जळगावमध्ये शिवसेनेचा भाजपला धक्का

शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये भाजपला मोठे खिंडार पाडले आहे.

Update: 2022-02-12 03:34 GMT

राज्यात भाजप विरुध्द महाविकास आघाडी संघर्ष तापला आहे. त्यापार्श्वभुमीवर जळगावमध्ये भाजप आमदार गिरीश महाजन आणि शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे एकत्रित फोटो व्हायरल झाले होते. त्यामुळे अनेक तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्या भेटीपाठोपाठ आता शिवसेनेने जळगावमध्ये मोठा धक्का दिला आहे.

गेल्या काही दिवसांपुर्वी नगरपंचायत निवडणूकीनंतर राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि भाजप नेते गिरीश महाजन यांची भेट झाली होती. गिरीश महाजन यांना भाजपचे संकटमोचक म्हटले जाते. त्यातच त्यांनी गुलाबराव पाटील यांची भेट घेतल्याने तर्क वितर्कांना उधाण आले होते. मात्र शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपच्या चार नगरसेवकांना गळाला लावत गिरीश महाजन यांना धक्का दिला आहे.

राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर शिवसेनेच्या 10 नगरसेवकांनी भाजपा झेंडा हाती घेतला होता. त्यानंतर भाजपच्या सदस्यसंख्येत मोठी वाढ होऊन ही सदस्यसंख्या 57 वर पोहचली होती. मात्र मार्च महिन्यात जळगाव महापालिकेत महापौरांचा कार्यकाळ संपल्यानंतर शिवसेनेने भाजपचे 28 नगरसेवक फोडत जळगाव महापालिकेत भाजपला मोठे खिंडार पाडले होते. त्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापन करत महापौर पदी सेनेच्या जयश्री महाजन यांना तर उपमहापौरपदी बंडखोर कुलभुषण पाटील यांना संधी दिली होती. त्यानंतर जळगावमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी गिरीश महाजन यांना धोबीपछाड देत भाजपच्या चार नगरसेवकांना गळाला लावले. तर हा गिरीश महाजन यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Tags:    

Similar News