यक्तींचा समूह जगाकडे पाहताना याच चष्म्यातून पाहतात. तेव्हा अशा व्यक्ती पक्षपाती आरोप करायला सुरुवात करतात. जेव्हा पक्षपाती आरोप करण्याची सवय लागते तेव्हा अशा व्यक्ती या निरोगी मानसिकतेच्या रहात नाहीत त्यांना मानसिक विकार जडतात. अनेक मानसिक विकारांमध्ये अडकलेल्या व्यक्ती पक्षपाती आरोप करण्याच्या कामात गढलेल्या असतात.
सामाजिक काळजी विकृती नावाच्या मानसिक विकारांच्या व्यक्ती या पक्षपाती आरोप करत राहतात. त्यांच्या मनात त्यांचा स्वतःविषयीचा आदर हा अतिशय कमी असतो. समाज आपल्याकडे दुर्लक्ष करतो आहे अशी त्यांची भावना असते. विशेष म्हणजे अशा व्यक्ती स्वतःमध्ये गुणात्मक विकास करण्याच्या फंदात पडत नाहीत किंवा त्यांना ते जमत नाही. त्यांना प्रेरणा दायी असे काहीही वाटत नाही. यांच्यामध्ये सोशल कॉग्निशन बायस म्हणजे सामाजिक प्रश्नांविषयीची समज ही अतिशय कमकुवत व पक्षपाती असते. या कारणांमुळे अशा व्यक्ती किंवा असे गट हे अविवेकी वागत असतात व विचार करत असतात. निर्णय घेण्याची क्षमता व एखाद्या गोष्टीचे सम्यक विश्लेषण त्यांना जमत नाही.
राहुल गांधी, काँग्रेस व इतर सर्व विरोधी पक्ष हे शत्रू आहेत आणि त्यांच्याशी वैरभाव घ्यायलाच हवा असे मानणारे गट व व्यक्ती हे पक्षपाती आरोप करणाऱ्या गटात मोडतात. विशेष म्हणजे या व्यक्तींमध्ये संताप व आक्रमकपणा हा दुर्गुण मोठ्या प्रमाणावर आढळतो. ज्याला रिऍक्टिव्ह अग्रेशन म्हणतात. नेहरू, गांधी, आंबेडकर, अशा व्यक्तिमत्त्वांना शत्रू मानून त्यांच्या विरोधात वाटेल ते खोटे पसरवणे आणि मानहानी करणे ही कृती म्हणजे प्रतिक्रियात्मक राग विकृती आहे.
पक्षपाती आरोप या संदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनाचे निष्कर्ष असे सांगतात की, ज्या व्यक्ती या हिंसाखोरी आणि आक्रमक विकृती या वातावरणात वाढतात त्या पक्षपाती आरोप करण्याची कृत्ये करतात. शालेय जीवनामध्ये जेव्हा दुसऱ्या गटातली व्यक्ती नीट वागत नाही तेव्हा तिला मेंटल म्हणून शिक्कामोर्तब केले जाते. म्हणजे दुसऱ्या व्यक्तींच्या चुका व दोष हे विकृत वर्तन होय असे घोषित केले जाते. पण जेव्हा स्वतःच्या चुका व दोष दाखवून दिल्या जातात तेव्हा त्या एकतर काहीतरी स्वतःला संपवण्याचा डाव कोणीतरी रचलाय या कारणाने आहे किंवा परिस्थितीमुळे ते घडले आहे असा बचाव केला जातो. याविषयीचा एक प्रयोग खूप काही सांगून जातो.
अमेरिकेतील आयोवा विद्यापीठात शिकणारा चीनचा गंग लू नावाचा विद्यार्थी होता. ज्याने तेथील भौतिक व अवकाश विज्ञानाच्या तीन प्राध्यापकांचा खून केला. चीन व अमेरिकन विद्यार्थ्यांचे दोन गट करून गंग लू याचे कृत्य करण्यामागे काय कारण असावे हे विचारले. अमेरिकन विद्यार्थ्यांनी असे सांगितले की तो मानसिक दृष्ट्या विकृत असावा. चिनी विद्यार्थ्यांनी सांगितले की परिस्थितीमुळे त्याला खून करणे भाग पडले असावे. नथुराम गोडसेच्या बाबतीत जे विश्लेषण भारतात सध्या सत्ताधारी पक्ष करतो आहे ते चिनी विद्यार्थ्यांच्या उत्तराशी मिळते जुळते आहे. एखाद्याचा खून करणे ही मानसिक विकृती असते असे विज्ञान सांगते. पण त्याकडे दुर्लक्ष करून सामाजिक परिस्थितीमुळे गोडसे यांनी गांधीजींचा खून केला असे पसरविले जात आहे. शिवाय गोडसेला राष्ट्रभक्त म्हणून पदवीही प्रदान केली गेली आहे. याला एट्रीब्यूशन बायस म्हणतात. यामध्ये विरुद्ध मतांनाच प्राधान्य देऊन पुराव्यासहित असलेल्या योग्य मतांना डावलले जाते.
सध्याच्या वातावरणात पक्षपाती आरोप करणाऱ्या जमाती ज्या फैलावलेल्या आहेत त्याने देशाची निरोगी मानसिकता नष्ट झालेली आहे. रॅशनल विचार करण्याची कुवत या जमातीकडे नसते. आणि या जमातीचा आदर्श मानणारी नवीन पिढी ही देखील बळी पडून या देशाचे वाटोळे करीत सुटलेली आहे. धोकादायक अशा या पक्षपाती आरोप करणाऱ्या जमातीला सत्ताधाऱ्यांचे अभय असल्याने सध्या तरी या जमाती नष्ट करणे शक्य नाही.
-डॉ. प्रदीप पाटील
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट