भाजपच्या कार्यक्रमात मराठी कलाकारांचा अपमान, राहुल देशपांडे भडकले

Update: 2022-10-20 10:51 GMT

 निवडणुका लागल्या की प्रत्येक राजकीय पक्षाला मराठी अस्मितेची आठवण येते. सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे यंदा मुंबईत गुजराती गरबा मराठी मध्ये साजरा झाला. मराठी कलाकारांना घेऊन मराठमोळा दिपोत्सव साजरा केला जातोय. वरळीच्या जांभोरी मैदानात भाजप ने मराठमोळ्या दिपोत्सवाचं आयोजन केलं आहे.

या कार्यक्रमात राहुल देशपांडे, नंदेश उमप, केतकी माटेगावकर, साधना सरगम, सोनाली कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री अशा कलाकारांना निमंत्रित करण्यात आलं आहे. १९ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर पर्यंत हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा ही अभिनेता पुष्कर श्रोत्री कडे सोपवण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी राहुल देशपांडे यांचं गायन होतं.

त्यांच गायन सुरू असताना अचानक एन्ट्री झाली बॉलीवुड अभिनेता टायगर श्रॉफची... साहजिक मुंबईत मराठी कलाकारांपेक्षा बॉलीवुड कलाकारांना नेहमीच प्राधान्य दिलं जात आलं आहे. त्यामुळे राहुल देशपांडे यांना त्यांचं गाणं थांबवण्यास सांगण्यात आलं. त्यावर राहुल यांनी जर मधेच ब्रेक घेतला तर मी गाणार नाही, मी निघून जाईन असं म्हटलं. पुष्कर श्रोत्री त्यांची समजुत घालण्यासाठी गेले. तेव्हा त्यांनी २० मिनिटं मला गाऊदे त्यानंतर मी माझं गाणं थांबवतो मग त्यांना काय करायचं ते करूदेत असं त्यांना सांग नाहीतर मी चाललो. मी गाणार नाही.

आमदार मिहीर कोटेचा हे देखील राहुल देशपांडे यांना विनवणी करतात पण राहुल देशपांडे त्यांना सुध्दा सरळ सांगतात की २० मिनिटं गाऊद्या मी जातो मग तुम्हाला काय करायचंय ते करा. त्यावर आमदार मिहिर कोटेजा हे रंगमंचाच्या एका कोपऱ्यात टायगर श्रॉफला बोलावतात आणि त्याचा सत्कार करतात. यावर राहुल देशपांडे उठू मी असं म्हणतात पण त्यांना थांबवलं जातं.

विधान परीषद सदस्य तसेच ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत "हाच का मराठी कलाकारांचा सन्मान...!!! भाजप आयोजीत मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव जांबोरी मैदान, वरळी येथे मराठी कलाकारांची चेष्टा..." ट्विट केलं आहे.

एकंदरीत टाय़गर आणि राहुल देशपांडे यांची तुलना होऊच शकत नाही. राहुल देशपांडे य़ांचा मान राखत २० मिनिटे टायगर श्रॉफने त्यांच्या गायनाचा आनंद घ्यायला काहीत हरकत नव्हती पण तसं न करता आमदारांनी देखील घाई केली आणि मराठी माणसाच्य़ा कार्यक्रमात मराठी कलाकारांनाच अपमानास्पद वागणूक दिली गेली असं या व्हिडीओतून दिसून येतंय.

Tags:    

Similar News