कोरोनाविरोधात भारतीय नौदलाची खास ‘गन’

Update: 2020-04-03 14:14 GMT

कोरोनाच्या विषाणूविरोधात संपूर्ण जग लढतंय. एक मोठं युद्ध या विषाणूविरोधात सुरू असताना या विषाणू विरोधातील लढाईसाठी भारतीय नौदलानं एक खास यंत्र तयार केलंय. मुंबईच्या नेव्ही डॉकयॉर्डमध्ये येणाऱ्या लोकांच्या शरीराचं तापमान मोजण्यासाठी लहानशा पिस्तुलासारखं दिसणारं हे यंत्र तयार करण्यात आले आहे. सेंसर तंत्राचा वापर करुन हे खास यंत्र तयार करण्यात आले आहे.

हे थर्मल यंत्र शरीराचं ०.२ डिग्रीपर्यंतचं तापमान अचूकपणे मोजू शकते. इंफ्रारेड तंत्राच्या आधारावर हे खास यंत्र कोरोनाच्या तपासणीसाठी चांगलेच फायदेशीर ठरत आहे. या यंत्राला एक एलईडी डिस्प्ले आणि एक मायक्रो कंट्रोलरही लावण्यात आला आहे आणि हे यंत्र ९ वोल्टच्या बॅटरीवर चालते. सगळ्यात चांगली बाब म्हणजे हे यंत्र केवळ १ हजार रुपयात तयार कऱण्यात आले आहे.

बाजारात मात्र याच यंत्राची किंमत सुमारे ८ हजार ते २० हजार रुपये आहे. नेव्ही डॉकयार्डमध्ये दिवसाला किमान २० हजार लोक येत असतात. सध्या इथं येणाऱ्या प्रत्येकाची या यंत्राद्वारे चाचणी करण्यात येत आहे. शरीराचे तापमान व्यवस्थित असेल तरच त्यांना आत सोडण्यात येत आहे. सध्या हे यंत्र फक्त नौदलामार्फत वापरले जात आहे. पण नजीकच्या काळात अशा यंत्राची मागणी वाढली तर नौदल हे यंत्र मोठ्या प्रमाणात तयार करुन देऊ शकते.

Similar News