पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी तरुण निघाला सह्याद्री ते हिमालय पायी

डोंगर चढताना भल्या- भल्यांना घाम फुटतो. मात्र भिवंडीचा तरुण भरपावसात रायगड ते सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी पायी निघाला आहे.

Update: 2021-08-02 10:05 GMT

डोंगर चढताना भल्या- भल्यांना घाम फुटतो. मात्र भिवंडीचा तरुण भरपावसात रायगड ते सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट सर करण्यासाठी पायी निघाला आहे. सिद्धार्थ गणाई असं या तरुणाचे नाव असून त्याने रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला अभिवादन करून प्रवासाला सुरुवात केली.

भिवंडीतील वापगाव येथील मैत्रीकुल या मुलांच्या वसतिगृहात सिद्धार्थ राहतो. सिद्धार्थचे बालपण अत्यंत हलाखीत गेले. वडिलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दोन वर्षे त्याने अंधेरीच्या एका पुलाखाली आपले बालपण काढले. पाच वर्षांपूर्वी सह्याद्री सर करण्याचे स्वप्न त्याने पाहिले होते. घरच्या परिस्थितीमुळे ते पूर्ण करता आले नाही.

मात्र आता कितीही संकट आले तरी मागे फिरायचे नाही, असा वसा घेत सह्याद्रीच्या दिशेने तो निघाला आहे. सिद्धार्थ जेव्हा पुढच्या प्रवासाला निघतो तेव्हा वाटेतील प्रत्येक व्यक्तीला 'एक झाड लावून उपक्रमात सहभागी व्हा, एक झाड माणुसकीचे, एक पाऊल परिवर्तनाचे' असा संदेश देतो. निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप याला आपणच जबाबदार आहोत. प्रयत्न करणारे पण आपणच आहोत. ही परिस्थिती बदलण्यासाठी हा एक छोटा प्रयत्न करत असल्याची भावना सिद्धार्थने व्यक्त केली. यावेळी मार्गक्रमण करत असताना आपत्ती व्यवस्थापन ग्रुप शहापूर यांनी त्यास सुका मेवा व फळांची भेट दिली.

70 दिवसांत प्रवास पूर्ण करणार

सिद्धार्थ दिवसाला 35 ते 40 किलोमीटर अंतर पायी प्रवासाला निघतो. रायगडमधून सुरू केलेला पायी प्रवास ठाणे, नाशिकमार्गे मध्य प्रदेश राज्यातून जाणार आहे. 'सह्याद्री ते हिमालय' असा दोन हजार किलोमीटरचा पायी प्रवास 70 दिवसांत पूर्ण करण्याची इच्छा सिद्धार्थने व्यक्त केली.

Tags:    

Similar News