विकास दुबेने मध्य प्रदेशात सरेंडर का केले?

Update: 2020-07-09 12:54 GMT

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये 8 पोलिसांच्या हत्येत सहभागी असलेला मुख्य आरोपी विकास दुबे गुरूवारी सकाळी पोलिसांना शरण आला. ज्याचा शोध संपूर्ण उत्तर प्रदेश पोलीस घेत होते तो थेट मध्य प्रदेशातल्या उज्जैनमध्ये पोलिसांना शरण आला. विकास दुबेने शरणागतीसाठी मध्य प्रदेशची निवड का केली, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. यावर वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात असताना ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी एक ट्विट केले आहे.

“एका निवृत्त आयपीएस अधिकाऱ्याने मला सांगितले की, विकास दुबे जिवंत सापडण्याची शक्यता खूप कमी आहे. विकास दुबेला अनेक मोठ्या लोकांची गुपितं माहित असल्याने त्याला आणि त्याच्या साथीदारांना एन्काऊंटरमध्ये ठार मारले जाईल”, अशा आशयाचे ते ट्विट होते. त्यानंतर काही वेळातच विकास दुबे शरण आल्याचे वृत्त आले.

उत्तर प्रदेश पोलिसांच्या हाती आपण लागलो तर आपले नक्कीच एन्डाऊंटर केले जाईल, या भीतीने विकास दुबे मध्य प्रदेशात फरार झाला आणि तिथे जाऊन त्याने शरणगती पत्करली असणार.

महाकाल मंदीरासारख्या गर्दीच्या ठिकाणी तो स्वत: ओरडून आपण विकास दुबे आहोत असे सांगत होता. विकास दुबे पोलिसांच्या हाती जिवंत सापडला हा संदेश त्याला कदाचित द्यायचा असेल.

आता विकास दुबेच्या चौकशीतून अनेक मोठ्या लोकांचे लागेबांधे बाहेर येणार का? हाच खरा प्रश्न आहे. त्याचबरोबर पोलीस विकास दुबेला पकडण्यासाठी जात असल्याची माहिती या गुंडांपर्यंत कशी पोहोचली, विकास दुबे उत्तर प्रदेशातून मध्य प्रदेशात कसा पोहोचला? या प्रश्नांची उत्तरंही योगी आदित्यनाथ सरकारला द्यावी लागतील.

 

Similar News