कोरोनाने पतीचा मृत्यू, पत्नीची चिमुकल्यासह आत्महत्या

Update: 2021-04-16 06:16 GMT

महाराष्ट्रात नव्हे तर सबंध देशात कोरोना महामारीने थैमान घातले असून दिवसेंदिवस मृत्यूची संख्या वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णाच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात असलेल्या कुटूंबाने जगावे कसे? याच धास्तीतून नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरातील महिलेने आत्महत्या केली आहे.

एकीकडे लॉकडाऊनमुळे उपासमार होण्याची वेळ आणि दुसरीकडे घरातल्या कर्त्या पुरुषाने कुटूंबाला उघड्यावर सोडून जगाचा निरोप घेणं, या हृदयद्रावक घटनेमुळे माणसांच्या यापुढच्या जगण्यावर विचार करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

लोहा शहरातील बालाजी मंदिराच्या पाठीमागे आंध्रप्रदेशातील अम्मापुरम येथून उदरनिर्वाहासाठी आलेले एक कुटूंब, दररोज चटई विकून व मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत असत.

पालात राहणारं हे कुटुंब रोजच्या जगण्याचा संघर्ष करीत होते. रोजच्या संघर्षातच घरातल्या कर्त्या पुरुषालाच कोरोनाने घेरले. पती हनुमंत शंकर कडम हे पॉझिटीव्ह आल्यानंतर लोहा येथील कोविड सेंटर येथे दाखल झाले. तीन दिवसाच्या उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी पत्नीला कळताच तीन वर्षाच्या चिमुकल्यासह महिलेने पाला जवळच असलेल्या सुनेगाव येथील तलावात उडी मारून आत्महत्या केली.

त्यांच्या पश्चात एक मुलगा सिद्धू ( वय ६ वर्ष), अलकिया (वय ७ वर्ष) ही दोन चिमुकले उघड्यावर पडली आहेत.

शहरातील बालाजी मंदिरच्या पाठीमागे ही हृदयद्रावक घटना घडली आहे. ही घटना बुधवारी (दि.१४) रात्री घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत महिला पद्मा हनुमंत कडम (वय३५) , लल्ली (वय०३) अशी मृत मायलेकराची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे .

पद्माने नवऱ्याच्या निधनानंतर तीन मुलांना घेऊन संसाराचा गाडा चालणार कसा या चिंतेने आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले. फिर्यादी चिन्नना दुर्गना कडम (वय ३९) रा. संतोषनगर निजामबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोहा पोलीस ठाण्यात १३/२०२१ नुसार आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . पोलीस निरीक्षक भागवत जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कऱ्हे हे पुढील तपास करीत आहेत..

Tags:    

Similar News