रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रकरणावर भाऊसाहेब चास्कर यांचं मत...

Update: 2020-02-03 17:01 GMT

मुंबई विद्यापीठानं संघ विचारांच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आयोजित केलेला अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण वर्ग काँग्रेसच्या आक्षेपानंतर बंद केलाय. यावरुन आता भाजप (BJP) विरुद्ध काँग्रेस (Congress) असा संघर्ष सुरू झालाय. विद्यापीठातील उपकुलसचिव, सहाय्यक उपकुलसचिव यांच्यासह वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत शुक्रवारपासून सुरू झाले होते. या प्रकरणावर शैक्षणिक घडामोडींचे आणि शैक्षणिक पद्धतीचे जाणकार भाऊसाहेब चास्कर यांनी आपलं मत मांडलंय.

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत मागील सरकारच्या काळात झालेल्या अभ्यास मंडळाच्या दोन बैठकांना मी सदस्य म्हणून उपस्थित होतो. राज्यभरातून प्रवास करुन येणाऱ्या सदस्यांच्या दृष्टीने ही फारच गैरसोयीची जागा आहे असा मुद्दा दुसऱ्याच बैठकीत मांडला.

पुण्यातल्या विद्या परिषदेत (SCERT) महात्मा फुले सभागृह आहे. बालभारतीची जागा सोयीची आहे. अभ्यास मंडळाच्या बैठका पुण्यात ठेवल्या पाहिजेत असा आग्रह मी धरला. तिसऱ्या बैठकीला मला बोलवणे आले नाही. अभ्यासमंडळातून 'मला का वगळले?' हे मला आजपावेतो कळवलेले किंवा कळलेले नाहीये. (अर्थात तोपर्यंत सदस्यांना रितसर निवडीचे पत्र दिलेले नव्हते. माझी निवड मेरीटवर प्रक्रियेतून झालेली होती!) SCERT आणि बालभारतीकडे चौकशी केली, मात्र उत्तर मिळाले नाही. तेव्हाच्या शिक्षणमंत्र्यांचे कामकाज बघणाऱ्या एका व्यक्तीचे अत्यंत जवळचे नातेवाईक प्रबोधिनीत प्रमुख पदावर असल्याने अधिकाऱ्यांनी तेव्हा मौन बाळगले होते. पुढल्या अनेक बैठका तिकडे होत राहिल्या. सरकारच्या मालकीच्या संस्थांकडे आवश्यक त्या भौतिक सुविधा असतानाही लक्षावधी रुपये एका खासगी संस्थेला दिले गेले. शाळांसाठी आणि शिक्षणासाठी मात्र लोकसहभाग जमा करायला सांगितला जात होता.

खेरीज विशिष्ट वातावरणात जेव्हा अभ्यासमंडळाच्या सदस्यांच्या बैठका होतात तेव्हा सत्ताकर्ते स्पष्ट संदेश देत असतात. त्याचाही व्हायचा तो परिणाम होतोच.

सध्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी प्रशिक्षण कार्यक्रम रद्द केल्यामुळे चर्चेत आहे, मला हे आठवलं. पहिल्यांदा याची इथे जाहीर वाच्यता करत आहे.

Similar News