चीनने मृत सैनिकांचा आकडा का लपवला?

Update: 2020-06-18 03:59 GMT

चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्समधून भारताविरुद्ध पुन्हा गरळ ओकण्यात आली आहे. भारताची आक्रमक भूमिका पाहिल्यानंतर आता चीनच्या मुखपत्रातून भारताला इशारा देण्यात आला आहे. युद्ध झाले तर भारताला चीन, पाकिस्तान आणि नेपाळ या तीन आघाड्यांवर लढाई करावी लागेल असे यातील एका लेखात म्हटले आहे. पाकिस्तान आणि नेपाळ हे चीनचे धोरणात्मक भागीदार असल्याने भारताने आक्रमक भूमिका घेतली तर तिन्ही आघाड्यांवर भारताला युद्ध करणे परवडणार नाही असं या मुखपत्रात म्हटले आहे.

पण एकीकडे हे मुखपत्र युद्धखोरीची भाषा करत असले तरी दुसरीकडे गलवानमध्ये झालेल्या संघर्षात चीनचे किती सैनिक मारले गेले याबाबत माहिती लपवल्याची कबुली देण्यात आली आहे. जर चीनने मृत सैनिकांचा आकडा जाहीर केला आणि दोन्ही देशातील मृत सैनिकांच्या संख्येची तुलना झाली तर दोन्ही देशांमधील जनतेच्या राष्ट्रीयत्वाच्या भावनांना ठेच पोहोचू शकते. यातून सीमेवरील तणाव कमी करण्याच्या प्रयत्नांमध्ये बाधा येऊ शकते, असे चीनमधील लष्करी प्रशिक्षण केंद्रातील अधिकाऱ्याने ग्लोबल टाईम्सला सांगितले आहे.

दरम्यान गलवानमध्ये चीनने पूर्वनियोजितपणे कट आखून भारतीय हद्दीत घुसखोरी केल्यानेच हिंसाचार झाला आणि जवान शहीद झाले, या शब्दात परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले आहे. जयशंकर यांनी बुधवारी चीनचे परराष्ट्रमंत्री वँग यी यांच्याशी संवाद साधला. सीमेवर तणाव निर्माण होण्यास चीन जबाबदार आहे. असेही त्यांनी वँग यांना सुनावले. यानंतर मात्र दोन्ही देश ६ जून रोजी ठरल्याप्रमाणे या भागातील तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करतील असाही निर्णय झाला.

Similar News