Article 15 आणि जाती व्यवस्थेच्या गँगरेप मध्ये अडकलेल्या पीडित स्त्रिया...

Update: 2020-10-03 06:28 GMT

तनुश्री पांडे या जिगरबाज महिला पत्रकारामुळे पीडितेची "चिता" बोलायला लागली, नाहीतर खरं वास्तव देशासमोर यायला वेळ लागला असता, किंवा कळलंच नसतं. बॉडी जळत असतांना वारंवार पत्रकार तनुश्री पांडे विचारुन देखील हा निगरगट्ट पोलीस अधिकारी जणू काहीच झालं नसल्याचं दाखवून एक शब्द देखील बोलायला तयार नव्हता.

पत्रकार तनुश्री पांडेंच्या ट्विटर अकाउंटवर बरेच व्हीडिओ ट्विट केले आहेत. हे व्हीडिओ आपण पुढील लिंकवर जाऊन बघू शकता

प्रत्येक व्हीडिओ जर का नीट बघून, यातील संभाषण ऐकलं तर धक्काचं बसेल! एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला जातो. तिच्या कुटुंबाला न सांगता व तिला न्याय देण्याऐवजी तिची बॉडी मध्यरात्री जाळण्यात येते. माणुसकीला काळीमा फासणारा, हा धक्कादायक प्रकार घडलाय योगी सरकारच्या उत्तरप्रदेशमध्ये.

एकीकडे केंद्रसरकार घोषणा करतेय बेटी बचावच्या, आणि दुसरीकडे उत्तरप्रदेश सरकार न्याय न देता राज्यात बेटी जलावचा कार्यक्रम खुलेआम करतांना दिसतंय. खरं तर आता वेळ आली आहे की, कँडल मार्च ऐवजी हातात पेटत्या मशाली घेऊन निघायची. पुन्हा एकदा एखाद्या bandit queen ला बाहेर निघावं लागेल. ती फुलनदेवी पुन्हा जन्माला आली पाहिजे. तरचं अब्रूचे लचके तोडणाऱ्या अश्या अमानुष, अमानवी कृत्य करणाऱ्या, लिंगपिसाटांचे लिंग खुलेआम कापल्या जातील.

योगी सरकारला आता उत्तर द्यावी लागतील. रात्रीच्या अंधारात युपी पोलीस कुणाच्या इशाऱ्यावर पुरावे नष्ट करण्याचं काम करत होती. अजून किती दिवस असे अत्याचार आपण सहन करणार? दरवेळी निषेध, मोर्चा, आणि आंदोलनानेचं न्याय मिळणार का? माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अशा घटना घडतात, तेव्हा सरकार कुणाचेही असो.... भूमिका ठोस असली पाहिजे.

महिला दलित आहे की, उच्चजातीची... बलात्कार हा बलात्कार असतो. बलात्काराला आणि बलात्कार करणाऱ्या नराधामला जात धर्म नसते. पण आपल्या देशात बलात्कार कोणत्या जातीच्या महिलेवर झालाय यावरचं लोकांच्या मेणबत्या पेटतांना दिसतात. बलात्कार दलित महिलेचा की, उच्चजातीच्या महिलेचा आहे, गरीब, मजूर, शेतकरी, आहे की हाय प्रोफाइल महिलेचा बलात्कार आहे. हे बघूनच जाती-जातीत विभागलेली माणसं रस्त्यावर उतरतात. बाकी स्वतःला मर्द समजणारे फक्त नामर्दा सारखा तमाशा बघतात.

उत्तरप्रदेशच्या हाथरस मधील या १९ वर्षीय तरुणीवर गावातीलचं उच्चजातीच्या ४ नराधमांकडून सामूहिक बलात्कार केला जातो. तिला जनावरासारखी मारहाण केली जाते. तिच्याकडून नंतर कोणताही कबुली जबाब मिळायला नको, म्हणून तिची जीभ कापल्या जाते. यानंतर ती हॉस्पिटलमध्ये मृत्यू सोबत झुंज करते. कुणाच्याही कानापर्यंत तिच्यावरील अमानुषपणे झालेल्या अत्याचारांचा, किंकळण्याचा, ओरडण्याचा, आवाज, या मुर्दाड व बहिऱ्या शासन आणि प्रशासनापर्यंत पोहोचतांना दिसत नाही. अखेर मृत्यू सोबत लढता लढता ती या हिजड्या सिस्टीम पुढं हतबल होऊन प्राण सोडते.

यानंतर जे काही घडलंय ते यापेक्षाही खूप जास्त धक्कादायक आहे. स्थानिक प्रशासनाकडून सुद्धा तिच्या अब्रूचे लचके मेल्यावरही तोडल्या जातात. मध्यरात्री जणू काही घडलंच नाही. अशा प्रकारे खाकी वर्दीतील हेचं लांडगे तिचं प्रेत जाळून टाकतात आणि पुरावा नष्ठ करण्याचा प्रयत्न करतात.

आता तिच्या मृत्यूंनंतर 14 दिवस गप्प असणारे देशभरातील तथाकथित नेते, समाजसेवक, मनिषाला न्याय मिळवून देण्यासाठी लढायला पुढं येतील. या सामुहिक बलात्कारानंतर तिच्या आत्म्याला असंख्य वेदना देणारं, अब्रूचे लक्तरे तोडून खेळल्या जाणार, अत्यंत घाणेरडं राजकारण येत्या काळात नेहमीप्रमाणे आपल्याला बघायला मिळेल.

मागीलवर्षी डायरेक्टर अनुभव सिन्हाने भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 15 वर आर्टिकल-15 नावाचा चित्रपट बनवला होता. धर्म, जाती, लिंग या भेदभावाला थांबविण्याचे काम आर्टिकल 15 मध्ये आहे. ऊना येथील दलित मुलीच्या गँगरेपची कहाणी सांगणारा, मन सुन्न करणारा, मेंदू हलवून टाकणारा, सत्य घटनांवर आधारित असलेला हा वास्तवदर्शी चित्रपट बघितला तर जातिव्यवस्थेचे मुळं अजूनही किती खोलवर रुजलेली आहेत? यांचा अंदाज आपल्याला येतो. हे सांगण्याचं कारण म्हणजे, काही दिवसांनी कदाचीत हाथरसवरील या गँगरेपवर सुद्धा चित्रपट तयार होईल. आम्ही फक्त दर्शक म्हणून, हा नंगानाच कधी स्क्रीनवर, तर कधी प्रत्यक्षात, उघड्या डोळ्यांनी बघत राहू.

सोशल मीडियावर आणि वर्तमानपत्रात सुद्धा मोठं मोठी आर्टिकल लिहल्या जातील. आम्ही फक्त वाचत राहू, चित्रपट बघून पुन्हा यावर चर्चा करत राहू, मंथन करू, तो पर्यंत पुन्हा एखाद्या दलित पीडित महिलेसाठी या देशातील जातीव्यवस्थेला आव्हान देणारा, नवीन आर्टिकल-15 पुन्हा कुठं ना कुठं तरी घडलेला असेल. आर्टिकल-15 बघून सुद्धा इथल्या शोषित व्यवस्थेच्या, अंधाराने झाकलेले डोळे, उघडणार नाही. कारण या देशात दलित म्हणून पीडित असणं हा त्या पीडितेचा खरा गुन्हा ठरतो. म्हणून अजूनहीं खैरलांजली सारखे असंख्य हत्याकांड न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.

Similar News