खडसेंना क्लीन चीट नाहीच- मुख्यमंत्र्यांकडून बगल

Update: 2019-07-02 17:09 GMT

विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात आपल्यावरील झालेल्या आरोपांबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असले तरी मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चीट दिलेली नाही. अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अपेक्षित उत्तर आलंच नाही. उलट त्यांनी खडसे यांच्या मुद्द्याला सपशेल बगल दिली. ''जे मंत्री आहेत त्यांच्यावर जे आरोप झाले ते त्यांच्या मंत्रीपदाच्या कार्यकाळाच्या आधी झालेल्या वैयक्तिक व्यवहारांबाबत होते. त्यामुळे त्यावर फार मी बोलणार नाही'', असे बोलून देवेंद्र फडणवीस खडसे प्रकरणावर बोलणे टाळले.

काय म्हणाले जयंत पाटील?

अंतिम आठवडा प्रस्तावावर भाषणात तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ खडसे यांना क्लीन चीट देतील, असे वाटले होते पण तसे घडले नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. याहीउपर माजी गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांबद्दल आपण लोकायुक्तांचा अहवाल सभागृहापुढे सादर करणार होता. परंतु अधिवेशन संपले तरी तो जाहीर केला नाही, याकडेही पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

खडसेचं दुःख खडसेंपाशीच

माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्यावरील आरोपांबाबत चौकशी करावी, तत्थ्य नसेल तर क्षमा मागायला लावा. खोटी तक्रार करणाऱ्यावरही कारवाई व्हायला हवी. एखाद्याचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना शिक्षा मिळायला हवी, अशी मागणी मंगळवारी खडसे यांनी विधानसभेत केली होती. अगदी मी मुख्यमंत्र्यांना पुराव्यानिशी अनेक कागदपत्रे दिली आहेत, पण त्यावर कारवाई नाही, पण एका निर्दोष माणसाला का घरी बसवलं. असं दुःखही खडसे यांनी सभागृहापुढे बोलून दाखवलं होत. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांना क्लीन चीट देण्याविषयी चकार शब्दही काढला नाही.

Similar News