सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेची कर्नाटक सरकार जोरदार टीका

सामनाच्या अग्रलेखातून कर्नाटकमधील भाजपा सरकार, मुख्यमंत्री बोम्मई आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे. “भाजपाने आपली विश्वासार्हता साफ गमावली आहे. ठाम अशी भूमिका नाहीच. कधी कशी टोपी फिरवतील याचा नेम नाही." असं शिवसेनेने म्हटले आहे

Update: 2021-12-31 05:31 GMT

मुंबई// कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा धक्कादायक प्रकार काही दिवसांपूर्वी समोर आला होता. याबाबत कर्नाटक सरकारने अद्याप ठोस पावले उचलली नसली, तरी या कृतीचा निषेध करणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात मात्र, त्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याबाबत शिवसेनेकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान याचवरून आज सामनाच्या अग्रलेखातून कर्नाटकमधील भाजपा सरकार, मुख्यमंत्री बोम्मई आणि महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांवर जोरदार निशाणा साधण्यात आला आहे.

"भाजपाने आपली विश्वासार्हता साफ गमावली आहे. ठाम अशी भूमिका नाहीच. कधी कशी टोपी फिरवतील याचा नेम नाही. त्यांच्या भूमिका राज्याराज्यानुसार बदलतात. त्यासोबत न्याय-अन्यायाच्या व्याख्याही बदलतात. कर्नाटकात भाजपाचे शासन असल्यामुळे महाराष्ट्रातील भाजपावाले त्या दडपशाहीवर ब्र काढाला तयार नाहीत", अशी टीका शिवसेनेने केली आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना देखील शिवसेनेनं सुनावलं आहे. "कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात शिवरायांचा अपमान ही किरकोळ बाब आहे. त्यासाठी अशी निषेधाची आंदोलनं करणं बरं नाही. श्रीमान बोम्मई यांना आम्ही स्पष्टपणे सांगू इच्छितो, की शिवराय नसते, तर तुमचीही सुंताच झाली असती आणि तुमचाही मियाँ बोम्मई खान झाला असता. शिवराय होते, मोगलांविरुद्ध लढले म्हणून तुमची ही आजची मिजास सुरू आहे", अशा शब्दांत शिवसेनेनं कर्नाटक सरकारवर जोरदार निशाणा साधला

आहे.

Tags:    

Similar News