#Coronaeffect : चीनविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांचे कठोर निर्णय

Update: 2020-05-30 02:02 GMT

कोरोनाच्या संकटाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या फैलावाला चीन आणि जागतिक आरोग्य संघटना (WHO)जबाबदार असल्याचा आरोप याआधी केला होता. त्यानंतर त्यांनी WHOला दिला जाणारा निधी रोखला. पण आता अमेरिकेने WHOशी असलेले सर्व संबंध तोडून टाकल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. WHO ही चीनच्या हातचं बाहुलं झाली असून चीन वर्षाला 40 मिलियन अमेरिकेन डॉलरचा निधी पुरवतो तर अमेरिकेने 450 मिलियन अमेरिकन डॉलरचा निधी देऊनही चीनचे WHO वर नियंत्रण आहे, असा आरोप ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत केला.

त्याचबरोबर आता ट्रम्प यांनी चीनविरोधातही कारवाईला सुरूवात केली आहे. चीनच्या काही नागरिकांना अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये येण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर चीनने हाँगकाँगमध्ये केलेल्या सुरक्षा विषयक सुधारणांमुळे हाँगकाँगला दिल्या जाणाऱ्या विशेष सुविधा बंद करण्याचे आदेश आपण प्रशासनाला दिल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. “चीनने हाँगकाँगमध्ये लागू केलेला कायदा तिथल्या नागरिकांसाठी, चीनमधील नागरिकांसाठी आणि संपूर्ण जगासाठी एक शोकांतिका आहे, तसंच हाँगकाँगबाबत चीनने दिलेला शब्द पाळलेला नाही”, असा आरोपही ट्रम्प यांनी केला आहे. त्याचबरोबर चीनमध्ये गुंतवणुक केलेल्या अमेरिकेन गुंतवणुकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाटी उपाययोजना केल्या जाणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

Similar News