एक पाऊल विज्ञानात तर दुसरे अंधश्रद्धेच्या अज्ञानात

चंद्रपूरमध्ये भानामतीच्या संशयावरुन 7 वयोवृद्ध महिला आणि पुरूषांना अमानुष मारहाण केली गेली होती. या घटनेने पडसाद उमटले मात्र नंतर ही घटना विस्मरणात गेली, पण अशा घटना महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर काय परिणाम करत आहेत, याचा आढावा घेणारा आमचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांचा विशेष रिपोर्ट

Update: 2021-08-31 08:06 GMT

गावातील दोन महिलांच्या अंगात देवी येते. अंगात आलेली देवी त्या महिलेच्या तोंडून काही लोकांची नावे घेते. काही लोकांच्या अंगावर मुठीतील माती टाकते. गावातील सात लोकांनी जादूटोणा, भानामती केली आहे, असे सांगते. पाहता पाहता लोक एकत्र जमतात. या सात लोकांना दोरखंडाने बांधले जाते. त्यांना जबर मारहाण होते. याविरुद्ध कुणी त्यांना ना वाचवायला पुढे सरसावतो ना कुणी मारणाऱ्यांना अडवण्याची हिंमत करतो. हे सर्व घडतंय अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा लागू असलेल्या पुरोगामी महाराष्ट्रात.

प्रकरण नेमके काय?

अंधश्रद्धेतून सात लोकांना अमानुष मारहाण होण्याची ही घटना घडली आहे २१ ऑगस्ट रोजी. विशेष म्हणजे याच महिन्यात आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षात देखील देशातील अंधश्रद्धा कमी झालेल्या नाहीत. ही घटना घडल्यानंतर तब्बल 24 तासांनी घडली आहे. गावातील कुणीही हा अनानुष प्रकार घडतेवेळी विरोध करण्याचे धारिष्ट्य दाखवले नाही. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर(chandrapur) जिल्ह्यातील जीवती(jivati) तालुक्यात येणारे वणी खुर्द गाव हे जीवती तालुका मुख्यालयापासून १२ किमी अंतरावर आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जीवती हा तालुका दुर्गम आहे. इथे नेटवर्कची समस्या आहे. याचबरोबर दळणवळणासारख्या सुविधा, आरोग्य, शिक्षण या सुविधांच्या बाबतीत अद्याप हा तालुका मागासलेला आहे. यामुळे या दुर्गम भागात अनेक प्रकारच्या अंधश्रद्धांचे पालन केले जाते.

सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल

याबाबत चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते मयूर राइकनवार सांगतात "जिवती तालुक्याचा सदर पट्टा हा अतिदुर्गम आहे. या भागात बऱ्याच प्रकारच्या अंधश्रद्धांचे पालन केले जाते. उघड झालेली घटना ही एक दिसत असली तरी अशा अनेक अंधश्रद्धांच्या घटना या परिसरात घडत असतात. या घटनेतील आरोपींवर पोलिसांनी सखोल तपास करून कारवाई करण्यासाठी कोर्टात पाठपुरावा करावा "



 


गावातील याच अंधश्रद्धेमुळे(superstition) शांताबाई भगवान कांबळे (५३), शिवराज कांबळे(७४), साहेबराव एकनाथ हुके(४८), धममशिला सुधाकर हुक्के(३८), पंचफुला शिवराज हुके(५५),प्रयागाबाई हुके(६४), एकनाथ हुके(७०) या सात जणांना जबर मारहाण करण्यात आली आहे. यातील पाच जणांना या मारहाणीमुळे गंभीर दुखापत झाली आहे. काहींची हाडे मोडली आहेत. या सात व्यक्ती या जादूटोणा, भानामती करत असल्याच्या संशयावरून ही मारहाण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अंधश्रद्धेचा पगडा आजही कायम

या व्यक्ती जर भानामती अगर जादूटोणा असले काही प्रकार करत असतील तर त्या या कायद्यानुसार गुन्हेगार ठरतीलच... परंतु देवी अंगात येऊन या व्यक्तींची नावे घेतल्याने केलेली मारहाण ही अंधश्रद्धेची पाळंमुळे किती खोलवर रुजलेली आहेत, हे स्पष्ट करते. जीवती येथील सदर घटना हे हिमनगाचे एक टोक आहे. अशा प्रकारचे अनेक प्रकार दररोज घडत असतात. अंधश्रद्धा निर्मुलनाचा कायदा होऊनही महाराष्ट्राच्या पोटात लपलेली ही अंधश्रध्दांची, अज्ञानाची घाण पुन्हा एकदा या घटनेने समोर आणलेली आहे.



