चंद्रकांत पाटलांनी का निवडला कोथरूड मतदारसंघ ?

Update: 2019-10-01 09:21 GMT

चंद्रकांत दादा पाटील हे पुण्यामधील कोथरूड मधून भाजप साठी विधानसभा लढवणार आहेत. त्यांचं भाजपने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत नाव जाहीर करण्यात आले आहे.

कोल्हापूर मधील एका भाषणात शरद पवार यांनी चंद्रकांत पाटील निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान केले होते. या आव्हानानंतर चंद्रकांत दादा पाटील आता पुण्यातून निवडणूक लढवणार आहेत. चंद्रकांत दादा पाटील हे कोल्हापूर मधील एखाद्या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवतील असा अंदाज बांधला जात होता. राजू शेट्टी सुद्धा म्हणाले चंद्रकांत दादा पाटील जिथे निवडणुकीसाठी उभे राहतील त्यांच्याविरूद्ध तिथे मी निवडणूक लढवेल. त्यात पडलेली भर म्हणजे कोल्हापूर मध्ये असलेला शिवसेनेचा प्रभाव पाहता कोणताही मतदारसंघ पूर्णपणे सुरक्षित म्हणता येईल अशी परिस्थिती कोल्हापूरमध्ये नाही. त्यामुळे सुरक्षित असा भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या कोथरूड मतदारसंघातून चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

2008 मध्ये शिवाजीनगर चा काही भाग व भवानी पेठेतील विधानसभा मतदारसंघांचा मिळून कोथरूड मतदारसंघ तयार करण्यात आला वास्तविक पाहता या भागांमध्ये ब्राह्मण मतदारांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे ब्राह्मण महासंघाने चंद्रकांत दादा पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. त्या ठिकाणी आपला उमेदवार उभा करणार आहे. कोथरूड हा भाग जरी ब्राह्मण बहुल असला तरी 2009 च्या निवडणुकीत शिवसेनेकडून चंद्रकांत मोकाटे च्या विरुद्ध अण्णा जोशी यांना उमेदवारी देण्यात आली होती.

कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने ब्राह्मण उमेदवार दिल्यानं अण्णा जोशीला चांगल्या प्रकारे मतदान होईल अशी राष्ट्रवादी काँग्रेसची धारणा होती. परंतु त्यांचा दारुण पराभव झाला होता. अण्णा जोशी चौथ्या क्रमांकावर फेकले गेले. ब्राह्मण चेहरा असूनही त्याचा फारसा परिणाम 2009च्या निवडणुकीत दिसला नाही. 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष वेगवेगळे निवडणुकांना सामोरे गेल्यानंतरही भाजपच्या आमदार मेघा कुलकर्णी यांना एक लाख मतं मिळाली होती.

भाजपला मिळालेल्या मतांची टक्केवारी 51 टक्के होती. अजित पवारांनी भाषणामध्ये हा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यात येणार असल्याचे जाहीर केले. विरोधी पक्षांकडे कोथरूड साठी कोणताही सक्षम पर्याय उपलब्ध नाही. काँग्रेसही या मतदारसंघांमध्ये आपला उमेदवार उभा करणार नसल्याचे बोलले जात आहे.

मनसेकडून किशोर शिंदे यांना तिकीट दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्ष मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा देऊ शकतात. चंद्रकांत दादा पाटलांना कोथरूडमध्ये मध्ये टिकीट मिळाल्यामुळे स्थानिक नेते व कार्यकर्ते नाराज आहेत परंतु त्या नाराजीचे विरोधी मतांमध्ये रूपांतर होण्याची शक्यता फारच कमी आहे. शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे या बंडखोरीचा फटका नेमकं कोणाला बसेल हे आत्ताच सांगणं कठीण आहे.

Similar News