Russia Vs Ukrain : डोनाल्ड ट्रम्प यांचा जो बायडेन यांना अजब सल्ला

Update: 2022-03-07 10:00 GMT

आपल्या विक्षिप्तपणामुळे कायम चर्चेत असणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिल्यांदाच रशिया-युक्रेन वादावर भाष्य केले आहे. पण हे भाष्य करताना ट्रम्प यांनी अमेरिकेचे सध्याचे अध्यक्ष जो बायडेन यांना अजब सल्ला दिला आबे. "अमेरिकेने आपल्या F-22 या लष्करी विमानांवर चीनचे झेंडे लावावे आणि या विमानांमधून रशियावर बॉम्ब हल्ले करावेत, असा सल्ला ट्रम्प यांनी दिला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कार्यक्रमात केलेल्या भाषणात ट्रम्प यांनी हे अजब वक्तव्य केले आहे. एवढेच नाही तर चीननेच हे हल्ले करावे असा कांगावा अमेरिकेने करायचा आणि त्यांच्यात भांडण लागले की आपण त्यांचे भांडण पाहत बसायचे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

एवढेच नाही तर ट्रम्प यांनी या वादात नाटोवरही जोरदारी टीका केली आहे. नाटो ही संघटना पेपरवरील वाघ आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे. तसेच मानवतेविरुद्ध रशियाने केलेला हा मोठा गुन्हा आहे, तो दुर्लक्षित करता येणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी ब्लादिमीर पुतीन यांचे कौतुक केले होते, त्यानंतर ट्रम्प यांच्यावर जोरदार टीका झाली होती. पण आता ट्रम्प यांनी यु टर्न घेत रशियावर टीका सुरू केली आहे. तसेच ट्रम्प यांनी आपल्या काळात रशियाने कोणत्याही दुसऱ्या देशावर हल्ला केला नव्हता, असा दावा केला आहे. पण बुश अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना जॉर्जियावर, ओबामा अध्यक्ष असताना क्रीमियावर तसेच आता बायडेन अध्यक्षस्थानी असताना रशियाने युक्रेनवर हल्ला केला, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

Tags:    

Similar News