उल्हासनगर मधील अनधिकृत बांधकामाला जबाबदार कोण? मुख्यमंत्री की महापालिका

Update: 2019-08-14 16:50 GMT

उल्हासनगर मध्ये पाच मजली इमारत कोसळली, मात्र महापालिका प्रशासनाच्या सतर्कतेमूळे इमारतीत राहणारे सर्वच्या सर्व 31 फ्लॅट मधील सुमारे 150 लोक सुखरूप आहेत. मात्र यामुळे अनाधिकृत इमारती व धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

उल्हासनगर महापालिकेला 12 तारखेला माहिती मिळाली की फर्निचर मार्केट लिंक रोड वर असणाऱ्या महक या इमारतीच्या फ्लॅटचे दरवाजे अचानक बंद झाले आहेत. ते समजताच महापालिकेने तातडीने सर्व 31 फ्लॅट मधील लोकांना घरातील पैसे व मौल्यवान वस्तू घेऊन बाहेर निघण्यास सांगितले. काल लोकांना बाहेर काढले आणि आज सकाळी इमारत कोसळली.

कोसळलेली इमारत ही 25 वर्ष जुनी होती आणि अनधिकृत होती अशी प्राथमिक माहिती देण्यात आली. शहरात सुमारे 350 इमारती ह्या धोकादायक असून आता पर्यंत 34 इमारती उल्हासनगरात कोसळल्या असून यात 24 जणांना आपले जीव गमवावे लागले आहेत. याबाबत महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी उल्हासनगर अनधिकृत बांधकामाचे चित्र आणि चरित्र मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना मांडले.

ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, बदलापूर येथील अनधिकृत बांधकामाचे मूळ मुंबईची वाढत्या लोकसंख्येशी आहे, राज्य सरकार आणि स्थानिक पालिका-महापालिका, लोकप्रतिनिधी यांनी स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी ही नियोजन शून्य बकाल अशी शहरे होऊ दिली, सर्व नागरी प्रश्नांच्या मुळाशी अनधिकृत बांधकामे आहेत आणि त्यासाठी गेल्या 25 वर्षातील मुख्यमंत्री जबाबदार आहेत असा आरोप, राज असरोडकर यांनी केला आहे.

अनधिकृत इमारत कोसळल्याने पुन्हा एकदा अनधिकृत इमारती, धोकादायक इमारती यांची चर्चा उल्हासनगर मध्ये जोरात आहे, मात्र हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने राज्य सरकार, महापालिका आणि लोकप्रतिनिधी काही ठोस पावले उचलतात की नाही हे येणाऱ्या काळात समजून येईल.

https://youtu.be/ielFvpMcEwQ

 

Similar News