'कोब्रा' मिथून‌ चक्रवर्तीला गृह मंत्रालयाकडून वाय प्लस दर्जाची सिक़्युरीटी

Update: 2021-03-12 09:25 GMT

स्वतःला कोब्रा म्हणून घेणार्या अभिनेता आणि भाजप नेता मिथुन चक्रवर्ती आता‌ पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर काही भाजप नेत्यांसह केंद्रीय गृह मंत्रालयाकडून सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१ च्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपच्या गोटात सामील झालेल्या अभिनेते आणि नेते मिथुन चक्रवर्ती यांना वाय प्लस सुरक्षा पुरवण्यात आलीय. गृह मंत्रालयाकडून यासंबंधी एक आदेश जारी करण्यात आला आहे. नुकतंच, पश्चिम बंगालमध्ये कोलकात्याच्या ब्रिगेड परडे मैदानात पार पडलेल्या एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये दाखल झाले होते. 'मी असली कोब्रा आहे. चावलो तर तुम्ही फोटोमध्ये जाल. मी जोलधरा साप नाही, बेलेबोरा सापही नाही... मी एक कोब्रा आहे. एका चाव्यात सगळं संपून जाईल', अशी वक्तव्य मिथुन चक्रवर्ती यांनी यावेळी स्टेजवरून केली होती.

याअगोदर तृणमूल काँग्रेसमध्ये सहभागी होऊन आपण मोठी चूक केल्याचंही यावेळी मिथुन चक्रवर्ती यांनी स्टेजवरून कबूल केलं होतं. तृणमूलकडून चक्रवर्ती यांना २०१४ साली राज्यसभेत पाठवण्यात आलं होतं. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालच्या निवडणूकीनं आता रंग भरले असून भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल ची सत्ता असल्याने कायदा-सुव्यवस्थेचा अधिकार ममता बॅनर्जी यांच्याकडे आहे.

यापूर्वी भाजपाच्या रॅलीवर दगडफेक झाल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या प्रचारामध्ये भाजपने त्यांना दगाफटका होऊ नये यासाठी गृहमंत्रालयाने वाय सिक्युरिटीचे कवच दिले आहे. वाय प्लस दर्जाच्या सुरक्षा व्यवस्थे अंतर्गत मिथुन चक्रवर्ती यांना ११ कमांडोचं एक पथक सुरक्षा देणार आहे. याशिवाय ५५ सुरक्षारक्षकांची एक टीम त्यांच्या निवासस्थानाजवळ तसंच ते जिथे जातील तिथे त्यांच्यासोबत असेल.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांच्यासोबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक मोहन भागवत, नुकतीच अभिनेत्री कंगना राणावत यांच्यासह देशातील 104 लोकांना आतापर्यंत वाय सुरक्षा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.


Tags:    

Similar News