 

महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने अंधश्रद्धे विरोधात व्यापक जनलढा उभा राहिला. या लढ्यात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना शहीद व्हावे लागले. कायद्याच्या पातळीवर प्रयत्न करण्यात आले. अनेक आंदोलने झाली. यामध्ये संशोधन झाले. यासाठी लढताना लोकांचा सक्रिय पाठिंबा मिळाला. या लढ्याला डॉ नरेंद्र दाभोलकर यांचे नेतृत्व मिळाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या अथक परिश्रमाने "महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३" हा पारित करण्यात आला. त्याचा पुढील उद्देश होता

"अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व दृष्ट प्रथांपासून समाजातील सर्वसामान्य लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने ,आणि समाजातील सर्वसामान्य लोकांचे शोषण करण्याच्या व त्याद्वारे समाजाची घडीच विस्कटून टाकण्याच्या दृष्ट हेतूने भोंदू लोकांनी सर्वसामान्यतः जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित अलौकिक शक्तीच्या किंवा अदभुत शक्तीच्या किंवा भूत पिशाच्च यांच्या नावाने निर्माण झालेल्या नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, दृष्ट व अघोरी प्रथांचा मुकाबला करून त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या दृष्टीने, समाजामध्ये जनजागृती व सामाजिक जाणीव निर्माण करण्याकरिता तसेच समाजात निकोप व सुरक्षित वातावरण निर्माण करण्याकरिता आणि त्यांच्याशी संबंधित किंवा तदानुषांगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम"

कायदा झाला पण अंमलबजावणीचा अभाव

अधिनियम आला तरीही या घटना पूर्णपणे थांबल्याचे दिसून येत नाही. चंद्रपूर जिल्ह्यात घडलेल्या या घटनेबाबत आम्ही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाहक कृष्णा चांदुगडे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. ते म्हणाले " "महाराष्ट्र राज्याला पुरोगामित्वाची परंपरा लाभली आहे. तरी अशा घटना घडतात, हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. सरकारने जादूटोणा विरोधी कायदा केला परंतु त्याची प्रभावीपणे अंबलबजावणी होत नाही. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या परीने या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. मात्र हे प्रयत्न अपुरे आहे. सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन जादूटोणा विरोधी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. "



 


महाराष्ट्रात या कायद्यानंतर अशा अंधश्रद्धांना कायद्याचा धाक निर्माण झाला आहे पण तरी हे पूर्ण सत्य नाही. महाराष्ट्रातील अनेक भागात आजही अशा अघोरी प्रथा तसेच अंधश्रद्धांचे पालन केले जाते. कायदा कागदावर आहे, त्याच्या अंमलबजावणीसाठी असलेली यंत्रणा तोकडी आहे. यासाठी गावागावात जनजागृती करण्यासाठी सरकारने पाऊले उचलणे गरजेचे आहे. कायदा केवळ निर्माण होऊन अंधश्रद्धेची समस्या सुटणार नाही. कायदा तयार होऊन त्याची अंमलबजावणी योग्य रीतीने झाली नाही तर कायदा कितीही चांगला असला तरी तो कुचकामी ठरेल. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्रभर अंधश्रद्धांच्याविरोधात सातत्याने काम करत आहे. अशा प्रकारच्या कामाला सरकारचा राजाश्रय मिळण्याची आवश्यकता आहे. असे प्रयत्न सरकारी पातळीवर होणे गरजेचे आहे. अशा घटना घडल्यानंतर निषेध व्यक्त करणे हळहळणे, खेद व्यक्त करणे अशा प्रतिक्रिया येतात. परंतु या घटना कायमस्वरूपी थांबविण्यासाठी प्रशिक्षित लोक तयार करून सातत्याने जाणीव जागृती करण्याचे काम सरकारने करायला हवे अन्यथा अशा घटना सातत्याने घडत राहतील.

Similar News