केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर

केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रविण दरेकर हे देखील या चिपळूणचा दौरा करत आहेत.

Update: 2021-07-25 04:57 GMT

मुंबई  :केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रविण दरेकर हे देखील या चिपळूणचा दौरा करत आहेत. राज्यभरात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक जिल्ह्यांना बसला आहे.त्यातल्या त्यात कोकणाला या जोरदार पावसाचा प्रचंड फटका बसला आहे. चिपळूणमध्ये तर महापुरानं अक्षरश: हाहा:कार उडाला आहे. अनेक नागरिक बेघर झाले आहेत.अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या सर्व पूरुपरिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर रवाना झाले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसेच प्रविण दरेकर हे देखील या चिपळूणचा दौरा करत आहेत.

नारायणराव राणे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून कोकण दौरा करत आहेत. या दौऱ्यात एकूण पूर स्थितीचा आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल मंत्री नारायणराव राणे केंद्राकडे सादर करणार आहेत.

केंद्रीय मंत्री नारायणराव राणे या कोकण दौऱ्यात कोकणातील रायगड महाडमधील तळिये, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण या जिल्ह्यांमधील पूर ग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी करणार आहेत. कोकणचे प्रश्न तळमळीने मांडणारे आणि पाठपुरावा करून प्रश्न धसास लावणारे नेते अशी राणे यांची ओळख असून ते या दौऱ्याच्या माध्यमातून संकटग्रस्त कोकणवासीयांना आर्थिक दिलासा देतील, असा विश्वास कोकणवासीय जनतेमधून व्यक्त होत आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड तालुक्यात अतिवृष्टीने अनेक नद्यांना पूर आल्याने अनेक ठिकाणी पाणी भरले. चिपळूण बाजारपेठ पुराच्या वेढ्यात सापडली तर खेड मधील पोसरे येथेही मोठी दुघटना घडली. अतिवृष्टीने संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील नद्यांना पूर आल्याने किनाऱ्यावरील गावांमध्ये काही बाजारपेठा, गावांमध्येही पुराचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे. राजापूर मध्येही अर्जुना नदीला पूर आल्याने राजापूर बाजारपेठेतही पाणी भरले होते. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्ये ही अतिवृष्टीने नुकसान झाले असून या सर्व स्थितीचा मंत्री नारायणराव राणे अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पूरपरिस्थितीमुळे नागरिकांचे आतोनात नुकसान झालं असून प्रचंड हाल होत आहेत. प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना सुरू असून मदतकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. ज्या ठिकाणी पुराचं पाणी ओसरल आहे त्याठिकाणी नागरिकांकडून साफसफाई केली जात आहे.पुराचं पाणी काही प्रमाणात जरी ओसरत असलं तरी मात्र, अनेकांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले असल्याने चिपळूणकरांच्या डोळ्यातील पाणी काही ओसरत नाहीये.

Tags:    

Similar News