बेलगाव कुऱ्हे येथील बिबट्या अखेर जेरबंद

Update: 2021-09-01 07:40 GMT

इगतपुरी : बेलगाव कुऱ्हे येथील पोल्ट्री जवळ दुसऱ्यांदा बिबट्या पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. येथील पोल्ट्री व्यावसायिक संजय गुळवे यांच्या पोल्ट्री जवळ काल वनविभागाकडून पिंजरा लावण्यात आला होता, पहाटे चार वाजण्याच्या सुमारास हा बिबट्या पिंजऱ्यात अडकला.

बिबट्याच्या आवाजाने पोल्ट्रीतील कामगारांना जाग आली आणि त्यांनी पाहिल्यानंतर बिबट्या पिंजऱ्यातुन बाहेर पडण्यासाठी धडपड करीत होता. पिंजऱ्याच्या लोखंडी जाळ्यांना जोरदार धडका दिल्याने बिबट्या अक्षरशः रक्तबंबाळ झाला होता. दरम्यान कामगारांनी तातडीने घटनेची माहिती वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना दिली.

दरम्यान बिबट्याला पाहण्यासाठी स्थानिकांनी देखील गर्दी केली होती. वनविभागाचे वनपाल शैलेंद्र झुटे हे आपल्या रेस्क्यू टीमसह घटनास्थळी दाखल झाले. बिबट्याला पाहण्यासाठी झालेल्या गर्दीमुळे चवताळलेल्या बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देवून बेशुद्ध करण्यात आले. त्यानंतर बिबट्यावर उपचार करून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जंगलात सोडून देण्यासाठी नेले.

दरम्यान या परिसरात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags:    

Similar News